News Flash

विमान क्षेत्राला करोनाचा फटका, आर्थिक वर्षात २१ हजार कोटींच्या तोट्याचा अंदाज

करोनाच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासावर आहेत निर्बंध

सध्या करोना महासाथीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. परंतु सर्वाधिक फटका हा विमान क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राला बसल्याचं दिसत आहे. क्रेडिट रेटिंग संस्था इक्रा लिमिटेडचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. यानुसार २०२१ या आर्थिक वर्षात विमान क्षेत्राला जवळपास २१ हजार कोटी रूपयांचा तोटा सहन करावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विमान कंपन्यांना हा तोटा सहन करावा लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विमान कंपन्यांना आपल्या तोट्यातून तसंच कर्जातून बाहेर येण्यासाठी २०२१ या आर्थिक वर्षापासून २०२५ या आर्थिक वर्षापर्यंत ३७ हजार कोटी रूपयांच्या अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम जाणवणार असल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या संख्येवरही मोठा परिणाम झाला आहे. महासाथीमुळे २३ मार्च नंतर देशांतर्गत सेवांसोबतच आंतरराष्ट्रीय सेवांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. कमी उत्पन्न आणि अधिक खर्च यामुळे विमान क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. परंतु सध्या यामध्ये आता सुधारणा दिसून येत आहेत, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत लीजबाबतची देणी सोडून विमान उद्योग क्षेत्रावरील कर्ज वाढून ५० हजार कोटी रूपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता अहवालातून व्यक्त करण्यात आली. इंडिगो आणि स्पाईसजेट लिमिटेड यांना आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते सप्टेंबर २०२० दरम्यान दररोज ३१ कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. आता ते दररोज २६ कोटी रूपयांपर्यंत आलं असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

करोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ आणि पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत व्यापक प्रमाणात लसीची उपलब्धता नसणं यामुळे प्रवासी संख्येवर परिणाम होऊ शकतो असं इक्रानं म्हटलं आहे. कोविडचं संकट संपल्यानंतर हळूहळू प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याचीही शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 3:54 pm

Web Title: indian aviation industry to report net losses of rupees 21000 in fy2021 icra coronavirus effect jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुढील तिमाहित जीडीपी वाढीचा दर सकारात्मक राहण्याची शक्यता, रेपो दर ‘जैसे थे’
2 सेन्सेक्सचा व्यवहारात ४५ हजारानजीक प्रवास
3 जीवन विमा प्रथम हप्ता संकलनात ऑक्टोबरमध्ये ३२ टक्क्य़ांची वाढ
Just Now!
X