महावितरणने थकीत वीजबिल वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली असून, औशाचे आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांच्या मुरूम येथील निवासस्थानाची १ लाख ७६ हजार रुपये थकीत बाकी न भरल्यामुळे वीज तोडण्यात आली.
महावितरणने लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हय़ांतील ६२ हजार ८६६ वीजजोड डिसेंबरमध्ये तोडले. थकीत वीजबिल न भरणारी व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याची गय न करता वीजतोडणीचे हत्यार उपसले जात आहे. लातूर जिल्हय़ातील १८ हजार ९४१जणांची वीज तोडण्यात आली. जिल्हय़ात ४ नगरपालिका व १ महापालिका आहे. निलंगा नगरपालिकेची वीज तोडण्यात आल्याने गेल्या ५ दिवसांपासून सर्वानाच अंधाराच सामना करावा लागत आहे. अहमदपूर नगरपालिकेकडे चालू बाकी ५२ लाख, उदगीर नगरपालिकेकडे ३० लाख २३ हजार, लातूर महापालिकेकडे ९६ लाख २१ हजार, तर औसा नगरपालिकेकडे थकीत सव्वाकोटी बाकी आहे. चालू बाकी न भरल्यास वीजजोड दिला जाणार नाही, असे धोरण महावितरणने घेतले आहे. वीजजोड पूर्ववत करावा, या मागणीसाठी शुक्रवारी औसा नगरपालिकेचे अध्यक्ष संगमेश्वर ठेसे, लातूर महापालिका स्थायी समितीचे सभापती अॅड. समद पटेल आदींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, पैसे भरायला कोणताही पर्याय नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिक करांचा भरणा करत नाहीत, पालिकेच्या तिजोरीत खणखणाट असल्यामुळे पथदिव्यांची वीज चालू कशी करायची? हा प्रश्न सुटता सुटत नाही.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
आमदार मुरूमकर यांची वीज तोडली
महावितरणने थकीत वीजबिल वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली असून, औशाचे आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांच्या मुरूम येथील निवासस्थानाची १ लाख ७६ हजार रुपये थकीत बाकी न भरल्यामुळे वीज तोडण्यात आली.
First published on: 05-01-2013 at 01:10 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murumkar electricity disconnected