नक्षलवादी अथवा माओवादी गटांशी संपर्कात असलेल्या कुणालाही सरसकट देशविरोधी ठरविले जाते, या पठडीला सन्माननीय अपवाद ठरणारे बी. डी. ऊर्फ ब्रह्मदेव शर्मा यांचे व्यक्तिमत्व होते. मुळात, १९९१ पर्यंत त्यांनी या ना त्या प्रकारे सरकारचेच प्रतिनिधित्व केले होते. १९५६ ते १९८१ पर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी या नात्याने बस्तरच्या जिल्हाधिकारी पदापासून अनेक पदांचा अनुभव, १९८१ ते ८६ पर्यंत शिलाँग (मेघालय) येथील ईशान्य भारत विद्यापीठाचे कुलगुरू पद, १९८६ ते ९१ या काळात राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगावर, आयुक्त म्हणून काम, ही पदे व्यवस्थेला सावरणारीच होती. त्यानंतरच्या काळात, म्हणजे वयाच्या साठीनंतर आदिवासींच्या कामात त्यांनी स्वतला गाडून घेतले. इतके की, २०१२ च्या एप्रिलमध्ये ओरिसाच्या सुकमा जिल्ह्याचे तरुण जिल्हाधिकारी अ‍ॅलेक्स पॉल मेनन यांचेच अपहरण करणाऱ्या माओवादय़ांनी, वाटाघाटींचा प्रस्ताव सरकारकडून आल्यावर आपले (माओवादय़ांचे) प्रतिनिधी म्हणून जी तीन नावे सुचविली त्यांपैकी एक शर्माचे होते. अन्य दोन नावे होती- कॉ. महेश कुंजाम आणि अ‍ॅड. प्रशांत भूषण! या दोघांच्या नकारामुळे, शर्माच एकटे मध्यस्थ झाले.
आदिवासींशी बांधीलकी असू शकते, हे शर्मानी १९६० मध्ये बैलाडिला येथे तब्बल ६० सरकारी कर्मचारी वा कंत्राटदार/कामगारांना, त्यांनी ज्या आदिवासी युवतींचा उपभोग घेतला त्यांच्याशीच लग्न करणे भाग पाडले. ही साठही लग्ने एका मांडवात झाली, हा आदिवासींबाबत बेपर्वा असलेली सरकारी ‘व्यवस्था’ सुधारण्यासाठी शर्मा यांनी केलेल्या कामांचा कळस होता.
मूळ उत्तर प्रदेशचे, वास्तव्य ग्वाल्हेरात, शिक्षण गणित विषयातील पीएच.डी. पर्यंत, हे आदिवासींसाठी काम करण्यात अडसर ठरू शकणारे तपशील आड येऊ न देता शर्मा लोकांचा विचार करीत. गेली तब्बल २४ वर्षे त्यांच्यावर माओवादी-समर्थक असल्याचे छुपे आरोप होत राहिले होते. त्यांची पर्वा न करता ते लिहीत राहिले. हे लिखाण अनेकदा कुठल्याशा स्वयंसेवी संस्थांच्या परिसंवादात वाचावयाच्या दीर्घ निबंधांपुरते असे, तर काही वेळा ‘आदिवासी विकास : एक सैद्धान्तिक विवेचन’ या पाच आवृत्त्या निघालेल्या हिंदी- इंग्रजी पुस्तकासारख्या अनेक पुस्तकांचे. त्यांच्या प्रकाशित पुस्तक/पुस्तिकांची संख्या ७० हून अधिक भरेल.
लोककल्याणाचा ध्यास आणि विहित सरकारी सेवेतून मिळणारे ‘देशसेवे’चे समाधान यांपैकी पहिल्या पर्यायाची निवड कायम ठेवणारे शर्मा गेल्या रविवारी, ६ डिसेंबर रोजी रात्री कालवश झाले.