03 June 2020

News Flash

झरीना हाश्मी

एका जागी स्थिर नसण्याचा उत्कट अनुभव मांडणाऱ्या झरीना यांनी अखेरचा श्वास लंडनमध्ये घेतला.

झरीना हाश्मी

घराची ओढ लागलेले स्थलांतरित आणि घरातच आठवडेच्या आठवडे काढावे लागलेले अन्य, अशा दोन प्रकारच्या माणसांत जगाची विभागणी झालेली असताना, ‘घर’ या संकल्पनेवर दृश्यकलेमधून चिंतन करणाऱ्या झरीना हाश्मी रविवारी निवर्तल्या. त्यांचा जन्म अलीगढम्चा, लग्नापूर्वीचे  घर अलीगढम् मुस्लीम विद्यापीठाच्या प्रांगणातलेच पण नंतर माहेरचे सारे पाकिस्तानात गेले, पती भारतीय राजनैतिक अधिकारी असल्याने पूर्व/पश्चिमेच्या अनेक देशांत झरीना यांचा संसार वाढला.. अशा उमेदीच्या काळानंतर न्यू यॉर्क शहरात त्यांनी स्टुडिओ स्थापला होता. एका जागी स्थिर नसण्याचा उत्कट अनुभव मांडणाऱ्या झरीना यांनी अखेरचा श्वास लंडनमध्ये घेतला.

त्या गणित विषयात बी.एस्सी. झाल्या होत्या. मुद्राचित्रणाच्या तंत्राची आवड त्यांना बरीच नंतर लागली. पॅरिसमध्ये कृष्णा रेड्डी आणि स्टॅन्ले हायटर या प्रख्यात मुद्राचित्रकारांकडे काष्ठमुद्रणाचे तंत्र त्या शिकल्या. पुढे जपानला गेल्यावर टोक्योमधील तोशी योशिदा यांच्या स्टुडिओत शिकताना झरीना यांच्या कलाविचाराला दिशा मिळाली. ‘आत पाहून काम करण्या’चा जपानी मंत्र त्यांनी प्रत्यक्षात आणला, तो अमेरिकेत. तेथे १९७० च्या दशकातील स्त्रीवादी चित्रकर्तीच्या ‘हेरेसीज’ या समूहात त्यांचा समावेश झाला आणि ‘पर्सनल इज पोलिटिकल’ हे स्त्रीवादी सत्य झरीना यांना उमगल्याची साक्ष त्यांच्या चित्रमालिकांतून मिळू लागली. ‘छपराचा त्रिकोण आणि खोलीचा चौरस’ हा घराचा सर्वज्ञात आकार झरीना यांनी विविध प्रकारे वापरला. १९८० च्या चित्रांत याच आकारांचा वावटळीसारखा भोवरा होऊन फूल दिसले, तर २००० नंतर हाच आकार थडग्यांवरल्या दगडाशी नाते सांगू लागला. ‘चाके असलेले घर’ ही प्रतिमा सन २००० नंतर त्यांच्या मुद्राचित्रांतच नव्हे तर शिल्पांमध्येही आली. घरांचे आराखडे, तसेच गावांचे, अगदी दोन देशांना अलग करणाऱ्या सीमांचेही नकाशे एक प्रतिमा म्हणून त्यांच्या मुद्राचित्रांमध्ये आले. या साऱ्यांतून हरवलेल्या घर- गाव- प्रदेशाचे धीरगंभीर आणि समंजस गाणे जणू डोळय़ांनी ऐकू येई! अगदी अलीकडे, गेल्या १५ वर्षांत त्यांनी सुवर्णवर्खाचा (गोल्ड लीफ) सढळ वापर करून प्रकाश, पारलौकिकत्व, एकसंधपणातूनही दिसणारे तुटक पापुद्रे यांचा दृश्यानुभव दिला होता. काष्ठ-मुद्राचित्रणाचे काळेपांढरे वास्तव जाणून, रेषा आणि तिचे तुटक तुकडे यांच्यामधूनच भावनांची अभिव्यक्ती करण्याचा मार्ग झरीना यांनी शोधला होता. हा मार्ग, एकरंगी कपडे घालणाऱ्या आणि करारी दिसणाऱ्या झरीना यांच्या व्यक्तिमत्त्वाला जणू समांतर. ते मितभाषी पण बुद्धीची साक्ष देणारे आणि भावनांना कमी न लेखणारे व्यक्तिमत्त्व आता निमाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2020 12:02 am

Web Title: zarina hashmi profile abn 97
Next Stories
1 उत्तम बंडू तुपे
2 जीन डाइच
3 मधुकर जोशी
Just Now!
X