भरतनाटय़म् आणि कथक या नृत्यप्रकारांनी ‘ध्रुपद’ गायनशैलीशी साधलेला अनोखा मिलाफ यंदाच्या चौथ्या प्रगति उत्सवात अनुभविण्यास मिळणार आहे. लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या ध्रुपद गायनशैलीशी नृत्याद्वारे साधला जाणारा हा संवाद हेच या उत्सवाचे वैशिष्ठय़े राहणार आहे. नृत्यसाधना कला अकॅडमीच्यावतीने आयोजित प्रगति उत्सवात पवित्रा भट यांच्यासह शिष्यगण ‘राधे राधे गोविंद’ या भरतनाटय़म् तर नाशिकच्या डॉ. संगिता पेठकर यांच्यासह आठ शिष्य ‘शंकर गिरीजापती’ या संकल्पनेवर आधारीत सादरीकरण करणार आहेत.
भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य व संलग्न कला संस्था म्हणून २००२ मध्ये स्थापन झालेल्या नृत्यसाधना कला अकॅडमीतर्फे शास्त्रीय नृत्यप्रकार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तीन वर्षांपासून या उत्सवाचे आयोजन केले जाते. त्यास उत्तरोत्तर प्रतिसाद लाभत आहे. यंदाचा प्रगति उत्सव शुक्रवारी सायंकाळी सात वाजता महाकवी कालिदास कला मंदिर येथे होणार आहे.
सृजन करत राहणे हा प्रत्येक कलाकाराचा स्वभावधर्म. त्याच्या याच सृजनात्मक कलाकृतींचे दर्शन सर्वाना घडावे आणि त्यातून कलासाधना व्हावी यासाठी विविध संकल्पनांना वाट करून देणाऱ्या नृत्यरचनांची नृत्यप्रस्तुती म्हणजे प्रगति उत्सव. दरवर्षी या उपक्रमात देशातील ख्यातनाम कलाकारास आमंत्रित केले जाते. त्यानुसार यावेळी मुंबईच्या पवित्रा भट व त्यांच्या पथकास निमंत्रित करण्यात आले आहे. नाशिकचे आठ कलाकार शंकर-पार्वतीच्या विवाह सोहळ्यावर आधारीत ‘शंकर गिरीजापती’ या संकल्पनेवर सादरीकरण करतील. त्यास अफजल हुसेन यांनी ध्रुपद गायनशैलीची जोड लाभणार आहे. भरतनाटय़म्, कथक नृत्यप्रकारांशी ध्रुपद गायनशैलीच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयोग बहुदा आजवर झाला नसल्याचे डॉ. पेठकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संपूर्ण उत्सवात नाशिकचे जवळपास २० ते २२ कलाकार सहभाग असणार आहे.
संस्थेमार्फत भरतनाटय़म् व उडिसी या नृत्यप्रकारांचे शिक्षण दिले जाते. उत्सवाव्यतिरिक्त संस्था वर्षभर छोटेखानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे बैठक सत्र, शाळा व महाविद्यालयांमध्ये व्याख्यान व मार्गदर्शनपर कार्यक्रम आदींचा त्यात समावेश आहे. शास्त्रीय संगीत व नृत्य प्रशिक्षण ही एक साधना आहे. त्यासाठी सात ते आठ वर्षे द्यावी लागतात.
 नाशिक शहरात शालेय विद्यार्थ्यांमध्ये ही साधना करण्याची तयारी वाढत असल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे. उत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, ज्येष्ठ विधिज्ञ एस. एस. देशपांडे, नगरसेवक विक्रांत मते, अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर आदी उपस्थित राहणार आहेत.