‘वेस्टर्न’ चित्रपटांचा एक काळ होता, त्यांमध्ये घोड्यावरले काऊबॉय नायक कितीही खून करून उजळ माथ्याने वावरत. ही असली धडाडीची कथानके कालबाह््य वाटू लागली, तेव्हा लॅरी मॅकमट्र्री लिहिते झाले होते. जन्म १९३६चा, टेक्सासमध्ये रँच राखणाऱ्या त्यांच्या घराण्यात ‘बुकंबिकं वाचन्या’ची परंपरा नव्हती, तरीही अवघे २५ वर्षांचे असताना पहिली कादंबरी प्रकाशित झाली. मग लिहीतच गेले. टेक्सास याच राज्यात वाढलेले लॅरी, टेक्सासच्या मातीतल्या कथा सांगत राहिले. कालौघात या कथांवर चित्रपट आणि चित्रवाणी मालिका निघून, एके दिवशी लॅरी ‘ऑस्कर’ विजेतेही ठरले होते. वाचक-लेखक आणि ग्रंथविक्रेता म्हणूनच जगलेल्या लॅरींचे, २५ मार्च रोजी निधन झाले.

लॅरी यांचे वडील आणि आजोबाही शेतकरी, पशुपालक. पण दूरचा भाऊ महायुद्धावर जाताना ग्रंथपेट्या ठेवून गेला, ती पुस्तके वाचून सहा वर्षांच्या लॅरीने लेखक होण्याचे ठरवले. पुढे खरोखरच कादंबरी लिहिल्यावर, यात भागणार नाही म्हणून लेखनकला-अध्यापकाची नोकरीही त्यांनी काही काळ केली. पण त्यात जीव रमला नाही. दरम्यान, टेक्सासबद्दल लिहिण्यासाठी ‘गुगेनहाइम फेलोशिप’ मिळाली, त्यातून एक निबंधसंग्रह तयार झाला. टेक्सास हे राज्य गुलाम प्रथेला कवटाळणारे, हिंसक आणि पुरुषी. सामाजिक मागासपणाची ही लक्षणे आपल्या राज्यात दिसतात, हे लॅरींना माहीत होते आणि ‘हे मला बदलायचे आहे पण माझ्याच्याने ते होत नाही’ याची जाणीवही त्यांना होती. कदाचित यामुळेच, ‘बुक्ड अप’ हे पुस्तकांचे दुकान त्यांनी वॉशिंग्टन या राजधानीच्या शहरातच काढले. जुनी, दुर्मीळ पुस्तके हे या दुकानाचे वैशिष्ट्य होते.

दुकान सांभाळतानाच लेखनही सुरू राहिले. एक नायक, त्याची एखादी शौर्यकथा, मग तिचा पुढला भाग अशा ठरलेल्या रस्त्यानेच ते जात राहिले असले तरी, नेहमीच्या- ठरीव- शौर्यकथांपेक्षा त्यांच्या कादंबऱ्यांतील पात्रे निराळी असत, त्यांतून स्वभावदर्शन आणि समाजदर्शन घडे. त्यामुळेच, ‘लोनसम डव्ह’ या कादंबरीला पुलित्झर पुरस्कारही मिळाला होता.

सलमान रश्दी यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस’मुळे चिडून इराणच्या आयातुल्ला खोमेनींनी रश्दीहत्येचा फतवा काढला, त्याविरुद्ध जोरकसपणे वातावरणनिर्मिती करण्यात लॅरी यांचा पुढाकार होता. ‘पेन’ या जागतिक साहित्यिक-संघटनेचे ते स्थानिक पदाधिकारी होते. पुढे १९८९ मध्ये (पण बर्लिन भिंत पाडली जाण्यापूर्वी), ‘डाव्या’ लेखकांना अमेरिकेत प्रवेश नाकारणारा १९५२ पासूनचा कायदा हा एक प्रकारे पोलादी पडदाच आहे, असा विरोध त्यांनी मुखर केला होता. अर्थात, त्यांनी स्वत:ला कधीच एखाद्या राजकीय विचाराला बांधून घेतले नव्हते. मनुष्यस्वभावांच्या चकमकी आणि त्यातून निर्माण होणारे घटनाक्रम, हेच त्यांच्या कादंबऱ्यांचे विषयद्रव्य राहिले. घटनाप्रधानतेमुळे चित्रवाणी आणि चित्रपट रूपांतरांसाठी त्यांच्या कादंबऱ्या लोकप्रियच ठरल्या. चित्रवाणी क्षेत्रातील पुरस्कारांची नामांकनेही त्यांना मिळाली. मात्र त्यांना ‘सर्वोत्कृष्ट आधारित पटकथे’चे ऑस्कर (२००५) मिळाले, ते स्वत:च्या कादंबरीसाठी नव्हे… ‘ब्रोकबॅक माऊंटन’ या चित्रपटाच्या पटकथेचे सहलेखन, दुसऱ्याच कथेवरून त्यांनी केले होते!