News Flash

वसंत वानखेडे

कॅनव्हास पुन:पुन्हा पाहिलात तरच ‘हा रंग नसून कापड चिकटवले आहे

चित्रकार वानखेडे यांची ही अद्वितीय शैली, अखेर रविवारी त्यांच्या निधनाने निमाली.

कॅनव्हास पुन:पुन्हा पाहिलात तरच ‘हा रंग नसून कापड चिकटवले आहे’ हे कळावे, असा अनुभव वसंत वानखेडे यांची चित्रे पहिल्यांदा पाहणाऱ्यांना हमखास येई! कापडांचे थर एकमेकांवर ते अशा कौशल्याने लावत की, जणू रंगच एकमेकांत मिसळले आहेत असे वाटे. चित्रकार वानखेडे यांची ही अद्वितीय शैली, अखेर रविवारी त्यांच्या निधनाने निमाली. ते केवळ शैलीकार नव्हते. एरवी कापडाची चिकटचित्रे (कोलाज) करणाऱ्यांनी कौशल्य आणि कारागिरी यांच्या दर्शनात धन्यता मानली असती, तशी ती न मानता अमूर्त आशयाच्या प्रकटीकरणाकडे वसंत वानखेडे यांचा प्रवास सुरू होता. टीकाकार असे मानत की, वानखेडे यांनी कापड हे माध्यम वापरून केलेली ही चित्रे निव्वळ प्रचलित अमूर्त चित्रांच्या दृश्यवैशिष्टय़ांशी मिळतीजुळती आहेत.. पण टीकाकारांचे हे मत खासगीतच राहिले आणि वानखेडे मात्र त्याहून खूप पुढे गेले!

हे पुढे जाणे वानखेडे यांना (आणि त्यांनाच) का जमले असावे? ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मधील रेखा व रंगकलेचे शिक्षण (१९५९) आणि पुढे ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये नोकरी करताना वारली कलेबद्दल किंवा चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याबद्दल केलेले चित्रपट यांतून चित्रकलेबाबतचा अभ्यासूपणा वानखेडे यांनी दाखवून दिलेला होताच; पण तेवढय़ाने भारतीय अमूर्तकार म्हणून पुढे जाणे जमते का? भारतीय अमूर्तचित्रांचे एक वैशिष्टय़ म्हणजे, ‘चित्र कशाचेच नाही आणि कशाचेही आहे’ हा दृश्यगुण. तो साधण्यासाठी भारतीय आध्यात्मिक परंपरेचा अभ्यास वानखेडे यांच्याकडून झाला होता. इतकेच काय, डोळसपणे त्यांनी श्री. नखाते महाराज यांना आपले गुरूही मानले होते. अनेकदा वानखेडे सारेच्या सारे श्रेय गुरूंनाच देत, तेव्हा ऐकणाऱ्याला ही अंधश्रद्धा वाटे; पण वानखेडे यांचा विनम्रभाव, त्यांची पुण्यशील पापभीरू वृत्ती एरवीही दिसे आणि अशा भाववृत्तींचा थारा अंधश्रद्धेत असूच शकत नाही- तो श्रद्धेतच असतो, अशी खात्री विचारांती पटे.
या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शरीराची साथ म्हणावी तशी नव्हतीच. शारीरिक उणेपणावर त्यांनी जिद्दीने मात केली होती, पण वाढते वय आणि मूत्रपिंडविकार यांनी या कलावंताची झुंज एकतर्फी केली. उणेपणाचे पारडे जड होत गेले. चाहत्यांची साथ त्यांना जिवंतपणीच मिळावी, यासाठी ‘बोधना’सारख्या संस्थेने केलेले प्रयत्नही फार कामी आले नाहीत. अखेर वानखेडे यांनी जग सोडले तेव्हा कलावंताच्या एकाकीपणाची जाणीवच प्रबळ ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2015 2:25 am

Web Title: vasant wankhede no more
टॅग : Painter
Next Stories
1 मॅथियस एनार्ड
2 हरजीत सिंग सज्जन
3 तीरथ सिंग ठाकूर
Just Now!
X