03 June 2020

News Flash

साथसोवळ्याची साथ!

एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत जे धडाडी दाखवणारे जन्माला आले, त्यातला एक हा जॉन्स हॉपकिन्स

संग्रहित छायाचित्र

गिरीश कुबेर

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ‘साथसोवळं’ (‘सोशल डिस्टन्सिंग’) पाळण्याचा सल्ला अमेरिकेतल्या ज्या विद्यापीठातनं बाहेर पडला, त्याच विद्यापीठानं या विषाणूचा प्रसार, त्याची तीव्रता आणि जगातल्या कोणत्या प्रदेशास त्याचा किती फटका बसला, यावर आधारित एक संशोधन प्रबंध लिहिला आहे. त्याचे काही निष्कर्ष आपल्यासाठी महत्त्वाचे असे..

सर्वप्रथम खुलासा. पुढे दिलेला तपशील हा पूर्णपणे शास्त्रीय पाहणीवर आधारित आहे आणि तो सध्याच्या करोना विषाणूविषयी आहे. मग त्यात कबुली द्यावी असं काय? ते असं की, शास्त्रीय आहे म्हणून या पाहणीतील निष्कर्ष शंभर टक्के जसेच्या तसे लागू होतील असं नाही. ही शास्त्राधारित पाहणी असल्यानं त्यात अशा कबुल्या.. म्हणजे डिस्क्लेमर्स.. द्यायची पद्धत आहे. प्रमाणासह सादर केल्या तर शास्त्र आपल्या चुका मान्य करतं. कारण ते काही कोणत्या हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रंथावर आधारित नसतं. ते रोजच्या रोज परीक्षेला जायला तयार असतं. आमच्या पूर्वजांनी असं करून ठेवलंय, तसं करून दाखवलंय.. असा दावा शास्त्र करत नाही. ते प्रयोगाच्या अग्निपरीक्षेला घाबरत नाही.

तेव्हा या अशा प्रयोगातल्या, प्रत्यक्ष जमिनीवरच्या पाहणीतले हे निष्कर्ष आहेत. ही पाहणी केली अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स या आदरणीय अशा विद्यापीठाने. हे विज्ञान संशोधनाला वाहिलेलं अमेरिकेतलं पहिलं विद्यापीठ. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत जे धडाडी दाखवणारे जन्माला आले, त्यातला एक हा जॉन्स हॉपकिन्स. व्यापारात, रेल्वे उभारणीत प्रचंड  यशस्वी झाल्यानंतर आपल्या राज्यात.. मेरिलँड.. रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधनाला वाहिलेलं विद्यापीठ स्थापता यावं म्हणून त्यानं भली मोठी देणगी दिली. त्यातून ही संस्था उभी राहिली. पत्रकारिता ते संशोधन ते अमेरिकेचे अध्यक्ष अशा अनेक क्षेत्रांत या विद्यापीठाचे देदीप्यमान विद्यार्थी आढळतात. असो. पण हे विद्यापीठ हा काही आजचा विषय नाही.

या विद्यापीठात सध्या जगाला छळणाऱ्या करोना विषाणूवरही संशोधन सुरू आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी ‘साथसोवळं’ (‘सोशल डिस्टन्सिंग’ या शब्दाला वाईचे वैद्यक, ‘लोकसत्ता’चे लेखक शंतनु अभ्यंकर यांनी दिलेला हा चपखल मराठी प्रतिशब्द. तो प्रचलित करू या!) पाळण्याचा सल्ला याच विद्यापीठातनं बाहेर पडला. तर या विद्यापीठानं या विषाणूचा प्रसार, त्याची तीव्रता आणि जगातल्या कोणत्या प्रदेशास त्याचा किती फटका बसला, यावर आधारित एक संशोधन प्रबंध लिहिला. त्याचे हे काही निष्कर्ष. आपल्यासाठी महत्त्वाचे असे..

