परळी-नगर रेल्वे मार्गाच्या खर्चाचा अर्धा वाटा उचलण्याच्या हमीनुसार राज्याच्या आघाडी सरकारने केंद्र सरकारकडे आतापर्यंत ११३ कोटी रुपये दिले आहेत. मात्र काहीजण राज्य सरकारने केंद्राकडे पैसेच दिले नसल्याचा बनाव करून दिशाभूल करत असल्याचा टोला पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नामोल्लेख न करता भाजपचा खासदार गोपीनाथ मुंडे यांना लगावला. तर या मार्गासाठीचा खर्च आता २८०० कोटी रुपयांपर्यंत गेला असून शहराच्या विकासासाठी उड्डाण पूल आणि बायपासचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेने निवडणुकीत शंभर टक्के यश दिल्यामुळे आता शहरात विकासकामांच्या माध्यमातून नवे पर्व सुरू झाले आहे, अशी ग्वाहीही क्षीरसागर यांनी दिली.
बीड नगरपालिकेच्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत ३१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन रविवारी माळीवेस येथे झाले. या वेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, मागील पाच वर्षांच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जनता राष्ट्रवादीच्या पाठीमागे आहे. जनतेने टाकलेल्या विश्वासाच्या परीक्षेत पास व्हावे लागणार आहे. म्हणून निधी खेचून आणला. शहरासाठी वळण रस्ता, उड्डाणपूल, क्रीडांगण उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परळी-बीड-नगर या रेल्वेमार्गाचे काम पैसे नसल्याने रखडल्याचा आरोप खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याने पैसे दिले नाही, हा आरोप चुकीचा आहे. केंद्राकडे ११३ कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे लोक चुकीचे सांगून बनाव करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंडे यांनी राज्य सरकार पैसे देत नसल्याचा आरोप केला होता. ११०० कोटी रुपयांचा रेल्वेचा खर्च २८०० कोटी रुपयांवर गेला आहे. हायस्पीड ट्रेनचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला असून संबंधित कंपन्यांशी चर्चा झाली असल्याचेही क्षीरसागर म्हणाले.