६९ वर्षांच्या अभिनेत्री रेखा ‘व्होग अरेबिया’च्या ‘कव्हर पेज’वर झळकल्या आहेत. डिझायनर मनीष मन्होत्रा यांच्या सोनेरी रंग आणि एम्ब्रॉयडरीचा खास वापर केलेल्या कलेक्शनमध्ये सजलेल्या, ‘स्टेटमेंट ज्वेलरी’ मिरवणाऱ्या रेखांच्या सौंदर्याबद्दल ‘नेटकरी’ कमेंटस् मध्ये कौतुकाचा वर्षांव करत आहेत. रेखा यांच्या बॉलिवूडमधल्या प्रवासाची सुरूवात मात्र ‘एक जाडी आणि काळी मुलगी’ म्हणून अनेकांनी नाक मुरडण्यासह झाली होती. उत्तम अभिनेत्री आणि ‘फॅशन दीवा’ म्हणून प्रसिद्ध होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थोडक्यात- ‘भानूरेखा गणेशन्’ असं ‘बॉलिवूड’मध्ये न बसणारं नाव असलेली आणि हिंदीचा काहीही गंध नसलेली काळीसावळी आणि ‘चब्बी’ (अनेकांच्या भाषेत ‘जाड’) मुलगी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करू लागली. तो काळ साठच्या दशकाच्या शेवटाकडला.

आणखी वाचा : आहारवेद : वजन आटोक्यात ठेवणारा मका

अभिनयात करिअर घडवण्याची एक संधी मिळावी म्हणून माणसं आयुष्यभर प्रयत्न करत असतात. या मुलीला हिंदी चित्रपटांत काम करण्याची संधी तर मिळाली होती, पण तिला स्वत:ला ते अजिबात आवडत नव्हतं. केवळ आर्थिक नाईलाज म्हणून तिला कॅमेऱ्यासमोर उभं राहायला लागलं. भानूरेखाचे वडील ‘काधलमण्णा’ (‘लव्हर बॉय’) जेमिनी गणेशन् हे तमिळ सुपरस्टार आणि आई पुष्पवल्ली तेलुगू आणि तमिळ चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री. परंतु जेमिनी गणेशन् आणि पुष्पवल्ली यांचं नातं टिकलं नाही. घरात सहा मुलं, आर्थिक तंगी आणि पुष्पवल्ली यांची खालावलेली तब्येत, अशा स्थितीत १३ वर्षांच्या रेखाला हिंदी चित्रपटांत काम करण्यासाठी यावं लागलं.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : आई घरातही ‘बॉसी’!

लोकांशी कसं बोलावं, चित्रपटनायिका म्हणून राहणी कशी असावी, स्टायलिंग, मेकअप कसा करावा, याची रेखा यांना काहीही माहिती नव्हती. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्या ते हळूहळू शिकत गेली आणि १९८० पर्यंत रेखा यांच्या दिसण्यात कमालीचा बदल झाला होता. त्या ‘स्टार’ झाल्या होत्या. करिअरच्या सुरूवातीच्या काळात रेखा यांचा सावळा रंग आणि ‘चब्बी फिगर’ यांवर अनेकांकडून टीका झाली. त्यांच्या दिसण्यात जो बदल झाला, त्यावरून त्यांनी रंग गोरा करून घेण्यासाठी उपचार करून घेतलेत अशी मोठी चर्चा होती. रेखा यांनी उत्तम मेकअप करणं शिकून घेतलं. त्यांना फॅशनची आणि पेहरावांमध्ये वापरली जाणारी मटेरिअल्स, त्यावरचं भरतकाम इत्यादींची जाण आहे. त्या हिंदी आणि उर्दू शिकल्या. योगासनं आणि ध्यानधारणा यांच्या आधारे ‘फिट’ राहू लागल्या.

हिंदी चित्रपटांत अभिनेत्री म्हणून टिकण्यासाठी लठ्ठ दिसून चालणार नव्हतं. सिमी गरेवाल यांना दिलेल्या प्रसिद्ध मुलाखतीत रेखा म्हणतात, ‘मला मध्ये मध्ये जंक फूड आणि चॉकलेटस् खाण्याची सवय सोडण्यासाठी दोन-अडीच वर्षं लागली. ‘घर’ हा चित्रपट आला (१९७८) तेव्हा लोक म्हणू लागले, की रेखामध्ये बघा कसा ‘ओव्हरनाईट’ बदल झालाय! पण तसं नव्हतं. काय खावं-काय नको, याविषयी मला तेव्हा काही माहिती नव्हती. मी ‘डाएट’च्या नावाखाली उपासमार करून घ्यायचे. महिनोंमहिने फक्त ‘इलायची मिल्क’ पिऊन राहायचे, पॉपकॉर्न डाएट करायचे. ते चुकीचं होतं. पण जीवनाचा अनुभव येत गेला तसं कसं दिसावं, वागावं, बोलावं, हे मी आपोआप शिकत गेले. जे-जे समोर चांगलं दिसायचं, ते मी निरीक्षणातून टिपायचे.’ ‘खून भरी माँग’साठी (१९८८) पुरस्कार मिळाला, तेव्हाच मला अभिनेत्री असण्याचं महत्त्व पटलं, तोपर्यंत मी अभिनयाकडे गांभीर्यानं पाहिलं नव्हतं,’ असंही रेखा यांनी म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यातील प्रेमसंबंधाची चर्चा ‘बॉलिवूड गॉसिप’मध्ये नवीन नाही. अमिताभ यांनीच रेखाला राहण्या-बोलण्या-वागण्याची कला शिकवली, असंही म्हटलं जातं. प्रेमाच्या गॉसिपला रेखा यांनी दुजोरा दिलेला नसला, तरी अमिताभ यांचा अभिनेता म्हणून आपल्यावर मोठाच प्रभाव असल्याचं रेखा जाहीरपणे मान्य करतात. त्या म्हणतात,‘अमिताभ यांच्याबरोबर काम करताना (१९७६) मला चित्रपटांच्या सेटवर गांभीर्यानं काम करायला हवं, हे उमगलं. ‘प्रोफेशनॅलिझम’, संवाद म्हणण्याची पद्धत हे सारं कसं असावं, हे मी त्यांच्यात पाहात होते आणि इतरांप्रमाणेच मीही त्यामुळे प्रचंड प्रभावित झाले.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज रेखा नियमितपणे चित्रपटांत काम करत नसल्या, तरी कोणत्याही फॅशन इव्हेंटमध्ये त्यांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष असतं. बहुतेकदा उंची साडी, लांबसडक मोकळे केस आणि पारंपरिक दागिने परिधान करणं आवडणाऱ्या रेखा यांनी ‘व्होग अरेबिया’मधल्या थोड्या वेगळ्या स्टायलिंगच्या पेहरावांना आपल्यातल्या नजाकतीनं तितकाच उत्तम न्याय दिला आहे. विशेषत: यातले त्यांचे ‘मॉडर्न डे क्लिओपात्रा’ म्हणून ओळखले जाणारे मोरपंखी हेडगिअर घातलेले फोटो लोकप्रिय झाले आहेत. ‘टाईमलेस आणि ग्रेसफुल ब्यूटी’ म्हणून संबोधन लागण्यामागे वर्षानुवर्षांची तपश्चर्या आहे, हे रेखा यांच्या उदाहरणावरून अधोरेखित होतं.
lokwomen.online@gmail.com