02 March 2021

News Flash

डावे-उजवे की उजवे-डावे?

आपल्याला जवळच्या विचारधारेचा असेल तर तो चांगला पत्रकार, आणि तसा नसेल तर तो वाईट, या मांडणीतून समाजाची बालबुद्धी दिसते..

(संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधानांच्या कार्यालयात माध्यम सल्लागारपदी नियुक्त करण्यासाठी शब्द टाकण्याची तयारी दाखवण्याइतका आत्मविश्वास अर्णब दाखवतो तेव्हा, त्याला इतके मुक्त रान देणाऱ्यांची ‘गुणग्राहकता’ही दिसते..

अध्यक्षीय निवडणुकीच्या मतदानापासून अमेरिकेतील ‘उजव्यां’च्या लाडक्या ‘फॉक्स’ वृत्तवाहिनीचा घसरलेला आलेख आणि त्याच वेळी भारतात कथित ‘उजव्यां’ना जीवश्चकंठश्च प्रिय असलेल्या ‘रिपब्लिक’ वाहिनीची निघत असलेली लक्तरे या खरे तर दोन भिन्न घटना. साधारण १२ हजार किमीच्या अंतराने विभागलेल्या दोन स्वतंत्र देशांत घडलेल्या. पण त्यांच्या मथितार्थात विलक्षण साम्य आढळते. अमेरिकेत यानंतर फॉक्सच्या धोरणात आमूलाग्र बदल होण्याचे संकेत दिसतात. तथापि भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काव्यगुणांपासून ते माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यापर्यंत अनेकांविषयी अनुदार उद्गार काढणाऱ्या, देशाच्या संरक्षण धोरणावर आगाऊ भाष्य करणाऱ्या ‘रिपब्लिक’च्या पत्रकारितेचा बुरखा टराटरा फाडला गेल्यानंतर सरकार आणि ही वाहिनी यांच्यातील तसेच सरकार पक्षाचे अनुयायी आणि ही वाहिनी यांच्यातील ‘संबंधा’त काय बदल होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

प्रथम फॉक्स वाहिनीविषयी. गेली कित्येक वर्षे ही वाहिनी अमेरिकेत सर्वाधिक प्रेक्षकसंख्येत पहिल्या क्रमांकावर आहे. या सर्वोच्च स्थानावरून फॉक्स ढळू लागली ती अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकांपासून. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंतच्या प्रसृत झालेल्या आकडेवारीनुसार ‘सीएनएन’ने फॉक्सवर मोठी आघाडी घेतल्याचे दिसते. फॉक्सच्या प्रेक्षकसंख्येत झालेली घट साधारण २० टक्के इतकी लक्षणीय आहे. इतकेच काय पण या काळात मध्यममार्गी मानल्या जाणाऱ्या एमएसएनबीसी या वाहिनीच्या प्रेक्षकसंख्येतही मोठी वाढ झाल्याचे दिसते. फॉक्स वाहिनी ही मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘री’ ओढणारी. ट्रम्प यांच्या कित्येक वादग्रस्त धोरणांचे सूतोवाच आधी फॉक्सवर झाले आणि नंतर त्याची सरकारी घोषणा झाली. मग ही धोरणे मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधणारी असोत, मुसलमान धर्मीयांना अमेरिकेत प्रवेशबंदी करणारी असोत वा करोनाला कमी लेखणारी असोत. ट्रम्प आणि फॉक्स या आणि अनेक मुद्दय़ांवर एका सुरात गायले. या वाहिनीच्या निवडणूक अंदाजानुसार ट्रम्प यांची फेरनिवड ही काळ्या दगडावरची जणू रेघ होती. पण प्रत्यक्षात झाले उलटे. या वाहिनीच्या गळ्यातील ताईत असलेले ट्रम्प यांचा दारुण पराभव तर झालाच. पण निवडणुकीस आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकाही सर्व न्यायालयांनी तथ्यहीन ठरवून फेटाळून लावल्या. त्यानंतर गेल्या महिन्यात अमेरिकी कॅपिटॉल हिलवर हल्ला करण्याचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार ट्रम्प समर्थकांकडून घडला.

या सर्वास फॉक्सची फूस होती. हे केवळ एखाद्या वृत्तवाहिनीने एखाद्या राजकीय पक्षाची तळी उचलणे नव्हते. त्यामागचे दुष्ट कारस्थान यशस्वी झाले असते तर अमेरिकेच्या लोकशाहीस नख लागले असते. ट्रम्प यांच्या नतद्रष्ट राजकारणास बेजबाबदार पत्रकारितेची जोड मिळाल्याने या संदर्भातील धोक्याचा गुणाकार झाला. पण अंतत: ते सर्व फोल ठरले. तेव्हापासून फॉक्सच्या दर्शकसंख्येत कमालीची घट झाली असून ताज्या आकडेवारीनुसार सीएनएन या वाहिनीने कधी नव्हे, ते फॉक्सला मोठय़ा फरकाने मागे टाकलेले दिसते. प्रौढ वयोगटातील बहुतांश दर्शकांनी अमेरिकेत या काळात फॉक्सशी काडीमोड घेऊन अन्य मध्यममार्गी वाहिन्यांचा आधार घेतला. यातील आश्चर्याची बाब अशी की अमेरिकेत खास उजवा, प्रतिगामी वा वर्णवर्चस्ववादी म्हणून ओळखला जाणारा जो वर्ग आहे त्यानेही फॉक्सकडे या काळात पाठ फिरवली. हवेतील या बदलाची दखल रूपर्ट मर्डॉक यांच्यासारख्या चतुर माध्यमप्रमुखाने घेतली नसती तरच नवल. त्यानुसार फॉक्सच्या सादरीकरणात आणि काही विशेष कार्यक्रमांत आमूलाग्र बदल होत असल्याची चिन्हे दिसतात. ट्रम्प यांच्या तद्दन खोटय़ा कटकथेस नुसतीच सहानुभूती देणारे असे नाही तर त्यात मीठमसाला मिसळून या बोगस कथा अधिक ज्वलनशील करणाऱ्या फॉक्सच्या काही वृत्तनिवेदकांना या बदलात स्थान नसेल.

या पार्श्वभूमीवर भारताची फॉक्स गणल्या जाणाऱ्या ‘रिपब्लिक’ वाहिनीने व्यवस्था आणि स्वत:च्याही अब्रूच्या ज्या काही चिंधडय़ा उडवल्या त्याचा समाचार घेणे आवश्यक ठरते. कारण या रिपब्लिकचा कर्णकटू वृत्तकथनकार अर्णब गोस्वामी आणि वृत्तवाहिन्यांचे मानांकन करणाऱ्या यंत्रणेचे प्रमुख पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅपी चर्चा एव्हाना समाजमाध्यमी चव्हाटय़ावर चांगलीच चघळली गेली आहे. पंतप्रधानांच्या काव्यगुणांपासून ते जम्मू-काश्मिरातील सुरक्षा, प्रकाश जावडेकर यांची कार्यक्षमता, अरुण जेटली यांचे आरोग्य अशा वाटेल त्या विषयावर या पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने आपली मते यात नोंदवल्याचे उघड झाले. त्यातून दोन मुद्दे स्पष्ट होतात : एक म्हणजे अर्णब याचा दिखाऊपणा आणि त्यास जवळ करणाऱ्यांचा ‘भाबडे’पणा. पत्रकारितेचे मूलभूत तत्त्व हे की आपले संदर्भ आणि संपर्क कधी मिरवायचे नसतात. तसे ते मिरवणाऱ्यांना आणि त्याद्वारे आपली कामे करून घेण्याची क्षमता दाखवणाऱ्यांना ‘फिक्सर’ असे म्हणतात. गोस्वामी यांनी जी काही मौक्तिके या संभाषणांत उधळली आहेत ती पाहता हे विशेषण त्यांना सुयोग्य ठरते. पंतप्रधानांच्या कार्यालयात पार्थो यांस माध्यम सल्लागारपदी नियुक्त करण्यासाठी शब्द टाकण्याची तयारी दाखवण्याइतका आत्मविश्वास हा अर्णब दाखवतो तेव्हा त्यातून त्याचे स्वत:चे जसे ‘वजन’ (?) दिसते तसेच त्यातून त्याला इतके मुक्त रान देणाऱ्यांची ‘गुणग्राहकता’ही दिसते. हा अर्णब म्हणजे जणू कोणी संतसज्जन आहे असे भासवून त्याच्या रक्षणासाठी अनेक स्थानिक भाजप नेत्यांनी अलीकडेच आपल्या छातीचा कोट केल्याचे अनेकांना स्मरेल. सरकारच्या भक्तगणांनी याच अर्णबसाठी समाजमाध्यमांत अन्य पत्रकारांवर दुगाण्या झाडल्या आणि तो जणू रामशास्त्रीच असे दाखवण्याचा प्रयत्न केला. यात अत्यंत आक्षेपार्ह ठरते ते अर्णबने काश्मिरातील पुलवामा दहशतवादानंतर केलेले भाकीत. त्याच्या या भाकितानुसार भारत सरकारने खरोखरच नंतरची कारवाई केली. याचा सरळ अर्थ असा की अर्णब यास कोणा उच्चपदस्थांकडून या कारवाईची पूर्वकल्पना मिळाली. ते ठीक. पण ती माहिती आपल्याकडून बाहेर जाऊ न देण्याचा पत्रकारितेचा धर्म काही अर्णबने पाळला नाही. देशाचे सुरक्षा सल्लागारदेखील आपल्याशी चर्चा करतात अशी शेखी मिरवण्याइतका हलकेपणा अर्णबने दाखवला. यातून त्याची अकार्यक्षमता वा आत्मप्रौढीची सवय दिसून येते हे खरेच. पण त्यापेक्षा अधिक त्याच्या पोकळ पत्रकारितेचा आधार घेणाऱ्यांनी कसे कच्चे लिंबू निवडले हे अधिक ठसठशीतपणे उघड होते.

