तब्बल दोन वर्षांचा वनवासभोगलेल्या नाथाभाऊंना- एकनाथ खडसे यांना- पावन करून घेणे अखेर भाजपला भाग पडले आहे. गेल्या दोन वर्षांत फडणवीस सरकारातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, चिखलफेकही झाली. पण प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढालीसारखे उभे राहून या मंत्र्यांना पाठीशी घातले. त्यासाठी त्यांनी स्वत:स दूषणे घेतली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर आरोप झाले आणि मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब त्यांना दोषमुक्तीचे दाखले वाटूनही टाकले. नारायण राणे यांनादेखील पक्षाने समूहात सामील करून घेतले. श्रेष्ठींच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या या कृपेला खडसे मात्र, अपवाद ठरले. त्यांना आपले निर्दोषत्व सिद्ध होण्यासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागली, आणि अखेर त्यांच्याविरोधातील आरोपांना पुष्टी देणारे पुरावे नसल्याचा दाखला देत लाचलुचपतविरोधी पथकाने त्यांच्यावरील आरोपांचे कलंक पुसून टाकले. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर एकनाथ खडसेंवर ‘मुक्ता’ई प्रसन्न झाली. याच एकनाथरावांनी विधानसभेच्या मागील निवडणुकीआधी युती तोडण्याच्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाची दूषणे स्वत:च्या शिरावर घेतली होती, आणि भाजपला नको असलेल्या युतीच्या धर्मसंकटातून मुक्त केले होते. पुढचा इतिहास सर्वानाच माहीत आहे. भाजपला स्वबळावर सत्तेचा मोठा वाटा मिळाला, फडणवीस मुख्यमंत्री झाले, आणि मुक्ताईनगरचे एकनाथराव अनाथालयात पडल्यासारखे झाले. चौकशीचा ससेमिरा सोसत त्यांनी स्वपक्षातच सामना सुरू केला, आणि अखेर त्यात ते जिंकले. कलंकमुक्तीचा दाखला हाती येताच आता खडसे बोलू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी मात्र नाथाभाऊंना साथ दिली. खडसे यांचे नाव येताच मुख्यमंत्री मौन पाळत असताना, दानवे मात्र, नाथाभाऊ निर्दोष असल्याचा निर्वाळा देत राहिले, ही त्यांच्या दोन वर्षांच्या वनवासाच्या वेदनांवरील फुंकर होती. कदाचित म्हणूनच, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे दरवाजे खुणावत असतानादेखील स्वपक्षातील परतीच्या आशेने खडसे मात्र भाजपच्या उंबरठय़ावरच प्रतीक्षा करीत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या ढाच्याला सध्या ओबीसी नेतृत्वाची गरजच होती. भुजबळ तुरुंगात, तर तटकरे केंद्रीय कार्यकारिणीत गेल्याने, खडसे यांच्यासारखा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला असता, तर भाजपला ते आव्हान ठरले असते. त्याआधीच खडसे यांना कलंकमुक्त करून भाजपने त्यांना पुन्हा पावन करून घेतल्याने, भाजपच्या ओबीसी नेतृत्वाच्या फळीला आणखी एक भक्कम जोड मिळाली असली तरी त्यांच्या मंत्रिमंडळातील परतीचे दोर पुन्हा सांधले जातील किंवा नाही, हे अजून गुलदस्त्यातच आहे. मुख्यमंत्री आणि खडसे यांच्यातील ‘मधुर’ संबंधांची एव्हाना पक्षात आणि बाहेरही सर्वदूर पुरेशी वाच्यता झालेली असल्याने, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते सन्मानाने परतून येतील का याबाबत भाजपमध्येच साशंकता आहे. खुद्द खडसेदेखील साशंक असल्याचे त्यांच्या सावध प्रतिक्रियेवरून दिसते. खडसेंचे पक्षांतर्गत भवितव्य ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा भावी पवित्रा काय राहणार याकडे पक्षाचे डोळे लागले असले, तरी त्याच कारणासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांचे डोळे जर दिल्लीत लागले असतील, तर खडसेंचा मंत्रिमंडळ प्रवेश दानवेंसारखा पाठीराखादेखील सुकर करू शकेल किंवा नाही याबाबत शंकाच आहे. तूर्त, पुरेसे प्रायश्चित्त देऊन पावन करून घेण्यात आल्याने, मुख्यमंत्र्यांच्या क्लीनचिटविना स्वच्छ ठरलेला नेता एवढीच पुंजी खडसे यांच्या गाठीशी आहे. त्या बळावर त्यांना पुन्हा एकदा स्वबळ सिद्ध करायचे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2018 रोजी प्रकाशित
‘मुक्ता’ई प्रसन्न!
तब्बल दोन वर्षांचा वनवासभोगलेल्या नाथाभाऊंना- एकनाथ खडसे यांना- पावन करून घेणे अखेर भाजपला भाग पडले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 03-05-2018 at 02:46 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse