सर्वोत्कृष्ट आधारित पटकथाकार म्हणून १९७० साली ‘ऑस्कर’च्या अंतिम यादीत, तर ‘द डेस्टिनी ऑफ मी’ या नाटकाचे लेखक म्हणून पुलित्झर पुरस्कारांच्या अंतिम यादीत (१९९३) असूनही या बडय़ा पुरस्कारांनी त्यांना हुलकावणीच दिली. पण  लेखन आणि नाटय़लेखन क्षेत्रातली अन्य अनेक अमेरिकी/युरोपीय पारितोषिके त्यांना मिळाली.. तरीही, लॅरी क्रेमर यांचे कर्तृत्व हे पुरस्कारांमध्ये मोजले जाणारे नव्हतेच. त्यांच्या दर्जेदार लेखनामागे कार्यकर्त्यांची तळमळ होती आणि कार्यकर्ता म्हणून त्यांनी तितकेच महत्त्वाचे कामही केले, ही नोंद  लॅरी क्रेमर यांच्या मृत्यूनंतरही कायम राहील. नाकारले गेलेल्यांना स्वाभिमान देणारे, अशा शब्दांत त्यांच्या निधनानंतर त्यांचे वर्णन होते आहे.

‘एचआयव्ही’ विषाणूबद्दल १९८१ पासून जागृती करण्याचे काम क्रेमर करीत होते. त्यासाठी ‘द नॉर्मल हार्ट’ (१९८५) हे नाटक त्यांनी लिहिले. ही उत्तम नाटय़कृती आहे, यावर शिक्कामोर्तब होत असताना क्रेमर मात्र अस्वस्थच होते, कारण त्यांना सरकारी धोरणांवर या जागृतीचा परिणाम काय होतो हे पाहायचे होते. अखेर दोन वर्षे वाट पाहून त्यांनी एका प्रतिष्ठित परिषदेतील भाषणात थेट आवाहन केले, ‘आता एचआयव्ही/ एड्सकडे राजकीय मुद्दा म्हणून पाहणारी संघटना आपण स्थापू या’! त्यास प्रतिसाद मिळाला आणि ‘अ‍ॅक्ट अप’ (एड्स कोअ‍ॅलिशन टु अनलीश पॉवर) संघटना स्थापन झाली.  या संघटनेने दबावगट म्हणून जे काम केले त्याच्या परिणामी बिल क्लिंटनसारख्या अध्यक्षांनी या प्रश्नाची दखल साकल्याने घेतली. त्याआधी, १९७० च्या दशकापासून समलिंगी पुरुषांमध्ये त्यांचे काम सुरू होतेच. सोबत लेखनही. ‘फॅगॉट्स’ ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी(१९७८), या लिंगभावी गटाचे प्रश्न मांडते. या गटाच्या आरोग्याचे प्रश्नही निराळे असू शकतात, हे तेव्हापासून क्रेमर सांगत होते. एचआयव्हीविषयी जागृती करणाऱ्या पहिल्या काहीजणांत त्यांचे नाव घेतले जाते.  दोन कथासंग्रह, सहा नाटके, दोन लेखसंग्रह, तीन चित्रपटांच्या पटकथा या त्यांच्या लेखनसंभारासह ‘द ट्रॅजेडी ऑफ टुडेज गेज’ हे २००४ सालचे त्यांचे भाषणदेखील ‘वाङ्मया’त गणले जाते.

स्वत: समलिंगी लिंगभाव असल्याने त्या गटाचे प्रश्न त्यांनी मांडले, हे खरे. मात्र एकदा या क्षेत्रात काम करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी ‘परिस्थिती आमच्या विरुद्ध आहे’ अशी नुसती तक्रार केली नाही; तर ती बदलण्याचा चौफेर प्रयत्न केला आणि परिस्थिती बदलून दाखवली, हे त्यांच्या जगण्याचे मोल! अशा प्रयत्नांचे सत्व लिखाणात उतरल्याने लेखक म्हणून ते अजरामर ठरतील.