24 January 2019

News Flash

वीणा सहजवाला

महिलांनी अभियांत्रिकीकडे वळावे यासाठी त्यांनी ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्रॅम’ सुरू केला आहे.

वीणा सहजवाला

प्लास्टिकपासून पर्यावरणाला धोका व नंतर त्यावरची बंदी हे विषय सध्या चर्चेचे ठरले आहेत. प्लास्टिकपासून जसा पर्यावरणाला धोका आहे तसाच तो ई-कचऱ्यापासूनही आहे. वापरलेल्या बॅटरी, बंद पडलेले मोबाइल फोन, संगणक, लॅपटॉप, रेडिओ, सीडी प्लेअर अशा अनेक वस्तू वापरातून बाद झाल्या की, त्यांचे काय करायचे हा मोठा प्रश्न असतो. त्यातून पर्यावरणाची समस्या निर्माण झाली आहे; त्यावर ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशाच्या एका महिला वैज्ञानिकाने उत्तर शोधले आहे. त्यांनी अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा फेरवापर करण्यासाठी सूक्ष्म कारखाना म्हणजे मायक्रोफॅक्टरी सुरू केली आहे. त्यांचे नाव आहे वीणा सहजवाला. त्यांच्या मायक्रोफॅक्टरीत स्मार्टफोन, लॅपटॉप यांतील काही भागांचा फेरप्रक्रिया करून इतर गोष्टींसाठी वापर केला जातो. त्यामुळे या वस्तू पर्यावरणात मिसळल्याने निर्माण होणारे धोके टळतात.

वीणा यांचा जन्म मुंबईचा. कचरा, पर्यावरण या समस्यांची जाण याच शहराने त्यांना दिली. पुढे कानपूरच्या आयआयटीतून बीटेक् पदवी घेतल्यानंतर, त्यांची कारकीर्द यंत्र-अभियांत्रिकीत सुरू झाली. सुरुवातीला त्यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पोलाद उद्योगातही काम केले. महिलांनी अभियांत्रिकीकडे वळावे यासाठी त्यांनी ‘यंग इनोव्हेटर्स प्रोग्रॅम’ सुरू केला आहे. इलेक्ट्रॉनिक कचरा जाळला जातो किंवा पुरला जातो, त्यापासून पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांच्या मायक्रोफॅक्टरीज या विकसनशील देशांना वरदान आहेत. या कारखान्याच्या पहिल्या टप्प्यात, इलेक्ट्रॉनिक उपकरण सुटे केले जाते, नंतर त्यामधील कुठले भाग उपयोगाचे आहेत हे खास रोबोट ठरवत असतो. एका लहान भट्टीत या भागांचे रूपांतर नियंत्रित तापमानाला धातू संमिश्रे किंवा वेगळ्या पदार्थामध्ये केले जाते. सहजवाला यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत; त्यात शाश्वत विकास पुरस्कार, युरेका पुरस्कार, प्रवासी भारतीय सन्मान यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सस्टेनेबल मटेरिअल्स रीसर्च अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संचालक म्हणून त्या अनेक वर्षे कार्यरत आहेत. वापरून फेकून दिलेल्या टायरचा वापर त्यांनी पोलादनिर्मितीत कोळसा व कोकला पर्याय म्हणून करता येतो हे दाखवून दिले. अशा प्रक्रियेतून जे पोलाद निर्माण होते ते पर्यावरणस्नेही म्हणजे ग्रीन स्टील असते. या सगळ्या कचऱ्यात कर्करोगकारक घटक असतात, त्यामुळे विकसनशीलच नव्हे, तर प्रगत देशातही या कचऱ्याची विल्हेवाट हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर त्यांनी अभियांत्रिकीतून वेगळा मार्ग प्रशस्त केला आहे.

First Published on April 10, 2018 2:14 am

Web Title: veena sahajwalla