देशातील हॉटेल्सची अग्रणी शृंखला कार्लसन रेझिडॉर हॉटेल ग्रुपने यंदाच्या वर्षांत नवीन १३ हॉटेल्स उघडण्याची योजना आखली आहे. ही हॉटेल्स शृंखला चालविणाऱ्या अमेरिकन हॉस्पिटॅलिटी कंपनीचा भारतीय बाजारपेठेबद्दल ठाम बांधिलकी स्पष्ट करताना, कंपनीचे आशिया-पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष सिमॉन बार्लो यांनी स्पष्ट केले की, कार्लसन रेझिडॉरने भारतातील हॉटेल्सची संख्या २०१५ पर्यंत १०० वर नेण्याची योजना आखली आहे. सध्या ही संख्या ६३ इतकी असून, भारतात आपली चीनपेक्षाही अधिक हॉटेल्स आहेत, असे बार्लो यांनी आवर्जून सांगितले. रॅडिसन ब्ल्यू, रॅडिसन, पार्क प्लाझा आणि पार्क इन बाय रॅडिसन तसेच कंट्री इन अ‍ॅण्ड सूट्स बाय कार्लसन अशा ब्रॅण्डनावाने कार्लसन आपली भारतातील हॉटेल्स चालविते. गतवर्षी या कंपनीने गुरगावस्थित स्थावर मालमत्ता कंपनी बेस्टेक समूहाबरोबर धोरणात्मक भागीदारीतून २०२४ पर्यंत रॅडिसनच्या ४९ पार्क इन हॉटेल्सची उभारणी करण्याची घोषणा केली आहे. या सामंजस्यातून कार्लसनने गुरगाव व मोहाली येथील पहिल्या दोन हॉटेल्ससाठी २३० कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे.