विजय पाटील

झपाटय़ाने बदललेल्या राजकीय पर्यावरणाचा परिणाम राज्यभरच्या तरुणांवर होतो आहेच.. साताऱ्यासारख्या राजकीयदृष्टय़ा सजग जिल्ह्य़ात तो स्पष्ट दिसतो. पक्षांतरितांना तगडे समर्थन मिळताना दिसते, तसेच टीकाही ऐकू येते..

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांच्या नजरा

स्वातंत्र्यलढय़ासह अनेक चळवळींचे केंद्रस्थान असलेला सुजलाम् सुफलाम् असा कृष्णाकाठ छत्रपती शिवाजी महाराज आणि दिवंगत माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श विचाराने भारावून गेल्याचे प्रकर्षांने जाणवते. परिणामी हिंदवी स्वराज्य अन् यशवंत-विचारांचे राजकारण, समाजकारण जणू कृष्णाकाठच्या तरुणांच्या अंगी बाणले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचार, आचार, तत्त्वे, नीतिमूल्ये यांचा आदर इथे जाणवतो, अनेक व्याख्यातेही त्याच अनुषंगाने आपल्या विचारांची बैठक मांडत असल्याचे त्यांना ऐकल्यानंतर स्पष्टपणे लक्षात येते. परंतु अलीकडच्या निवडणुकांचा बाज पाहिला तर गेल्या दोन-तीन दशकांपूर्वीच्या निवडणुका या इतिहासजमाच झाल्या की काय, अशी शंका कुणालाही यावी. निवडणूक-काळात संपूर्ण सामाजिक वातावरण पुरते राजकीय होऊन जाते. एकेकाळी कार्यकर्ते केवळ पक्ष, नेता म्हणून नव्हे तर विचार आणि संस्कृती म्हणून ठरावीक एका पक्षाशी बांधील राहत. त्यातूनच पक्ष जो उमेदवार देईल तो आपलाच, असे मानून त्या उमेदवाराला सर्वतोपरी सहकार्याची भूमिका हा स्थायिभाव होता. पण आज इथले तरुण कितीही आदर्शवादी असले, तरी राजकारणाच्या वेगामुळे झालेली स्थित्यंतरे कुणालाच टाळता येत नाहीत..

ही स्थित्यंतरे राजकारणात झाली, तसेच समाजकारणातही त्यांचे प्रतिबिंब पडत गेले. याचे मूळ कारण म्हणजे पक्ष, संघटनांचा एककल्लीपणा व घराणेशाहीचा उद्रेक हेच. राजकीय पक्ष व उमेदवारांनी सत्तेतून पैसा अन् पैशातून सत्ता असे बनवलेले समीकरण हळूहळू कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्याही ध्यानी येऊ लागल्याने ‘जसा राजा तशी प्रजा’ तसेच ‘जसे लोकप्रतिनिधी तसे कार्यकर्ते, मतदार’ असे सूत्र रुजू लागले. कार्यकर्ते आपल्या आमदार, खासदाराच्या वाढत्या प्राबल्याबरोबरच कार्यकर्त्यांच्या धनसत्तेचाही तुलनात्मक विचार करू लागला. जर नेताच विकासाच्या इमल्यांचे स्वप्न दाखवून स्वार्थाचे गाठोडे भरत असल्याचे दिसत असेल, तर कार्यकर्तेही काही तरी अपेक्षा बाळगणारच.. ही केवळ एका जिल्ह्य़ाची किंवा महाराष्ट्राची नव्हे, देशाचीच गत. आजकाल तर ज्येष्ठ कार्यकर्त्यांना नावापुरतेच स्थान राहिले असून त्यांच्या जागी त्यांचे कौटुंबिक वारसदार सर्वत्र मिरवत असल्याचे दिसते. हा बदल होत असतानाच समाजमाध्यमे, वाऱ्याच्या वेगाने चालणाऱ्या दूरचित्रवाणीच्या समस्त वृत्तवाहिन्या, त्या वाहिन्यांवरल्या आक्रस्ताळी चर्चा, प्रचाराची खालावणारी पातळी या साऱ्याचा परिणाम तरुणवर्गावर होतो आहे.

