महानगरपालिकेच्या प्रारूप रचनेतील सहा प्रभागांची फेरतपासणी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिले. मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी व राज्य निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आजच ही फेरतपासणी करतील, असे श्रीमती सत्यनारायण यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानुसार सायंकाळी ही पाहणीही करण्यात आली.
मनपाच्या येत्या निवडणुकीच्या दृष्टीने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या हरकतींची सुनावणी आज श्रीमती सत्यनारायण यांच्या उपस्थितीत झाली. राज्य निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल, मनपाचे आयुक्त विजय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. या सुनवणीनंतर श्रीमती सत्यनारायण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, प्रभागरचनेवर ३३२ हरकती दाखल झाल्या होत्या. त्यांचे स्वरूप लक्षात घेऊन या हरकतींचे २४ गट करण्यात आले. या गटांनुसार झालेल्या सुनावणीत ६ गटांमधील रचनेच्या हरकती लक्षात घेता त्याच्या फेरतपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. या ६ प्रभागांमध्ये आजच फेरतपासणी होईल. त्याचा अहवाल मनपा आयुक्तांकडून प्राप्त झाल्यानंतर निकषानुसार त्यावर निर्णय घेण्यात येऊन येत्या पंधरा दिवसात प्रभागरचना अंतिमत: जाहीर होईल अशी माहिती त्यांनी दिली. जनगणनेच्या प्रगणकानुसार पभागरचना करण्यात आली असून त्यात बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रीमती सत्यनारायण यांनी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार व जिल्हा पोलीस अधीक्षक आर. डी. शिंदे यांच्याशीही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चर्चा केली. मनपा निवडणूक अत्यंत पारदर्शी व मोकळ्या वातावरणात व्हावी असा प्रयत्न असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.
एक, दोन प्रभागात लगेचच मोजणी
सांगली मनपाच्या धर्तीवर नगरलाही प्रायोगिक तत्वावर काही प्रभागाची मतमोजणी मतदानानंतर लगेचच करता येईल काय, याची चाचपणी करण्यात येईल असे श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले. पोलिसांना बंदोबस्ताची अडचण आहे, अन्यथा सर्वच प्रभागांची मतमोजणी मतदानानंतर लगेचच करण्याची राज्य निवडणूक आयागोची तयारी आहे असे त्या म्हणाल्या.
प्रभाग २१, २२,२७, ३० मध्ये फेरतपासणी
कुठल्या ६ हरकतींनुसार फेरतपासणी होणार किंवा कोणत्या प्रभागांची फेरतपासणी होणार हे सांगण्यास श्रीमती सत्यनारायण यांनी नकार दिला. मात्र त्यांनी याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांची दिलेली माहिती लक्षात घेता यातील काही पत्रभागांबाबत अंदाज व्यक्त होतो. प्रामुख्याने रेल्वेमार्ग, नदी ओलांडून भाग जोडला जाऊ नये, असा नियम आहे. त्यानुसार महापौर, उपमहापौरांच्याच प्रभागाची फेरतपासणी होण्याची शक्यता आहे. महापौर शीला शिंदे व उपमहापौर गितांजली काळे यांचा प्रभाग (क्रमांक २७) आता एक झाला असून आगरकर मळ्यातून तो थेट कल्याण रस्त्यापर्यंत विस्तारला आहे. सीना नदीमुळे त्याचे पूर्ण दोन भाग झाले आहेत. तसेच सारसनगर भागातील प्रभाग क्रमांक ३०, शनि चौकातील प्रभाग क्रमांक २१ व २३ अशा काही ठिकाणी लगेचच दुपारनंतर फेरतपासणी झाली. मनपाचे आयुक्त कुलकर्णी, नगररचनाकार विश्वनाथ दहे व राज्य निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी यांनी पाहणी केली.