जिनिव्हाजवळील प्रयोगशाळेत अनेक प्रयोग केल्यानंतर गॉड पार्टिकल म्हणजेच हिग्ज बोसॉनचे अस्तित्व सिद्ध झाले होते. हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. हा कण अस्तित्वात असावा असे भाकीत १९६४ मध्ये वर्तवण्यात आले होते. जगभरातील अनेक वैज्ञानिक यासाठी काम करीत होते. त्यातील एक होते डॉ. लियोन लेडरमन. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने परवा या जगाचा निरोप घेतला.

लियोन यांचा जन्म १५ जुलै १९२२ रोजी न्यू यॉर्क शहरात झाला. तेथेच शालेय शिक्षण घेतल्यानंतर रसायनशास्त्र हा विषय घेऊन ते पदवीधर झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तीन वर्षे त्यांनी अमेरिकी सैन्यात काढली. या काळात त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास सुरू केला. या विषयात त्यांना रुची वाटू लागल्याने सैन्यदलातील नोकरी सोडून त्यांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथेच त्यांनी संशोधन करून पीएचडी मिळविली. १९५८ मध्ये ते याच विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक बनले. दोन वर्षांनंतर त्यांनी आधी फोर्ड फाऊंडेशनचे फेलो म्हणून दोन वर्षे काम केले. तेथून ते फर्मिलॅबचे संचालक बनले. येथे त्यांना संशोधनासाठी बराच वाव मिळाला. विज्ञानविषयक चळवळीतही त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. १९९१ मध्ये लियोन हे ‘अमेरिकन असोसिएशन फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’चे अध्यक्ष बनले. शालेय अभ्यासक्रमात रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या तुलनेत भौतिकशास्त्राला प्राधान्य मिळावे यासाठी काही शास्त्रज्ञांनी ‘फिजिक्स फर्स्ट’ ही स्वतंत्र चळवळ अमेरिकेत सुरू केली. लियोन हे त्यातील एक प्रमुख होते. लोकांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी विज्ञानविषयक पुस्तके लिहिली गेली पाहिजेत, असे ते आग्रहाने सांगत. ‘द गॉड पार्टिकल’ हे त्यांचे पुस्तक तेव्हा जगभरात गाजले. याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. १९८८ मध्ये म्यूऑन न्यूट्रिनोच्या शोधाबद्दल त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. या शोधात मेल्विन श्वार्त्झ आणि जॅक स्टीनबर्गर हेही सहभागी असल्याने या तिघांनाही हा पुरस्कार विभागून देण्यात आला. याशिवाय त्यांना वूल्फ पारितोषिक, अर्नेस्ट ओ लॉरेन्स पदक असे अनेक प्रतिष्ठेचे मानसन्मान मिळाले.

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी देशातील विज्ञानविषयक धोरणांसमोरील आव्हानांवर चर्चा केली पाहिजे, असे  त्यांचे मत होते. अखेरच्या काळात त्यांना असाध्य रोगाने ग्रासले. यावरील उपचार खूपच महागडे असल्याने शेवटी त्यांना हा खर्च भागवण्यासाठी  नोबेल पारितोषिकाचे पदकही विकावे लागले. रसायनशास्त्राकडून भौतिकशास्त्राकडे वळलेल्या या वैज्ञानिकाचे काम काम थक्क करणारे होते. येणाऱ्या पिढय़ांसाठी त्यांचे कार्य मार्गदर्शकच राहील.