News Flash

धुंद आणि भान

विजयाचे सोयर आणि पराभवाचे सुतक यापल्याड क्रिकेटकडे पाहायला शिकले पाहिजे

(संग्रहित छायाचित्र)

 

विजयाचे सोयर आणि पराभवाचे सुतक यापल्याड क्रिकेटकडे पाहायला शिकले पाहिजे. हा अखेर खेळ आहे; हे ओळखून अजिंक्य असण्यापेक्षा स्थितप्रज्ञ राहाणे महत्त्वाचे.. 

ऐनवेळी २० खेळाडू मैदानात उभे करता आले ही जशी आपली जमेची बाजू तद्वत, इतक्या मोठय़ा प्रमाणात गुणवान खेळाडू ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनास सापडत नाहीत हे तेथील गुणवत्ता आटू लागल्याचे स्पष्ट लक्षण..

भारतीय क्रिकेट संघाच्या, ऑस्ट्रेलियातील अविस्मरणीय कामगिरीचा शिल्पकार आणि कथानायक मराठी मुंबईकर अजिंक्य रहाणेच होता हे एक बरे झाले. मुळातच अवघड समजल्या जाणाऱ्या आणि परिस्थितीनुरूप अधिकच खडतर बनत गेलेल्या या मालिकेदरम्यान एक-एक अनपेक्षित यश संपादित करत असताना आणि अखेर ब्रिस्बेनमधील त्या विजयानंतरही रहाणेच्या संयत, स्थितप्रज्ञ देहबोलीत फार फरक पडलेला नव्हता. यशाचे वाटेकरी आणि वाटमारे नेहमीच अधिक असल्याचे आपण आजूबाजूला पाहतो. त्या पार्श्वभूमीवर असे वागणे नक्कीच निराळे. बक्षीस समारंभातही रहाणेने नवख्या टी. नटराजनला बोलावून चषक त्याच्या हातात सोपवला नि तो स्वत: बाजूला झाला! ‘अजिंक्य रहाणे अस्साच आहे. बीसीसीआयच्या कार्यालयात विजयी चमूचे समूह छायाचित्र लावले जाईल, त्यात या संघाचा कर्णधारच दिसणार नाही. त्याचे हे पडद्यामागे राहणेच त्याच्याविषयीचा आदर शतगुणित करणारे ठरते..’ हे उद्गार आहेत अत्यंत खडूस पण चिकित्सक मानले जाणारे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपेल यांचे. पण पडद्यामागे राहतो किंवा स्थितप्रज्ञ राहतो म्हणून प्रत्यक्ष मैदानावरील नेतृत्वात तडजोडी बोटचेपेपणा आढळतो हे रहाणेच्या बाबतीत कधीही घडलेले नाही. उलट प्रस्थापित आजी-माजी कर्णधारांपेक्षा अजिंक्य रहाणेची व्यूहरचना आक्रमक असते आणि निर्णय बेधडक असतात. रहाणेच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात तीन आणि भारतात एक अशा चार सामन्यांपैकी तीन वेळा भारत विजेता ठरला आणि एक सामना अनिर्णित राहिला. रहाणेने कर्णधार म्हणून अद्याप पराभव पाहिलेला नाही. याचा अर्थ तो कायमच अजेय राहील, असेही नाही. या मालिकेत रहाणे हा प्रभारी कर्णधार होता आणि कदाचित विराट कोहली संघात परतल्यामुळे भविष्यात बराच काळ किंवा कधीही त्याला पुन्हा नेतृत्व करण्याची संधीही मिळणार नाही. या शक्याशक्यतांपायी रहाणे कधीही अस्वस्थ होत नाही. मुद्दा हा की, रहाणेसारखा संयत, अविचल परिपक्वपणा आपल्या देशात कधी झिरपणार? त्या मुद्दय़ावर येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाच्या कामगिरीची समीक्षा अतिरेकी क्रिकेटप्रेम व राष्ट्रभक्तीची झिंग उतरवून आणि तर्काधिष्ठित चिकित्सेचे भिंग लावून करणे समयोचित ठरते.

या मालिकेत भारताचे २० क्रिकेटपटू खेळले, हे १.३० अब्ज लोकसंख्येच्या देशातील क्रिकेट गुणवत्ता अथांग असल्याचेच निदर्शक हे कबूल. परंतु सामन्यागणिक दोन ते तीन क्रिकेटपटू जायबंदी होत आहेत, तेही इतक्या महत्त्वाच्या मालिकेदरम्यान, हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळासाठी भूषणावह नाही. बरेच खेळाडू आखातात आयपीएल खेळले आणि सहा महिने घरापासून दूर, जैव सुरक्षा परिघात वावरले. त्यामुळे एकीकडे सामन्यांचा शारीरिक, मानसिक ताण आणि दुसरीकडे तंदुरुस्ती राखण्यासाठी पुरेसा अवकाश उपलब्ध नाही अशी परिस्थिती. ऑस्ट्रेलियातील सध्याचा निकाल जरा बाजूला ठेवू. पण इतक्या मोठय़ा व महत्त्वाच्या मालिकेसाठी पूर्ण तंदुरुस्त क्रिकेट संघ घेऊन जाण्याची जबाबदारी बीसीसीआयची नव्हती काय? म्हणजे भारतीय व ऑस्ट्रेलियन मंडळांनी निव्वळ मालिकेच्या प्रक्षेपणातून मिळणारा मलिदा पदरात पाडून घेण्यासाठी ती भरवून दाखवलीच. अशा वेळी दुय्यम-तिय्यम दर्जाचा संघ ०-४ असा हरून आला असता, तरी त्याचे खापर मग खेळाडूंवर आणि कर्णधारावरच फोडले जाणार होते. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीसारखा अगदी अलीकडेपर्यंत खेळलेला क्रिकेटपटू असूनही असे घडावे हे लक्षणीय आहे. अशाही परिस्थितीत आपले अनेक नवखे खेळाडू अनपेक्षित उत्तम कामगिरी करत राहिले म्हणून त्यांचे कौतुक योग्यच. पण दुखापतींबाबत जे घडले ते आदर्श नियोजन आणि व्यवस्थापन मानता येणार नाही याचे विस्मरण नको.

