23 January 2021

News Flash

आत्ता का आठवले?

महाराष्ट्रात आठवले वा उत्तर भारतात मायावती आदींनी आपला स्वार्थ म्हणजे(च) दलितांचे हित असे भासवण्याचा प्रयत्न केला

संग्रहित छायाचित्र

रिपब्लिकन ऐक्य कार्यकर्त्यांनाच नको आणि यापुढे मोठय़ा पक्षाशी युती अटळ, ही रामदास आठवले यांची निरीक्षणे पक्षबांधणीलाही मारक ठरणारी आहेत..

महाराष्ट्रात आठवले वा उत्तर भारतात मायावती आदींनी आपला स्वार्थ म्हणजे(च) दलितांचे हित असे भासवण्याचा प्रयत्न केला. प्रस्थापित पक्षांनी या अशा नेत्यांची स्वार्थलोलुपता नेमकी ओळखली..

सर्वप्रथम रामदास आठवले यांचे अभिनंदन. आपल्या रिपब्लिकन पक्षास काहीही भवितव्य नाही हे प्रामाणिकपणे मान्य करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. आठवले यांच्या राजकारणाविषयी बरे काही बोलण्याची संधी मिळणे तसे दुर्मीळ. या कबुलीमुळे ती मिळाली. ‘‘यापुढे एकटय़ाने लढण्यापेक्षा मोठय़ा पक्षाशी युती करूनच सत्तेचे राजकारण करावे लागेल,’’ असे; म्हटले तर प्रागतिक आणि नाही म्हटले तर स्वार्थी विधानही आठवले यांनी या वेळी केले. त्यांच्या मते रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते असेही अन्य पक्षांत जाऊ लागले आहेत, त्यामुळे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणे निर्थक. रिपब्लिकन पक्षाची सध्या अर्धा डझन वा अधिकच शकले असतील. त्यातल्या काही फुटकळ नेत्यांचा अहं हा त्यांच्या आयुष्यभरातील समग्र राजकीय ताकदीपेक्षाही किती तरी अधिक. त्यामुळे त्यांच्यात ऐक्य होण्याचा प्रश्न नाही. आठवलेदेखील हे सत्य मान्य करतात. या संभाव्य ऐक्यात प्रकाश आंबेडकर जोपर्यंत सहभागी होत नाहीत तोपर्यंत ऐक्यासदेखील काही अर्थ नाही, हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणाही आठवले ‘लोकसत्ता’स दिलेल्या मुलाखतीत दाखवतात. ‘‘पूर्वी रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाल्यास ऐक्यासाठी कार्यकर्त्यांकडून दबाव यायचा. आता कार्यकर्त्यांनाही काही वाटेनासे झाले आहे आणि म्हणून रिपब्लिकन ऐक्य हा विषयही मागे पडला आहे,’’ असे आठवले यांचे मत. सध्या आठवले केंद्रात नक्की जबाबदारी आणि अधिकार काय असा प्रश्न पडावा अशा कोणा खात्याचे राज्यमंत्री आहेत. गेली आठ वर्षे ते राज्यसभा सदस्य आहेत आणि लोकसभेचे सदस्य, राज्य मंत्रिमंडळात मंत्री असे बरेच काही त्यांनी उपभोगले आहे. तरीही रिपब्लिकन पक्षास काहीही भवितव्य नाही, असे त्यांना वाटते. किंवा कदाचित इतके सारे भोगण्याची संधी मिळाल्यानेच आता त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला हा पक्ष अर्थशून्य वाटू लागला असावा, असे मानण्यास जागा आहे.

खरे तर हा साक्षात्कार होत असताना हे असे का झाले, असा प्रश्न आठवले यांनी स्वत:ला आणि आपल्या कार्यकर्ते वा अन्य सहपक्षनेत्यांनाही विचारायला हवा. देशातील एक बलाढय़ उद्योगसमूह आणि सरकारी अधिकारी यांच्याबाबत एक निलाजरे विधान केले जाते. ‘सरकारी अधिकाऱ्यांत दोनच गट आहेत. एक या उद्योगसमूहाशी हातमिळवणी केलेला आणि दुसरा लवकरच येऊन मिळेल असा,’ हे विधान. देशातील राजकारण आणि विविध राजकीय पक्ष यांना हे विधान लागू होते. सध्या राजकीय पक्षांचे दोनच गट आहेत. एक बलाढय़ भाजपस सामील झालेला आणि दुसरा सामील होऊ पाहणारा. आठवले अर्थातच यातील पहिल्या गटात मोडतात आणि बाकीचे सारे दुसऱ्या गटात आहेत असे ते मानतात. पण हे पूर्ण सत्य नाही. ज्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्यांत एक गट उद्योगसमूहाच्या दबावाखाली न येता नेकीने आपले कर्तव्य पार पाडत असतो त्याचप्रमाणे काही राजकीय पक्षही आपली विचारधारा सांभाळत सत्ताशरणतेचा मोह टाळताना दिसतात. पण असे कोणी नेक नेते रिपब्लिकन पक्षात शिल्लक आता राहिलेले नाहीत असा आठवले यांच्या म्हणण्याचा अर्थ. तो तपासून घ्यायला हवा आणि ही वेळ मुळात या पक्षावर का आली याचादेखील विचार व्हायला हवा.

