यवतमाळ विधानसभा मतदारसंघात येत्या २ जूनला होणाऱ्या पोटनिवडणुकीतील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले असून सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने दिवं. आमदार नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी यांनाच अपेक्षेनुसार उमेदवारी दिली आहे. भाजपने मदन येरावार यांना पुन्हा तिकीट दिले आहे. त्यामुळे या दुहेरी संघर्षांत नंदिनी पारवेकरांचे पारडे जड असल्याचेच सध्याचे चित्र आहे.
नंदिनी पारवेकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रत्येक काँग्रेस नेत्याची, कार्यकर्त्यांची आणि निलेश पारवेकरांवर प्रेम करणाऱ्यांची लाखों लोकांची आहे या भावनेने या निवडणूकीकडे पाहिले पाहिजे अशा स्पष्ट सूचना दिल्ली आणि राज्यातील पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. गेल्या २७ जानेवारीला नीलेश पारवेकर यांचे कार अपघातात निधन झाले होते. उद्या, उमदेवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून भाजपचे मदन येरावार  यांचा एक अपवाद वगळता कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अथवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल  केला नव्हता.
काँग्रेसतर्फे नीलेश पारवेकर यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर या सुरवातीपासूनच निवडणुक लढण्यास उत्सुक नव्हत्या. त्यामुळे पतीच्या निधनानंतर त्यांनी यवतमाळला अलविदा करीत कर्नाटकातील आपले माहेरसुध्दा गाठले होते. दरम्यान नीलेश पारवेकरांचे धाकटे बंधू योगेश पारवेकर, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांच्यापासून तर माजी आमदार विजया धोटे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या सव्वालाखे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर व नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांच्यापर्यंत अनेक इच्छुकांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे उमेदवारी मिळावी म्हणून साकडे घातले होते. परंतु, राहुल गांधी यांच्यापासून दिल्लीतील आणि राज्यातील काँग्रेसश्रेष्ठींने उमेदवारीचा कौल नंदिनी पारवेकरांच्या पारडय़ात टाकला. निवडणूक लढविण्यासाठी नंदिनी यांचे मन वळविण्यात आल्यानंतर त्या निवडणूक लढण्यास तयार झाल्या.  उद्या, बुधवारी १५ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नंदिनी पारवेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी हजर राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी ‘लोकसत्ता’ ला दिली.

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे  लक्ष
काँग्रेसने नंदिनी पारवेकर यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अन्यथा राकाँ स्वतंत्र विचार  करेल, असे राकाँचे आमदार संदीप बाजारिया यांनी जाहीर केले होते. आता काँग्रेसने नंदिनी यांनाच उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस उमेदवार उभा करणार नाही हे खरे असले तरी नंदिनींच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत राकाँ कार्यकर्त्यांनी हजर रहावे किंवा नाही याबद्दल उलटसुलट चर्चा आहे. राकाँ कार्यकर्त्यांनी हजर राहू नये, असा अलिखित संदेश काही नेत्यांकडून प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. या संदर्भात कॉग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना राकाँच्या  नेत्यांना विशेषत अजितदादा पवार, मधुकर पिचड, मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया यांना उद्या राकाँच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हजर राहण्याची विनंती केली आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हयातील राकाँचे सुप्रिमो आ. संदीप बाजोरिया सध्या कर्नाटकातील कुर्ग येथे गेले आहेत. बुधवापर्यंत त्यांच्या परतीची कार्यकत्रे आतुरतेने वाट पहात आहेत कारण त्यांच्या गरहजेरीत निर्णय घेणे राकाँ कार्यकर्त्यांना कठीण जात आहे.