विस्मरण आणखीही काही बाबींचे न होणे गरजेचे आहे. अ‍ॅडलेडमधील सामन्यात भारताचा डाव ३६ धावांमध्ये उखडला गेला. तो भारताचा पूर्णशक्तिमान संघ होता! इतकी नामुष्की नंतरच्या अनुकूल घडामोडींमुळे इतिहासातून पुसली जाईल काय? आणि ऑस्ट्रेलियन संघ तरी आज कितीसा ‘ऑस्ट्रेलियन’ राहिला आहे याचा तपास करण्याची गरज आहे. भारताला तिकडे ऐनवेळी २० खेळाडू मैदानात उभे करता आले ही जशी आपली जमेची बाजू तद्वत, इतक्या मोठय़ा प्रमाणात गुणवान खेळाडू ऑस्ट्रेलियन व्यवस्थापनास मायदेशी शोधूनही सापडत नाहीत हे तेथील गुणवत्ता आटू लागल्याचे स्पष्ट लक्षण आहे. गेल्या कित्येक वर्षांतली कमकुवत ऑस्ट्रेलियन फलंदाजी फळी या मालिकेत पाहायला मिळाली. आपल्याकडे बहुतेक बदल हे दुखापतींमुळे होत होते, त्यांच्या संघातील बदल हे खराब कामगिरीमुळे होत होते. ऑस्ट्रेलियाच्या चारही गोलंदाजांचा ताफा आज जगात सर्वोत्तम मानला जातो. पण या मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात त्यांतील बहुतेक थकलेले असताना ताज्या दमाचे इतर गोलंदाज खेळवण्याचे धाडस संघ व्यवस्थापनाला झाले नाही, कारण पुन्हा तेच. कोण बदलून मिळणार? अजिंक्य रहाणेच्या नजरेतून ही बाब सुटली नव्हती. म्हणूनच ब्रिस्बेन कसोटीत सामना अनिर्णित राखण्याची संधी असतानाही त्याने विजयासाठी प्रयत्न केले.

एक कर्णधार आणि त्याच्या बहुतेक सर्व अनाम सहकाऱ्यांनी सांघिक भान ठेवून मिळवलेले हे यश. पण त्यांनी भान राखले, तरी त्या विजयाच्या धुंदीचा अतिरेक आपल्याकडे होताना दिसतो आहे. काही खेळाडू कसे गरिबीतून वर आले वगैरे उल्लेख खुद्द त्या खेळाडूंसाठी अन्यायकारक आणि अनावश्यक ठरतात. निम्न आर्थिक वा सामाजिक स्तरातील गुणवानांनी हे असे सशर्त कौतुकाचे ओझे का आणि किती दिवस वागवायचे? विराट कोहलीभोवती भारतीय क्रिकेट फिरते. पण तो नसताना निर्माण झालेल्या पोकळीतून संधी निर्माण झाली, तिचे सोने रहाणे आणि त्याच्या जिगरबाज सहकाऱ्यांनी केले इतकाच या विजयाचा अर्थ. पराभूत झाल्यानंतर खेळाडूंच्या घरांवर दगड फेकणे जितके अल्पमतीदर्शक, तितकेच विजयी झालेल्यांवर फुलांची उधळण करणे हे भावनाविवशतेचे लक्षण. अजिंक्य रहाणे आणि त्याच्या संघाच्या उत्तम कामगिरीचा मथितार्थ इतकाच, की पर्याय शोधले तर सापडतात. विजयाचे सोयर आणि पराभवाचे सुतक यापलीकडे खेळाकडे – क्रिकेटकडेही – पाहायला शिकले पाहिजे. हा अखेरीस खेळ आहे. त्याच्यात तरीही धर्म, संस्कृती वगैरेंचे उत्खनन करणारे कथित गुप्त खजिन्याचा शोध घेणाऱ्यांपेक्षा वेगळे ठरत नाहीत. अजिंक्य रहाणे मायदेशी परतला आणि ढोलताशांच्या गजरात नि फुलपाकळ्यांच्या वर्षांवातही स्थितप्रज्ञ राहून आपल्या कन्येला कडेवर घेऊन घरी परतला. मोहम्मद सिराज विमानतळावरून घरी परतण्यापूर्वी नुकत्याच दिवंगत झालेल्या त्याच्या वडिलांच्या कबरीपाशी जाऊन नतमस्तक झाला. साध्याच गोष्टी. पण खूप काही दाखवून देणाऱ्या. प्रकाशझोताच्या केंद्रस्थानी राहण्याचा अतृप्त सोस बडवणाऱ्यांच्या विश्वात पूर्णपणे वेगळा असा. भान आणि धुंद यांतील फरक अधोरेखित करणारा. ‘विराट’ न बनताही ‘अजिंक्य’ होता येते हे नव्याने सिद्ध करणारा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:03 am

Web Title: editorial on india won series in the brisbane test abn 97
Next Stories
1 सकळिकांचें राखों जाणे
2 कुसळ आणि मुसळ!
3 शहाणिवेची शपथ
Just Now!
X