दररोज लाखो प्रवाशांचा भार झेलणाऱ्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात तीन दिवसांची पूर्ण सुटी मिळण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस या स्थानकातील हार्बर मार्गावरील फलाटांची लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा उभ्या करण्यासाठी फलाटांमध्ये बदल होणे आवश्यक असल्याने हा उपाय हाती घेण्यात आला आहे. मात्र या फलाटांची लांबी वाढली, तरी मध्य रेल्वेकडे गाडय़ांची कमतरता असल्याने हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा तातडीने १२ डब्यांच्या होऊन धावणार नाहीत.
हार्बर मार्गावरील वाहतूक गेल्या काही वर्षांत २५ टक्क्यांनी वाढली आहे. या वाहतुकीचा भार पेलण्यासाठी मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील गाडय़ांच्या डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांवर नऊ डब्यांच्याच गाडीसाठी पुरेसे फलाट आहेत. १२ डब्यांची गाडी सुरू करण्यात या फलाटांचा अडथळा होता. मात्र दोन वर्षांपासून या फलाटांची लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले असून वडाळा, रे रोड, डॉकयार्ड रोड आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ही चार स्थानके वगळता अन्यत्र हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला हार्बर मार्गासाठीच्या फलाट क्रमांक एकच्या टोकाला रेल्वेची नवीन प्रशासकीय इमारत आहे. त्यामुळे फलाट एकची लांबी वाढणे शक्य नाही. फलाट दोनची लांबी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फलाट एकवर येणाऱ्या गाडय़ांतील शेवटच्या तीन डब्यांतील प्रवाशांना फलाट दोनवर उतरावे लागेल, असे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश सक्सेना यांनी सांगितले.
या योजनेमुळे दोन आणि तीन क्रमांकांच्या फलाटांमध्ये शिरणाऱ्या रुळांची रचनाही बदलावी लागणार आहे. त्यासाठी फलाट तीनवरील प्रसाधनगृह तोडून त्याची रुंदी थोडी कमी करावी लागणार आहे. या सर्व कामांसाठी या फलाटांवरील वाहतूक तीन दिवस बंद ठेवावी लागेल. हे काम डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये हाती घेतले जाईल. शनिवार-रविवार या दोन दिवसांना जोडून येणाऱ्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी हे काम करण्याचा रेल्वेचा विचार आहे, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले.
हे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा धावणार नाहीत. मध्य रेल्वेकडे सध्या गाडय़ांची कमतरता आहे. सध्या हार्बर मार्गावर ३६ गाडय़ा दिवसभरात ५८३ सेवा चालवतात. या सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यासाठी १०८ जादा डब्यांची गरज आहे. त्यामुळे जसजसे डबे मिळतील, तसतशा या गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यात येतील, असेही निगम यांनी स्पष्ट केले.