यातला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष आहे तो या विषाणूने धुमाकूळ घातलेले प्रदेश आणि त्यातील तापमानाबाबत. तीन अंश सेल्शियस ते १३ अंश सेल्शियस या दरम्यान ज्या-ज्या प्रदेशांचं तापमान आहे, त्या प्रदेशांत या विषाणूची बाधा सर्वाधिक आहे आणि तिची तीव्रताही अधिक आहे. म्हणजे या प्रदेशांतल्या वातावरणातला विषाणू हा अधिक संहारक असल्याचं या निरीक्षणात दिसतंय. त्याच वेळी ज्या देशांतलं तापमान १८ अंशांच्या आसपास आहे, त्या देशांत या विषाणूच्या प्रसाराचं प्रमाण पाच टक्क्यांनी कमी आहे.

आता यावर सर्वसाधारण शंका असेल ती अमेरिका ते इराण या पट्टय़ात या विषाणूने घडवलेल्या उत्पाताची. अमेरिकेतही दक्षिणेकडची जी राज्यं आहेत- उदाहरणार्थ टेक्सास, फ्लोरिडा, अ‍ॅरिझोना वगैरे या राज्यांत या विषाणूचा प्रसार संथ आहे आणि त्याची दाहकताही कमी आहे. त्या तुलनेत वॉशिंग्टन (राजधानी ‘डीसी’ नव्हे- वॉशिंग्टन राज्य, सिएटल वगैरे शहरांचं), न्यू यॉर्क, कोलोरॅडो, कॅलिफोर्निया अशा राज्यांत या विषाणूनं माजवलेला हाहाकार अधिक आहे. यातही परत गंमत दिसते ती कॅलिफोर्नियासारख्या राज्यात. ते मधे आहे. म्हणजे उत्तर-दक्षिण असं विभागलं गेलंय. त्यामुळे त्या राज्यात या विषाणूचा प्रसारही तसाच आहे. म्हणजे या राज्याच्या खालच्या भागात कमी आणि उत्तरेला अधिक.

या निरीक्षणात एमआयटीच्या दोन संशोधकांचा समावेश होता. त्यांची री स्पेन आणि फिनलंड या दोन देशांतल्या अशा प्रकारच्या संशोधकांनीही या आठवडय़ात ओढली. तेही याच दिशेनं पाहणी करत होते. त्यांचेही निष्कर्ष असेच आलेत.

ते दाखवून देतात की, करोना कहर हा अशा प्रांतांत सर्वाधिक आहे, जिथे तापमान उणे दोन ते १० अंश या टप्प्यात आहे. म्हणजे थोडक्यात ज्या प्रदेशांत तापमान कमी, थंडी अधिक, तिथं या करोनाचा कहर अधिक. याच्या पुष्टय़र्थ या दोन्ही पाहण्यांनी बराच तपशील, नकाशे वगैरे दिलेत. त्यातला एक आशियाई देश आणि अमेरिकेतलं न्यू यॉर्क यांची तुलना करतो. सिंगापूर, हाँगकाँग, इराण, इटली, हुबेई, न्यू यॉर्क वगैरेंचा त्यात विचार केलाय. वास्तविक सिंगापूर भौगोलिकदृष्टय़ा चीनला किती जवळ. पण हाँगकाँग आणि सिंगापूर यांतलं सरासरी तापमान २० अंशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी या विषाणूच्या प्रसाराचा वेग कमी आहे. उर्वरित सर्व प्रांतांतलं तापमान किमान पाच अंश ते १८ अंश या टप्प्यात आहे. या सर्व शहरांत या विषाणूच्या प्रसाराचा वेग भयानक आहे. खुद्द चीनमध्येही सुरुवातीच्या काळात या विषाणूच्या प्रसाराचा वेग मंद होता. वुहान आणि आसपासच्या प्रांतांतलं तापमान घसरलं, वातावरणातली आद्र्रता कमी झाली.. आणि हा विषाणू पसरायला लागला.

या पाहणीच्या आधी सिव्हियर अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) या आजाराचा याहीपेक्षा विस्तृत अभ्यास झालेला आहे. अनेक संशोधन प्रबंध त्यावर प्रकाशित झालेले आहेत. २००३ सालची ही साथ पाच खंडांतल्या ३० देशांत पसरली. सध्याचा करोना हा या सार्सच्या वंशातलाच. दोघांचा मूळ पुरुष एकच. नॉव्हेल करोना व्हायरस. आजमितीला या घराण्याच्या सात उपशाखा माहीत झाल्यात आणि त्यांच्यावर चांगला अभ्यास झालाय. या सर्वामुळे होणारा आजारही तोच. एक प्रकारचा न्यूमोनिया. हे सर्वच्या सर्व भाऊबंद आपल्या फुप्फुसांवर हल्ला करतात आणि एकमेकांकडे एकाच मार्गाने जातात. म्हणून खोकला, शिंकणं यातनं उडणारे शिंतोडे वगैरे. यातल्या पहिल्यावर आपण मात केली म्हणून दुसरा तयार झाला. हे विषाणू प्रतिबंधात्मक औषधांना पुरून कसं उरायचं, याचा मार्ग आपल्या आपल्यात लगेच काढतात. त्यांची ती अस्तित्वाची लढाई असते. त्यांच्यासाठीही नाही म्हटलं तरी ते ‘युद्ध जीवांचे’ असंच असतं. त्यामुळे जितका जीव आकारानं लहान, तितका तो नामशेष होणं अवघड. डायनासोर्स गेले, पण इतकी कीटकनाशकं आली तरी आपल्या घरातले डास काही एकविसाव्या शतकातही आपलं रक्त काढायचं सोडत नाहीत. असो.

तर त्या सार्सच्या पाहणीतले निकालही तेच दाखवतात. सार्सच्या विषाणूंना ते निष्कर्ष सिद्ध करण्यासाठी प्रयोगशाळांत ‘पाळलं’ गेलं. त्या पाळलेल्या अवस्थेत काहींना मग अधिक तापमानात ठेवलं गेलं आणि काहींना कमी. त्यात आढळलं ते असं की, सुखद, वातानुकूलित वातावरणातले विषाणू चांगले धष्टपुष्ट  झाले आणि अंगाची लाहीलाही करणाऱ्या, घामाच्या धारा शतधारांनी वाहायला लावणाऱ्या वातावरणातले विषाणू काही तग धरू शकले नाहीत.

तेव्हा करोनाबाबतही शास्त्रज्ञांचा कयास असा की, जसं जसं तापमान वाढेल, वातावरणातली आद्र्रता वाढेल, तसतसा या करोनाचा उच्छाद कमी होईल. म्हणून या टप्प्यावर हा खुलासा महत्त्वाचा : सदर पाहणी ही भूतकाळावर आधारित आहे आणि भूतकाळ हा भविष्याचा दिशादर्शक असेलच असे नाही. म्हणून आपण काळजी घेणं कमी करणं धोकादायक ठरेल.

आपल्याबाबत हा निष्कर्ष तसा निघाला तर फारच छान. हा अंदाज खरा निघावा अशीच आपल्या सगळ्यांची इच्छा असेल. सरकारलासुद्धा असंच वाटत असेल. असंच झालं तर सरकारही आनंदेल. कारण आपल्या प्रयत्नांमुळेच.. त्यात थाळीवादनही आलं.. ही साथ आटोक्यात आली असं सरकार म्हणू शकेल.

पण तोपर्यंत आपण हे साथसोवळं पाळायला हवं. नंतर त्याची साथ आपण सोडू शकू ही आशा. नाही तर इतक्या वर्षांनी पुन्हा..

girish.kuber@expressindia.com

@girishkuber

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 12:09 am

Web Title: article on johns hopkins university thesis on corona virus abn 97
Next Stories
1 हस्तप्रक्षालनार्थे..
2 कासांड्रा क्रॉसिंग!
3 गोंगाट गोडवा!
Just Now!
X