News Flash

फेब्रुवारीतील सावरती महागाई!

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपात करण्यास पूरक ठरतील, असे महागाईचे दोन्ही प्रमुख आकडे सोमवारी जाहीर झाले.

| March 15, 2016 09:38 am

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपात करण्यास पूरक ठरतील, असे महागाईचे दोन्ही प्रमुख आकडे सोमवारी जाहीर झाले. यानुसार फेब्रुवारीतील किरकोळ महागाई दर घसरत ५.१८ टक्क्य़ांवर स्थिरावला आहे. तर गेल्या महिन्यातील घाऊक महागाई दर सगल १६ व्या महिन्यात नकारात्मक राहिला असून तो ०.९१ टक्के नोंदला गेला आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर कपात करण्यास किरकोळ दर महत्त्वाचा ठरतो. त्यातच जानेवारीतील औद्योगिक उत्पादन दरही घसरला आहे. तेव्हा येत्या महिन्यातील पतधोरणामार्फत उद्योग, कर्जदार वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. घसरत्या महागाई दराचे भांडवली बाजारानेही सप्ताहारंभी तेजीने स्वागत केले.
मुंबई शेअर बाजाराने सोमवारी गेल्या सहा आठवडय़ातील वरच्या टप्प्यावर झेप घेतली.
तर २८.५५ अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,५३८.७५ वर स्थिरावला. त्याचा सप्ताहारंभी सत्रातील तळाचा प्रवास ७,५१५.०५ राहिला.

किरकोळ दर तीन महिन्यांच्या तळात;सलग पाचव्या महिन्यानंतर घसरण
सलग पाच महिने तेजीत राहिल्यानंतर किरकोळ महागाई दर फेब्रुवारीमध्ये ५.१८ टक्क्य़ांपर्यंत घसरला आहे. भाज्या, डाळी तसेच फळांच्या किंमती कमी झाल्याने यंदाचा हा दर गेल्या तिमाहीच्या तळात विसावला आहे.ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर जानेवारी २०१६ मध्ये ५.६९ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी, फेब्रुवारी २०१५ मध्ये ५.३७ टक्के होता.
नोव्हेंबरनंतर यंदा प्रथमच दर किमान राहिला आहे. सण समारंभाच्या या महिन्यात तो ५.४१ टक्के होता. सलग ५ टक्क्य़ांच्या आसपास राहण्याची दर हालचाल मात्र कायम राहिली आहे. गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर ५.३० टक्के राहिला आहे. भाज्या, डाळी, दूत यांच्या किंमती कमी झाल्या आहेत. आधीच्या महिन्यात दर ६.८५ टक्के होता.
डाळींचे दर ३८.३० टक्क्य़ांपर्यंत कमी झाले आहेत. तर भाज्या ०.७० टक्क्य़ांपर्यंत स्थिरावल्या आहेत. फळांचे दर शून्याखाली, (-) ०.७२ टक्के राहिले आहेत. तर अंडी आदींच्या किंमती १९ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत.

शून्याखालील घाऊक निर्देशांक १६व्या महिन्यात नकारात्मक; व्याजदर कपातीसाठी निमित्त देणारी फेब्रुवारीतील आकडेवारी
घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित फेब्रुवारीमधील महागाई दर सलग १६ व्या महिन्यात घसरता राहिला आहे. गेल्या महिन्यातील (-) ०.९१ टक्के दर हा वर्षभरापूर्वीच्या (-)२.१७ टक्क्य़ांच्या तुलनेत मात्र वाढला आहे. तर जानेवारीत हा दर (-) ०.९० टक्के होता.
नोव्हेंबर २०१४ पासून हा दर सातत्याने कमी होत आहे. फेब्रुवारीतील अन्नधान्याचा दर ३.३५ टक्के राहिला आहे. जानेवारीमधील ६.०२ टक्क्य़ांच्या तुलनेत तो यंदा निम्म्यावर राहिला आहे. इंधन आणि ऊर्जा गटातील महागाई दरही यंदा कमी झाला आहे. डाळी आणि कांद्याचे दर अनुक्रमे ३८.८४ व (-)१३.२२ टक्के राहिले आहेत. भाज्यांच्या किंमती (-) ३.३४ टक्क्य़ांवर नोंदल्या गेल्या आहेत. बटाटय़ाचे तसेच अंडी, मटण, मांस यांचे दर मात्र वाढले आहेत.
महागाई दर जाहीर झाल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षेबाबत फिक्की या संघटनेने म्हटले आहे की, येत्या ५ एप्रिलच्या पतधोरणात व्याजदर कपात होण्यास हरकत नाही. त्याचबरोबर याचा लाभ बँकांनीही थेट कर्जदारांना देणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. असोचेम या अन्य उद्योग संघटनेने देशाची वित्तीय तूट ही सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पुढील आर्थिक वर्षांसाठी ३.५ टक्के राखायची असेल तर दर कपात आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
स्थिरावलेल्या महागाई दरामुळे रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याजदर कपातीची आशा वाढली आहे. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण येत्या महिन्यात जाहीर होणार आहे. गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींची प्रतिक्षा बघत गेल्या पतधोरणात दर स्थिर ठेवले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 9:38 am

Web Title: inflation was under control in february
टॅग : Inflation
Next Stories
1 मुंबई निर्देशांक दीड महिन्याच्या उच्चांकावर
2 आठवडय़ाची मुलाखत : विमा व्यवसायाचा वेग २०१६ मध्येही दुहेरी आकडय़ातच
3 ग्रामीण भारतात मिहद्राचे ट्रिंगो.कॉम नवीन ‘स्टार्ट अप’
Just Now!
X