डग्लस टॉमकिन्स हे शिक्षण अध्र्यावर सोडून शाळा सोडलेल्या मुलांपकीच एक. ज्याला शिक्षण पूर्ण करता आले नाही तो काय करणार असे कुणीही म्हणू शकेल. पण याला जे अनेक अपवाद आहेत त्यात डग्लस टॉमकिन्स हे एक होते. श्रीमंत असले तरी त्यांनी निसर्ग संवर्धनाच्या कामातून जगावर मोठी छाप पाडली. अलीकडेच निसर्गाच्या या पूजकाला निसर्गानेच कवेत घेतले. कयाक (छोटी नाव) चालविताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘द नॉर्थ फेस’ व ‘एस्प्रिट’ या तयार कपडय़ांच्या दोन कंपन्या सुरू केल्या. त्यांची उत्पादने जगभर लोकप्रिय होती. लक्ष्मी हात जोडून उभी असताना त्यांनी नंतर निसर्ग संवर्धनाचा ध्यास घेतला. ते एक साहसी गिर्यारोहक होते, के-२ हे शिखर सर करणारे ते पहिले अमेरिकी होते. डग्लस रेन्सफॉर्ड टॉमकिन्स यांचा जन्म ओहिओ येथे २० मार्च १९४३ रोजी झाला. काही काळ ते न्यूयॉर्कमध्ये होते. वयाच्या बाराव्या वर्षी ते प्रस्तरारोहण शिकले. पंधराव्या वर्षी स्कीइंग व गिर्यारोहणात तरबेज झाले. गिर्यारोहणासाठीच्या सामुग्रीची द नॉर्थ फेस ही कंपनी त्यांनी पत्नी सुसी ब्युएल हिच्यासमवेत सुरू केली, नंतर त्यांनी एस्प्रिट ही कोटय़वधी डॉलरची कंपनी सुरू केली. १९९० मध्ये त्यांनी हा उद्योगच विकून टाकला, पण त्याआधी त्यांनी एक उत्तम मंत्र सांगितला तो म्हणजे ज्याची लोकांना गरज नाही अशा वस्तू कधी विकू नका!
अमेरिका सोडून, ते व त्यांची दुसरी पत्नी क्रिस्टीन मॅकडिव्हिट यांनी चिली व अर्जेटिनात निसर्ग संवर्धनाचे काम सुरू केले. टीका, विरोध सहन करण्याची ताकद नसेल तर निसर्गाचे संवर्धन कधीच होऊ शकणार नाही, असे ते म्हणत असत. ते व त्यांची दुसरी पत्नी क्रिस आरामात श्रीमंती आयुष्य जगू शकले असते. कारण क्रिसही एका मोठय़ा कंपनीची माजी अधिकारी होती. दक्षिण चिलीत त्यांनी ‘फाउंडेशन फॉर डीप इकॉलॉजी’ ही संस्था स्थापन करून काही लाख एकर जमीन विकतच घेतली. श्रीमंतीच्या जोरावर रॉकफेलर्सनी व्योिमग येथे १९२०मध्ये टेटॉन पर्वतराजी विकत घेऊन निसर्ग संवर्धन केले तसेच टॉम्पकिन यांनी केले असे म्हणता येईल. तेथील लोकांनी त्यांच्यावर पाणी पळवणारा उपटसुंभ अमेरिकी म्हणून टीकाही केली होती, पण प्रत्यक्षात तसे काहीही नव्हते, हे त्यांनी केलेल्या संधारण-प्रयोगांतून स्पष्ट झाले. टॉमकिन्स यांच्यावर ‘१८० डिग्री साउथ’ हा माहितीपट १९६८ मध्ये काढण्यात आला. त्यात त्यांच्या साहसी कृतींचे चतुरस्र दर्शन घडते. हा माहितीपट नंतर अनेक ठिकाणी दाखवला गेला.