संजय दत्तसाठी थांबणार ‘मुन्नाभाई’

मुन्नाभाई आणि संजय दत्त यांना एकमेकांपासून वेगळे काढणे निर्माता-दिग्दर्शकांनाही अवघड होऊन बसले आहे. संजयशिवाय ‘मुन्नाभाई’ करण्याची कल्पना करणेही अशक्य आहे, असे सांगत निर्माता विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई’च्या तिसऱ्या सिक्वलसाठी संजयची वाट पाहणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुन्नाभाई आणि संजय दत्त यांना एकमेकांपासून वेगळे काढणे निर्माता-दिग्दर्शकांनाही अवघड होऊन बसले आहे. संजयशिवाय ‘मुन्नाभाई’ करण्याची कल्पना करणेही अशक्य आहे, असे सांगत निर्माता विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई’च्या तिसऱ्या सिक्वलसाठी संजयची वाट पाहणार असल्याचे जाहीर केले आहे.
संजय दत्तला १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी म्हणून शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या अनेक चित्रपटांचे काय होणार, असे प्रश्नचिन्ह लागले होते. त्यात राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ चित्रपटाचा आणि अद्याप घोषणेपुरताच मर्यादित असलेल्या ‘मुन्नाभाई’च्या तिसऱ्या सिक्वलचाही समावेश होता. महिनाभर मिळालेल्या मुदतीत संजयने रखडलेल्या चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण करत आणले आहे. मात्र, ‘मुन्नाभाई’ला अजून सुरुवातही झालेली नसल्याने हा चित्रपट अन्य कलाकाराला घेऊन पूर्ण के ला जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. विधू विनोद चोप्राने यावर जाहीर वक्तव्य केले नव्हते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दिग्दर्शक आणि आपल्या अन्य सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल, असे त्याने म्हटले होते. त्यानुसार हिरानी आणि चोप्रा यांनी आपला निर्णय जाहीर केला. २००३ साली ‘मुन्नाभाई एम. बी. बी. एस.’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अभिनेता म्हणून संजय दत्त, दिग्दर्शक म्हणून राजकुमार हिरानी आणि निर्माता म्हणून विधू विनोद चोप्रा यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर २००६ साली आलेल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ या सिक्वललाही तितकेच यश मिळाले. त्यामुळे तिसऱ्या सिक्वलबद्दल लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.
भरीस भर म्हणून दोन दिवसांपूर्वी संजयने आपल्याला शिक्षा भोगून परत आल्यावर मुन्नाभाई चित्रपट करायचा आहे, अशी इच्छा निर्माता-दिग्दर्शकद्वयीकडे व्यक्त केली. तुरुंगातून बाहेर पडून मी थेट मुन्नाभाईच्या सेटवर येईन, असे आश्वासन संजयने आपल्याला दिल्याचे हिरानी यांनी सांगितले. ‘खऱ्या’ मुन्नाभाईसाठी ‘पडद्यावरचा’ मुन्नाभाई आणखी साडेतीन वर्ष वाट पाहू शकतो, हा आमचा निर्णय पक्का झाला असे हिरानी यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Munnabhai will wait for sanjay dutt

ताज्या बातम्या