उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची संख्या वाढत असून सोमवारी १७४ उमेदवारांनी अर्ज नेल्यामुळे हा आकडा ३०९ वर जाऊन पोहोचला आहे. अर्ज नेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणिय असले तरी पितृपक्षामुळे ते दाखल करणाऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. सोमवारी देवळाली व मालेगाव (मध्य) विधानसभा मतदारसंघातून केवळ दोन जणांनी अर्ज दाखल केले. पुरोगामी महाराष्ट्राचा सातत्याने जप करणाऱ्या राजकीय प्रभृतींवर अंधश्रध्देचा किती पगडा आहे हे या घटनेने दर्शविले आहे.
शनिवारपासून विधानसभेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली. अर्ज दाखल करण्याची २७ सप्टेंबर ही अंतीम तारीख आहे. बुधवापर्यंत पितृपक्ष असल्याने बहुतेकांचा कल त्यानंतर अर्ज दाखल करण्यावर आहे. तत्पुर्वी, नामांकन अर्ज भरण्याची सर्व तयारी पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सोमवारी १५ मतदारसंघासाठी १७४ इच्छुकांनी अर्ज नेले. त्यात देवळालीसाठी २२, नाशिक पुर्व १९, नाशिक पश्चिम ८, नाशिक मध्य १६, इगतपुरी ८, दिंडोरी ९, निफाड ५, सिन्नर ११, येवला १९, चांदवड १४, कळवण २, बागलाण ९, मालेगाव बाह्य १२, मालेगाव मध्य ९ आणि नांदगाव ११ इच्छुकांचा समावेश आहे. शनिवार व सोमवार अशा दोन दिवसात अर्ज नेणाऱ्यांची संख्या ३०९ झाली आहे. इच्छुकांची सर्वाधिक संख्या नाशिक पूर्व मध्ये ४१ असून सर्वात कमी म्हणजे ४ कळवणमध्ये आहे. देवळालीसाठी ३७, नाशिक मध्य ३१, नाशिक पश्चिमसाठी २५ इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. अर्ज नेणाऱ्यांचे प्रमाण मोठे असले तरी ते दाखल करणाऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. सोमवारी मालेगाव मध्य मतदारसंघासाठी अय्याज अहमद मोहम्मद सुलतान यांनी तर देवळाली विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. संजय जाधव यांनी भारीप बहुजन महासंघ पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी नाशिक पश्चिम मतदारसंघातून एक अर्ज दाखल झाला होता. पितृपक्षात केवळ तीन उमेदवारांनी अर्ज दाल केले आहे. बुधवापर्यंत पितृपक्ष असल्याने इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यास हात आखडता घेतल्याचे सांगितले जाते. गुरुवारपासून अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी होऊ शकते. गुरुवार ते शनिवार या तीन दिवसात बहुतांश मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल होतील, असे एकंदर चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांवर पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचा किती पगडा आहे हे यातून लक्षात येते.