विमान प्रवासारख्या आरामदायी आणि संवेदनशील सेवेत काही क्षेत्रे ही मुलांसाठी राखीव असावीत, असे मत अधिकतर प्रवाशांनी एका सर्वेक्षणात नोंदविले आहे. अशा सुविधेसाठी प्रसंगी तिकिटापोटी अधिक रक्कम मोजण्याचीही तयारीही प्रवाशांनी दाखविली आहे.
एअर एशिया एक्स अ‍ॅण्ड स्कूट एअरलाइन्समार्फत नुकताच असा खास मुलांसाठी हवाई प्रवास कंपनीच्या ताफ्यातील अनेक विमानांमध्ये सुरू करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘स्कायस्कॅनर’ने केलेल्या एका सर्वेक्षणात जवळपास एक हजार प्रवाशांनी आपले मत नोंदविताना या अभिनव सुविधेच्या बाजूने कौल दिला.
सर्वेक्षणात ४०० पुरुष व ३३० महिलांचा समावेश होता. एकूण ७३ टक्के प्रवाशांनी १२ वर्षांखालील मुलांसाठी विमानातील काही भाग मुक्तपणे वावरण्यासाठी खुला असावा तर काही संवेदनशील, धोकादायक क्षेत्रात मुलांना प्रवेश नसावा, असे मत नोंदविले. त्यासाठी नियमित तिकिटाव्यतिरिक्त १० टक्क्यांपर्यंत अधिक शुल्क मोजण्याची अभिप्रायही त्यांनी दिला. विमान कंपन्यांनी मुलांसाठी मुक्त परिसर उपलब्ध करून दिल्यास पालक प्रवाशांनाही निश्चिंतता मिळेल, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. ४३ टक्क्यांनी मात्र मुले ही काही मोठी माणसे नाहीत आणि त्यांच्यासाठी अधिक शुल्क भरण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. विमान प्रवासादरम्यान शांतता ही सर्वाधिक महत्त्वाची बाब असल्याचे ७० टक्के पुरुष व ६६ टक्के महिलांचे म्हणणे आहे. म्हणून मुले सोबत असलेल्या प्रवाशांनी विमानाच्या सर्वात टोकाच्या आसनांवर बसावे, असे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या प्रत्येक पाचपैकी दोन प्रवाशांनी  सुचविले आहे.
मुले सोबत असलेल्या प्रवाशांनी विमानाच्या सर्वात टोकाच्या आसनांवर बसावे, असे सर्वेक्षणात भाग घेतलेल्या प्रत्येक पाचपैकी दोघांनी सुचविले आहे