समाजमाध्यमांपैकी ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ हे माध्यम अधिक प्रभावी ठरल्याचेही दिसते. शहरी असो वा ग्रामीण तरुणांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरील समूहांची संख्या आणि त्यावरील वैचारिक मतांच्या आदान-प्रदानाचे प्रमाण दिवसागणिक वाढते राहिले आहे. एखाद्याने चुकीची ‘पोस्ट’ टाकल्यास त्यावर होणारा शाब्दिक हल्ला पुढे चौकाचौकातही चर्चेत आल्याचे पाहायला मिळते. दुसरीकडे, वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांमधील नेमका कोणता मजकूर वाचण्यासारखा आहे, याचीही चर्चा आज समाजमाध्यमांवर ओघाने होत राहते. त्यातूनच वर्तमानपत्रांच्या लेखनाची तुलना होऊ लागली आहे. त्यातील साधक-बाधक चर्चेतून प्रचंड खपाची, खपालाच सारे काही समजणारी जी वृत्तपत्रे आहेत, त्यांच्या ‘पेडन्यूज’सारख्या अपप्रकारांवरही समाजमाध्यमांतून हल्ले झाले नसतील तर नवलच. हा बदलांचा एकंदर प्रवास पाहता ‘समाजमाध्यमे नवी पिढी बिघडवतात’ असा सरळसोट आरोप कितीसा खरा याबाबत निश्चित प्रश्नचिन्ह उपस्थित होते. समाजमाध्यमांचा चांगल्याही प्रकारे वापर होत असल्याचे नजरेआड करून चालणार नाही, हेही दिसते.

उदयनराजेच उठावदार!

विधानसभेच्या निवडणुकीत, तरुण कार्यकर्त्यांना घडवणारे हे सारे घटक सातारा जिल्ह्य़ातही दिसून आलेच. पण नेत्यामुळे कार्यकर्ता घडतो, हेही पुन्हा दिसले. नेत्यांच्या पक्षांतरासोबत आपलाही पक्ष बदलला आहे, याची जाणीव ठेवणारे कार्यकर्तेही दिसले. साताऱ्यातील नेतृत्वाची चर्चा हल्ली देशपातळीवर झाली, ती छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यामुळे. केवळ शंभर दिवसांत आपल्या खासदारकीचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन भाजपवासी झाल्याने उदयनराजे देशभर गाजले. आपल्या वेगळ्या शैलीमुळेही उदयनराजे भोसले यांचे नाव आघाडीवर राहते; तसेच त्यांच्या पक्षांतराबद्दलच्या अनेक वक्तव्यांमुळे व घडामोडींमुळेदेखील. देशात आज शेकडो राजकीय संस्थाने असून, तरुण नेतेही लोकांसमोर आहेत. परंतु, उदयनराजेंचे राजकारण वेगळेच, म्हणून उठावदारही. पंतप्रधान मोदी ज्यांचा गुरू म्हणून उल्लेख करतात, अशा महाराष्ट्राच्या राजकारणातील नायक असलेल्या शरद पवार यांनाही उदयनराजेंच्या चालींचा अनेकदा थांगपत्ता लागला नसावा. उदयनराजे म्हणजे कॉलर उडवणारे अन् स्वत: झुलताना इतरांना आपल्या इशाऱ्यांवर खेळवणारे आक्रमक तरुण नेते.. त्यांच्या नेतृत्वाचे हे गुणगान तरुण कार्यकर्त्यांकडून ऐकताना, उदयनराजे इथल्या युवकांवर भुरळ पाडून आहेत याची खात्री पटते. त्यांच्या भाजपप्रवेशाने अनेक मतमतांतरे व्यक्त झाली असली तरी आणि ‘काहीही झाले तरी’ राजेंना गळ्यातील ताईत मानणारा तरुणवर्ग मोठाच आहे. हे विरोधकांनाही नाकारता येत नाही. ‘जनतेच्या प्रश्नांवर आवाज बनून राहण्याचा त्यांचा स्वभाव आणि भाजपच्या सत्तेची ताकद त्यांच्या मतदारसंघाला मिळेल’ असाही दावा त्यांच्या समर्थक- विशेषत: तरुण कार्यकर्त्यांमधून व्यक्त होतो. याच वेळी राजेंना ही उपरती नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी का झाली नाही, या प्रश्नांवरून अनेक नेटकरी तरुण कोरडे ओढताना दिसतात.