याचे कारण रिपब्लिकन पक्षाचा जन्मच मुळात काहीएक विचाराच्या आधाराने झाला. या विचाराचा प्रसार आणि तो विचार सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे हे या पक्षाचे ध्येय. वास्तविक एकेकाळी हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणारेही काँग्रेसमध्ये होते. अशा काळातही रिपब्लिकन पक्षाचे प्रणेते डॉ. आंबेडकर यांनी कधी काँग्रेसची कास धरली नाही. काँग्रेस, हिंदुत्ववादी आणि डावे या तिघांशी एकाच वेळी बाबासाहेबांनी दोन हात केले. पण त्यांच्या अनुयायांची कृती नेमकी त्या विरोधी. त्या वेळी पुढे आधी हिंदुमहासभा आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेच्या मिषाने काँग्रेसमधील हिंदुत्ववादी वेगळे झाले. आणि संघाच्या स्थापनेनंतर अवघ्या ११ वर्षांनी, १९३६ साली, योगायोगाने १५ ऑगस्ट याच दिवशी, डॉ. आंबेडकरांनी काँग्रेसमधील ब्राह्मण्यवादी व भांडवलशाही मानसिकतेविरोधात स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. डाव्यांना ते पटले नाही. कारण कामगार आदींची मते फुटतील ही त्यांची भीती. हा युक्तिवाद बाबासाहेबांनी फेटाळला. डावे पक्ष कामगारांच्या हक्कांचा विचार करतात तर मजूर आणि दलित यांत  भेद नाही आणि आपला पक्ष त्यांच्या मानवी हक्कासाठी प्रयत्न करतो, असे बाबासाहेबांचे त्यांना उत्तर होते. त्यानंतर वर्षभरानेच झालेल्या निवडणुकांत या आघाडीस घवघवीत यश मिळाले आणि त्यातूनच पुढे स्वातंत्र्यानंतर दशकभरातच रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात आला. आज स्थापनेनंतर अवघ्या ६४ वर्षांनी त्या पक्षाच्या अनुयायांना आपला पक्ष निर्थक वाटतो. पण त्याआधी २५ वर्षे स्थापन झालेल्या हिंदुत्ववादी संघटना स्वत:च्या हिमतीवर सत्तास्थापन करू शकल्या. हे वास्तव काय दर्शवते?

डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या नंतरच्या रिपब्लिकन नेतृत्वाचे अपयश, हे या प्रश्नाचे उत्तर. हे नेतृत्व सातत्याने अपयशी ठरले कारण  जो कोणी प्रबळ असेल त्या राजकीय पक्षाच्या गोठय़ात आपला पक्ष बांधण्यातच या पक्षाच्या नेत्यांनी धन्यता मानली. स्वत:चा पक्ष बांधणे, त्यासाठी संघर्ष करणे, प्रसंगी त्याग करणे यातील किती आणि काय रिपब्लिकन पक्ष नेत्यांनी केले? आज आठवले भाजपचे जू आनंदाने वागवतात. पण त्याच्या कारकीर्दीचा उमेदीचा आणि बहराचा काळ काँग्रेस आणि त्यातही शरद पवार यांच्या सावलीत गेला. त्या वेळी आठवले यांनी त्याचे समर्थन पुरोगामी शक्तींशी हातमिळवणी असे केले. पवार आणि काँग्रेस हे जर त्या वेळी पुरोगामी होते आणि या पुरोगामी शक्तींशी जुळवून घेणे आठवले आणि अन्य रिपब्लिकन नेत्यांना गरजेचे वाटत होते तर सध्या त्यांची ही गरज संपली असे मानायचे काय? जो भाजप आणि जे हिंदुत्ववादी आठवले आणि तत्समांना एकेकाळी प्रतिगामी वाटत होते त्यांच्या राजकारणात पुढे असा काय फरक पडला की त्यांचे प्रतिगामित्व अचानक नाहीसे झाले?

वास्तविक आज कधी नाही ती पुरोगामी आणि दलित ऐक्याची गरज आहे. अशा वेळी ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’ असे म्हणणाऱ्या आणि ते खरे करून दाखवणाऱ्या बाबासाहेबांच्या राजकीय वारसांनी आपल्या निष्ठा कोणाच्या दावणीला बांधल्या हा प्रश्न आठवले यांना पडायला हवा. गेल्या काही वर्षांत दलितांवरील अत्याचाराचे प्रमाण आणि त्यांची तीव्रताही लक्षणीयरीत्या वाढली. मृत गाईचे चामडे काढताना गोहत्येचा वहीम ठेवून कोणास मारहाण झाली, हे दलित ऐक्याची गरज नाही असे म्हणणाऱ्या आठवले यांनी आपल्या अनुयायांना सांगायला हवे. रोहित वेमुला याचे काय झाले याचाही शोध त्यांनी घ्यायला हवा. धर्माच्या आधारे सामाजिक ऐक्याचे (?) प्रयत्न होत असताना जातिभेद नष्ट झाले असे आठवले यांना वाटत असेल तर त्याचेही स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवे.

पण यातील काहीही ते करणार नाहीत. महाराष्ट्रात आठवले काय आणि उत्तर भारतात मायावती काय. या मंडळींनी आपला स्वार्थ म्हणजे(च) दलितांचे हित असे भासवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी प्रस्थापित राजकीय पक्षांनी या अशा नेत्यांची स्वार्थलोलुपता ओळखून त्यांच्या पदरात चार दाणे टाकले आणि त्यातच त्यांना समाधान मानायला लावले. प्रस्थापितांच्या नादी लागून आपल्यालाही फार काही मिळाले नाही आणि दलित चळवळीचेही काही भले झाले नाही हे आता लक्षात आल्यावर आठवले ही उपरतीची भाषा करतात. त्यामुळे हे सर्व आता का आठवले याचे उत्तर चळवळीस मिळायला हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 12:03 am

Web Title: editorial on instead of fighting alone the politics of power has to be done by forming an alliance with a bigger party says ramdas athawale abn 97
Next Stories
1 ‘सोनिया’चा क्षण!
2 पारंब्यांचा पसारा..
3 रु. १५०००००००००००००!
Just Now!
X