विदर्भात संघटनात्मक काम वाढविण्यासाठी गेल्या तीन ते साडेतीन वर्षांत कमी पडलो असल्याची कबुली देत यापुढे विदर्भातील प्रश्नांचा विचार करून सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भातील प्रश्नांसंदर्भातील पक्षाची ब्ल्यू प्रिंट विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते, विधानसभेतील गटनेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटनात्मक काम वाढविण्यासाठी बाळा नांदगावकर सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी नागपूर शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंची बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नांदगावकर म्हणाले, विदर्भात अमरावती, बुलढाणा या शहरात मनसेचे काम चांगले सुरू असले तर अन्य जिल्ह्य़ात मात्र कमी पडलो. पक्षाचे नेते विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात येऊ शकले नाही त्यामुळे संघटनात्मक काम वाढविण्यास कमी पडलो आहे. मनसे विदर्भातील प्रश्न घेऊन नागपूरच्या अधिवेशनात नेहमीच आवाज उठविला आहे. यापुढे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रासोबत विदर्भात लक्ष केंद्रित करणार आहे. ज्या ठिकाणी मनसेचे काम चांगले आहे त्या ठिकाणी आम्ही लोकसभा निवडणूक लढविणार आहोत, मात्र त्या संदर्भातील निर्णय राज ठाकरे घेतील. विदर्भात सिंचन, आरोग्य, शिक्षण आणि इतर समस्या असून त्या संदर्भात आंदोलन उभी करण्याची गरज आहे आणि त्यासाठी मनसे काम करणार आहे. विदर्भासह उपराजधानीमधील विविध प्रश्नांवर चर्चा करून आढावा घेतला जात आहे. हा आढावा घेतल्यानंतर अहवाल तयार करून तो राज ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.
आम आदमी पक्षाशी आमची स्पर्धा नसली तरी त्याला कमी समजण्याचे कारण नाही. नवीन पक्ष स्थापन झाल्याने त्याला लोकप्रियता मिळेलच असे नाही. आम पक्ष केवळ भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जात असला तरी मनसेने तीन वर्षांपासून यावर काम सुरू केले आहे. आम आदमी पक्षामुळे आम्हाला काही फरक पडणार नसला तरी त्याला कमी समजणार नाही. दिल्लीमध्ये  त्यांना जनतेचा प्रतिसाद मिळाला असला महाराष्ट्रात मिळेलच असे नाही. महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्षासह अन्य राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे आम आदमीचा प्रभाव राहील असे वाटत नाही. सामान्य माणूस मनसेकडे होता आणि तो राहणार आहे. राज ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या आधी विदर्भातील विविध समस्यांवर ‘ब्ल्यू प्रिंट’ जाहीर करणार असल्याचे नांदगावकर म्हणाले.
टोल नाक्यासंदर्भात मनसेने यापूर्वी काम सुरू केले आहे. अवैधरित्या चालणारे राज्यातील ६५ टोल नाके मनसेने बंद केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. आंदोलने आम्ही सोडलेले नाही तर ती येणाऱ्या काळात सुरू राहणार आहे. महायुतीमध्ये जायचे की नाही या संदर्भात राज ठाकरे यांनी भूमिका निश्चित केली आहे आणि ती वेळोवेळी जाहीर केली आहे.
मनसेने महायुतीमध्ये यावे असे जर भाजपाला वाटत असेल तर त्याचा प्रश्न आहे असेही नांदगावकर म्हणाले. यावेळी हेमंत गडकरी, प्रशांत पवार, प्रवीण बरडे आदी मनसेचे नेते उपस्थित होते.