सातारा जिल्ह्य़ातच आणखी दोन नेत्यांनी पक्षांतर करून आपले राजकीय कसब दाखवून दिले आहे. त्यावर अनेकांनी, ‘पक्षांतर म्हणजे त्या पक्षाची सत्ता उपभोगून नंतर साधलेला स्वार्थ’ असल्याची टीकाही केली. तर, ‘एकाच पक्षाचा शिक्का म्हणजे हुकूमशाही आहे का?’ असाही मतप्रवाह उत्तरादाखल सज्ज झाला. यंदाच्या मार्चपासूनच, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माढा मतदारसंघात दररोज विलक्षण घडामोडी होत राहिल्या. काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी काही दिवसांतच आपल्या पक्षीय पदाचा राजीनामा देऊन माढा मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी आणली आणि ते विजयीही झाले. रणजितसिंहांचा हा निर्णय साऱ्यांना पटणे शक्य नाही, हे खरे असले तरी ‘निंबाळकरांनी खासदार होताच आपल्या मतदारसंघाच्या खंडाळा, फलटण, माण, खटाव या टंचाईग्रस्त भागाचे पाणी शेजारच्या जिल्ह्य़ात पळवल्याचा मुद्दा धसास लावून याबाबतचे जुने धोरण बदलवले,’ तसेच ‘स्थानिक जनतेचे अनेक ज्वलंत प्रश्न दिल्लीदरबारीही प्रभावीपणे मांडले,’ अशी बाजू कार्यकर्त्यांनी लोकांपुढे आणली. गेल्या चार-पाच महिन्यांत रणजितसिंहांची सतत मूलभूत प्रश्नांवर आक्रमक होण्याची भूमिका तरुणांमध्ये छाप पाडून आहे. तरीही विषय राहतो, तो रणजितसिंहांनी काँग्रेसशी घेतलेल्या फारकतीचा. यावर अनेक तरुणांचे मत असे : सत्तेची ताकद मिळाल्याखेरीज व स्वपक्षाचे पाठबळ असल्याखेरीज जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर नेत्यांना तोंड उघडणेच अवघड!

रणजितसिंहांच्या विजयाचे प्रमुख वाटेकरी राहिलेले काँग्रेसचे माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनीही लगोलग आपल्या पदांचा राजीनामा देत भाजपचीच वाट धरली. तत्पूर्वी जयकुमारांनी राज्य शासनाकडून माण-खटावच्या दुष्काळप्रश्नी पावणेतीनशे कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी करून ती मान्यही करून घेतली, असा दावा गोरे व त्यांच्या समर्थकांकडून दणदणीतपणे होताना दिसला. त्याच वेळी, गोरेंची भूमिका ‘स्वार्थाने बरबटलेली’ आणि ‘मतदारांना झुलवणारी’ असल्याची जोरदार टीकाही झाली. मात्र त्यावर, ‘गोरेंनी सत्तेची वाट कापून मतदारांच्या घशाला पाणी मिळवून देण्याचे कार्य साधले’- असा विश्वास गोरे समर्थकांकडून दिला जातो.

राजकारणापासून कोरडे..

हे सारे घडत असताना माण-खटावचा तरुणवर्ग मात्र, बदलत्या समीकरणांवर स्वतंत्रपणे विचार मांडताना दिसतो आहे. रणजितसिंह व जयकुमार या दोघांनाही विकासाच्या मुद्दय़ावर बहुतांश तरुणांचे समर्थन मिळताना, ‘त्यांची राजकीय सोय त्यांनी स्वार्थी हेतूने साधली,’ अशी नाराजीही काही तरुण व्यक्त करतात. माणदेश हा दुष्काळी भाग असल्याने नापिकीमुळे माण-खटावच्या प्रदेशातील तरुण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अगदी सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून आहेत. त्यासाठी त्यांची सततची धडपडही दिसते आहे. असे तरुण राजकीय मंडळींना फारसे महत्त्व न देता आपल्या सामाजिक स्थितीवर चिंता व्यक्त करतात.

याच मातीतील मंत्री महादेव जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या मंत्रालयात व अन्यत्र माणदेशातील सव्वाशेहून अधिक तरुण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे हा प्रदेश जसा दुष्काळी आहे, तसाच तो अधिकाऱ्यांचा असल्याचेही म्हणावे लागेल. परिस्थितीवर परिश्रम व चिकाटीने मात करण्याची धमक दाखवणारा माणदेशातील तरुण न झुकणारा, न हरणारा असल्याचे अनेक दाखले देता येतील. नेत्यांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते असोत की पक्षीय राजकारणापासून दूर राहणारे असोत, दोन्हीकडल्या तरुणांच्या आकांक्षा मात्र मोठय़ा आहेत.