मुंबईत अकादमीच्या पहिल्या केंद्राचे उद्घाटन  * एक लाख कुशल व्यक्तीचे लक्ष्य
कंपन्यांसाठी अनिवार्य असलेल्या कंपनी सामाजिक दायित्वाचा एक भाग म्हणून कौशल्य विकासावर अधिक भर देण्याचे आयसीआयसीआय समूहाने निश्चित केले असून चालू आर्थिक वर्षांत दायित्वापैकी निम्मी रक्कम ही कुशलविषयक मोहिमेवरच खर्च केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूण कंपनी सामाजिक दायित्वाकरिता (सीएसआर) २०० कोटी रुपये, तर त्यातील १०० कोटी रुपये हे कौशल्य विकासावर खर्च केले जातील, अशी घोषणा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी केली.
कोचर यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबई उपनगरातील आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या मुंबईतील पहिल्या कौशल्य अकादमी केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. लोकसंख्या ते रोजगार असे परिवर्तन होण्यासाठी कौशल्य विकास ही दरी कमी करणे आवश्यक असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी या वेळी २०२२ पर्यंत भारतातील सरासरी कष्टकरी वर्गाचे वय इतर देशांच्या तुलनेत अधिक तरुण, २९ वर्षे असेल, असे सांगितले.
सामाजिक दायित्वापोटी कंपन्यांना त्यांच्या नफ्यातील दोन टक्के रक्कम खर्च करणे बंधनकारक आहे. या हेतूने देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या खासगी बँकेने ऑक्टोबर २०१३ मध्ये कौशल्य अकादमी स्थापन केली. तिच्या अंतर्गत देशभरात चालविले जाणाऱ्या २२ कौशल्य अकादमीपैकी मुंबईतील ही अकादमी असेल. त्याचबरोबर फाऊंडेशनचे महाराष्ट्रात नरसोबाची वाडी, पुणे आणि नागपूर येथेही केंद्र आहे.
गेल्या दीड वर्षांत ६० हजार व्यक्तींना विविध १३ क्षेत्रांचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले असून पैकी जवळपास सर्वानाचा रोजगार प्राप्त झाल्याचे नमूद करत कोचर यांनी ३० टक्के प्रशिक्षितांमध्ये मुली असल्याचे या वेळी सांगितले.