हा जितका या माध्यमाचा अपमान आहे तितकाच हा अपमान आपल्या सामाजिक समजशक्तीचादेखील आहे. याचे कारण आपल्याकडे पत्रकार डावा, उजवा की समाजवादी वगैरे वर्गवारी करण्यात अनेकांना रस असतो. हे असे होणे हेच फजूल आहे. डॉक्टराची वर्गवारी डावा, उजवा वगैरे पद्धतीने केली जाते काय? त्याचे मूल्यमापन होते ते त्याच्या आजाराचे निदान करण्याच्या आणि त्यावर योग्य ती औषधे सुचवण्याच्या क्षमतेवरून. ते जर त्यास उत्तम प्रकारे जमत असेल तर त्याची वैचारिकता हा दुय्यम मुद्दा ठरतो. तद्वत पत्रकाराचेही मूल्यमापन तो चांगला की वाईट या आणि याच निकषांवर व्हायला हवे. कितीही निर्बुद्ध वा लबाड असला तरी आपल्याला जवळच्या विचारधारेचा असेल तर तो चांगला पत्रकार, आणि तसा नसेल तर तो वाईट, या मांडणीतून समाजाची बालबुद्धी दिसते. पत्रकाराची बांधिलकी हवी ती व्यवसायाशी. विचारधारेशी नव्हे. व्यावसायिक नैतिकतेपेक्षा वैचारिक बांधिलकी महत्त्वाची असेल त्यांनी खुशाल उघड राजकारणात जावे. व्यवसायाच्या नथीतून राजकीय तीर मारणे हा भ्रष्टाचार झाला.

त्याची व्याप्ती अर्णब प्रकरणातून समोर आली. पत्रकारिता किती खालच्या पातळीवर जाते हे तर त्यातून दिसलेच. पण समाजास किती मूर्ख बनवता येते हे त्याहून अधिक ठसठशीतपणे दिसले. यापुढे तरी ही डाव्या-उजव्याची वर्गवारी थांबवण्याचा पोक्तपणा समाजाने दाखवावा. डाव्या-उजव्याच्या आधारे मोजमाप करण्यापेक्षा पत्रकार बौद्धिकतेच्या वकुबात उजवा की डावा हे पाहणे जास्त महत्त्वाचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 12:04 am

Web Title: editorial on arnab goswami parth dasgupta whatsapp chat abn 97
Next Stories
1 ध्यास सर्वोत्तमाचा!
2 उणी-धुणी
3 सारं कसं शांत शांत!
Just Now!
X