ठाणे महापालिकेच्या मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या भांडुप येथील सुरक्षारक्षक मंडळाच्या सुरक्षारक्षकांची मुदत दीड महिन्यांपूर्वीच संपली असून त्यांच्या मुदतवाढीसंबंधीचा प्रस्ताव येत्या गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी आणण्यात आला आहे. या नव्या प्रस्तावानुसार, दहा पर्यवेक्षक तसेच ५०० सुरक्षारक्षक घेण्यात येणार आहेत. यापूर्वी महापालिकेच्या ताफ्यात दहा पर्यवेक्षक आणि ३६० सुरक्षारक्षक होते. मात्र, महापालिकेच्या जलकुंभांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी या प्रस्तावामध्ये सुमारे १४० जादा सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
 भांडुप येथील सुरक्षा मंडळाच्या रक्षकांची मुदत संपली आहे. त्यामुळे पालिकेच्या सुरक्षा विभागाने त्यांच्या मुदतवाढीसंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून त्यामध्ये   या सुरक्षारक्षकांना वर्षभरासाठी मुदतवाढ देण्यात यावी, असे नमूद केले आहे. ठाणे महापालिकेचे ५२ जलकुंभ असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी २१० सुरक्षारक्षक व इतर प्रभाग समितीकरिता २० सुरक्षारक्षक नव्याने घेण्यात येणार होते. त्यानुसार, सुरक्षा विभागाने सुमारे दहा पर्यवेक्षक आणि ५९० सुरक्षारक्षकांचा प्रस्ताव यापूर्वी तयार केला होता. मात्र, महापालिकेने जकात बंद करून त्याऐवजी स्थानिक संस्था कर लागू केला आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांची मागणी कमी करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी सुरक्षा विभागास दिले होते. त्यानुसार, सुरक्षा विभागाने नव्याने प्रस्ताव तयार करून त्यामध्ये दहा पर्यवेक्षक तसेच ५०० सुरक्षारक्षक घेण्याचे सुचविले आहे.  

नव्या प्रस्तावानुसार सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन
महापालिका मुख्यालय, नऊ प्रभाग समित्या, डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह, गडकरी रंगायतन नाटय़गृह, महापालिकेचे दवाखाने, स्मशानभूमी, उद्याने, मोकळे भूखंड, महापालिकेचे जलकुंभ आदी ठिकाणची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी त्या ठिकाणी सहा सुरक्षा पर्यवेक्षक आणि ४५४ सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी चार सुरक्षा पर्यवेक्षक आणि ४६ सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत.