भारतातील बँकांची शिखर संघटना- ‘आयबीए’बरोबर वेतन सुधाराबाबतच्या वाटाघाटी फिसकटल्याने ‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (एआयबीओसी)’ या बँक अधिकाऱ्यांच्या महासंघाने असहकार आंदोलन सोमवारपासून सुरू केले आहे. या अंतर्गत नियमानुसार काम केले जाईल आणि रविवार, सुट्टीचा दिवस तसेच कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक काळ काम करण्याचा गेल्या काही वर्षांत रुळलेला प्रघात बंद केला जाईल, असे महासंघाचे उपाध्यक्ष डी. एन. प्रकाश यांनी सांगितले. हे अशा तऱ्हेने काम केल्यामुळे पंतप्रधान जन-धन योजनेत वर्षभरात साडेसात कोटी बँक खाती उघडण्याचे उद्दिष्ट असताना, दोन महिन्यांतच साडेपाच कोटींहून अधिक खाती नव्याने उघडण्यात आली, असे महासंघाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अधिकाऱ्यांचा महासंघाने येत्या शुक्रवारी, १७ ऑक्टोबरला देशभरात सर्वत्र धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनाची संयुक्त कृती समिती ‘यूएफबीयू’च्या घटक संघटनांचीही त्यांना साथ असेल. आयबीएला सादर केलेल्या मागण्यांच्या निवेदनाचा दुसरा वर्धापन दिनी ३० ऑक्टोबरला निषेध मिरवणुका काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.