पावसाळ्यात बागेची जरा जास्त काळजी घ्यावी लागते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पाणी कमी मिळालं किंवा झाडं सुकून गेली यांसारख्या अडचणी पाऊस काळात मुळीच येत नाहीत, तर उलट पावसाच्या पाण्यावर झाडांची उत्तम वाढ होत असताना कुंडीत किंवा वाफ्यात इतर बऱ्याच गोष्टींची वाढ होत असते. ज्याचं नियंत्रण आपल्याला करणं आवश्यक असतं. ‘अळू’ ही खरं तर किती साधी भाजी, अगदी सहज वाढवता येणारी. पावसाळ्यात उत्तम वाढणारी.,. पण मागल्या पावसाळ्यात माझा अळू काही बहरेना. मे महिन्यात नवीन मोठ्या कुंड्यांमधे खत माती अशी सगळी सरबराई करून कंद लावले होते, हेतू हा की पाऊस आला की चांगली रूंद पानं मिळावीत.
जूनमध्ये अपेक्षेप्रमाणे कंदांना फुटवे आले, हिरव्या नाजूक पानांच्या सुरनळ्या दिसायला लागल्या. पहिली पाचसहा पानं अगदी रूंद आणि तजेलदार अशी निघाली. पहिल्या बहराची चांगली भाजी मिळाली. पण मग मात्र पानांचा आकार कमी होऊ लागला. याचं कारण होतं, कुंडीत वाढलेली इतर प्रजा. मी त्याला ‘तण’ म्हणणार नाही, कारण तण म्हणून वाढणाऱ्या वनस्पतीसुद्धा आपल्या खूप उपयोगी पडणाऱ्या असतात.तर त्यांना म्हणू या हिरवी आगंतुक प्रजा.यात भरपूर असं गवत होतं, भुई आवळ्याची रोपं होती .टाकळ्याची हिरवी गोल गरगरीत पानं डोकावत होती.खरं तर भुई आवळा, टाकळा या रानभाज्या. त्यांना तसेच ठेवत, गवत तेवढं काढून घेतलं आणि कंपोस्ट बीनमध्ये टाकलं.आता अळूसाठी वाढीला जागा तयार झाली होती.
पावसाळ्यात कुंडीत वाढणाऱ्या आगंतुक मंडळींमुळे मुख्य झाडांची वाढ मंदावते. त्याला पुरेशी अन्नद्रव्ये मिळत नाहीत. अशावेळी ही अनाहुत रोपे उपटून बारीक कटींग करून, त्यांची मुळं वेगळी करून ती त्याच कुंडीत घालावी, जेणेकरून त्यांनी मिळवलेली अन्नद्रव्ये मातीला परत मिळतील.या कृतीमुळे झाडाला दुहेरी फायदा मिळतो. एक तर खत मिळतं आणि दुसरं म्हणजे मातीतील जटिल पोषकद्रव्ये- जी या अनाहुत प्रजेने शोषलेली असतात, ती सुलभ रीतीने वापरता येतील अशा स्वरूपात मिळतात. वरवर पाहायला गेलं तर ही फार छोटी कृती आहे, पण झाडाच्या वाढीवर त्याचा फार परिणाम होतो.पाऊस चालू झाला की नेहमी झाडे लावा, वृक्षारोपण करा असे संदेश जिकडे तिकडे वाचायला मिळतात. अनेक संस्था नर्सरीतून तयार झालेली रोपे घेऊन वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पाडतात.
आपण जर आपली बाग निरखली तर मे महिन्यापासून जूनपर्यंतच्या कालावधीत आपल्या कुंडीमध्ये किंवा वाफ्यात, कुठे एखादी जांभळाची बी, एखादी आंब्याची कोय, कुठे खजरूराची बी किंवा काहीच नाही तर वड आणि पिंपळाची इवलाली रोपं उगवलेली असतातच. जुलैपर्यंत ही रोपं चांगली तरारून येतात. अतिशय मजबूत होतात. आता वेळीच त्यांना हलवलं नाही तर ती आपल्या रोपांसाठी मारक ठरतात. मग अशी रोपं उपटून जर आपण डोंगरकडे, मोकळ्या जागा, ज्या वृक्ष लावण्यासाठी योग्य आहेत, तिथे लावली तर चार महिन्यांत ती उत्तम जोर पकडतात आणि वर्षभरात छान वाढतात.नर्सरीत वाढवलेल्या रोपांपेक्षा ही अशी आपसूक उगवून आलेली रोपं अधिक सक्षम असतात. ती तग धरतात, रूजतात. आपल्या अस्तित्वातासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच झगडा केलेला असतो. परिस्थितीशी सामना करण्याची त्यांची शक्ती अफाट असते.
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर बरेच वेळा लावलेली रोपे मरतात, काही गुरांकडून खाल्ली जातात तर काही तग धरू शकत नाहीत. मग घेतलेले कष्ट बऱ्याच अंशी वाया जातात. अशावेळी घराघरांतून, बागप्रेमींकडून अशी आगंतुक रोपे मिळवली व त्यांची लागवड केली तर नक्कीच फायदा होईल.निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येक वेळी खूप खर्च करून, गाजावाजा करून कामं करण्यापेक्षा अवती भोवतीच्या प्रदेशाचे अवलोकन करत कृती केली तरी अधिक फायदेशीर ठरते.माझ्या बागेत, गच्चीवर उगवणाऱ्या या आगंतुक मंडळींसाठी मी दरवर्षी योग्य जागा शोधते. त्यांची लागवड करते. मग कधी एखाद्या सोसायटीमध्ये तर कधी रस्त्याच्या कडेला, कधी कुणाच्या फार्महाऊसमध्ये जेव्हा ती सुखेनैव वाढताना दिसतात तेव्हा अतीव समाधान होते. mythreye.kjkelkar@gmail.com