स्थानिक संस्था कर रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी रखरखत्या उन्हात मोर्चा काढून बाजारपेठ बंद ठेवून आज कडकडीत बंद पाळला. या बंदमध्ये पेट्रोल पंपांसह कपडा, किराणा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे शो-रूम व गोलबाजार बंद होता.
राज्यातील महापालिकांमध्ये स्थानिक संस्था कराला होत असलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनीही पुन्हा एकदा या कराविरुद्ध कंबर कसली आहे. एलबीटीच्या विरोधात मुंबई, नागपूरसह राज्यातील बहुतांश महानगरपालिका क्षेत्रात व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदला समर्थन देऊन स्थानिक व्यापाऱ्यांनी आज येथे कडकडीत बंद पाळला. एलबीटीच्या विरोधात आणि बंदच्या समर्थनार्थ चंद्रपूरच्या व्यापाऱ्यांनीही आज रस्त्यावर उतरून भव्य मोर्चा काढून कॉंग्रेसप्रणीत आघाडी सरकार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.
आज सकाळी १० वाजता येथील जैन भवनात चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंगवी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व व्यापारी एकत्र आले. येथे झालेल्या बैठकीत एलबीटी व्यापाऱ्यांना कशा पध्दतीने घातक आहे, हे पटवून देण्यात आले. या मुद्यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शहराच्या मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मुख्य मार्गावरील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. यावेळी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यानंतर व्यापारी शहरातील सर्व दुकाने बंद करत फिरले. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. गोलबाजारातील सर्व दुकाने बंद होती. कपडा बाजारपेठ, हार्डवेअर, पेट्रोल पंप, होजिअरी, धान्य दुकाने, पूर्ती व अपना बाजारचे मॉल, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी व चारचाकी वाहनांची दुकाने बंदत सहभागी झाले होते. केवळ मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद असल्याने संचारबंदी लागल्यासारखे चित्र येथे बघायला मिळत होते.
वाईन शॉप व बीअर बार सुरूच
विदेशी दारू व बीअरवर चार टक्के स्थानिक संस्था कर असतांना सुध्दा देशी-विदेशी दारू विक्रेता संघ चेंबर ऑफ कॉमर्सने पुकारलेल्या बंदत सहभागी झाले नव्हते. शहरातील सर्व देशी-विदेशी दारूची दुकाने, तसेच बीअर बार सकाळी नऊ वाजतापासूनच सुरू होते. व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून दारू दुकानदारांना बंदत सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र, व्यापाऱ्यांच्या आवाहनाला या दारू विक्रेत्यांनी भीक घातली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2013 रोजी प्रकाशित
एलबीटीविरोधात चंद्रपुरात कडकडीत बंद
स्थानिक संस्था कर रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी रखरखत्या उन्हात मोर्चा काढून बाजारपेठ बंद ठेवून आज कडकडीत बंद पाळला. या बंदमध्ये पेट्रोल पंपांसह कपडा, किराणा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे शो-रूम व गोलबाजार बंद होता.
First published on: 09-05-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strick in chandrapur against lbt