रिझव्‍‌र्ह बँकेविरोधात खटल्यातून माघार

नवी दिल्ली : बँकेतील प्रवर्तकांचा हिस्सा कमी करण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेला खटला मागे घेण्याचा निर्णय खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेने गुरुवारी घेतला.

कोटक महिंद्र बँकेतील प्रवर्तकांचा खासगी बँकेतील हिस्सा २६ टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या सहा महिन्यांच्या मुदतीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. याबाबतचे रिझव्‍‌र्ह बँकेचे पत्र खासगी बँकेला बुधवारीच प्राप्त झाले. परिणामी मुंबई उच्च न्यायालयात दाखल खटला मागे घेत असल्याचे कोटक महिंद्र बँकेने गुरुवारी भांडवली बाजाराला कळविले.

कोटक महिंद्र बँकेला ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत प्रवर्तकांचा हिस्सा २० टक्क्यांपर्यंत तर ३१ मार्च २०२० पर्यंत तो १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले होते.

कोटक महिंद्र बँकेने याबाबत २६ टक्क्यांपर्यंतच प्रवर्तकांचा बँकेतील हिस्सा कमी करण्याची मागणी रिझव्‍‌र्ह बँकेला केली होती. ती सहा महिन्यांसाठी मान्य करण्यात आली. त्याचबरोबर २० टक्क्यांपर्यंतच्या प्रवर्तकांचा मतदान हक्क ३१ मार्च २०२० पर्यंत अबाधित ठेवण्याचेही रिझव्‍‌र्ह बँकेने मान्य केले.

सद्यस्थितीत बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी उदय कोटक व प्रवर्तकांचा बँकेतील हिस्सा २९.९६ टक्के आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये बँकेतील प्रवर्तकांचा हिस्सा १९.७० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सादर केलेला प्राधान्य समभागाचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेने नाकारला होता. त्यालाही बँकेने न्यायालयात आव्हान दिले होते.