सेंट्रमला लघू वित्त बँक परवाना प्रदान

मुंबई : एचडीआयएल कर्ज घोटाळ्यात पोळून निघालेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या पुनरुज्जीवनाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. पीएमसीच्या व्यवसायासह मालमत्तेचे अधिग्रहण सुलभ व्हावे यासाठी लघू वित्त बँक परवान्यासाठीच्या सेंट्रम फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसच्या अर्जाला रिझव्‍‌र्ह बँकेने मंजुरी दिली.
‘पीएससी’करिता सेंट्रमने फेब्रुवारी २०२१ मध्ये स्वारस्य दाखवले होते. यासाठी आवश्यक प्रक्रियेच्या पहिल्या पायरीला, लघू वित्त बँक स्थापन करण्याच्या अर्जाला मध्यवर्ती बँकेने शुक्रवारी प्राथमिक मंजुरी दिली. विलिनीकरण प्रक्रियेऐवजी समभाग खरेदी वा अन्य मार्गाने ‘पीएमसी’चा तिढा सोडविण्याचा सरकारचा प्रयत्न यशस्वी ठरण्यार आहे.
सेंट्रम ही ९० च्या दशकात स्थापन झालेली दलाली पेढी, वित्त तसेच बँकिंग सेवा क्षेत्रातील उपकंपनी आहे. सेंट्रमबरोबरच भारतपेदेखील ‘पीएमसी’साठी उत्सुक होते. उभय वित्त नाममुद्रा एकत्रित लघू वित्त बँकेच्या माध्यमातून हा व्यवहार करणार होते. मात्र सेंट्रमच्या आगामी आडाख्याबाबत तूर्त काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. एचडीआयएलला दिलेल्या ६,५०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात पीएमसीवर रिझव्‍‌र्ह बँकेने २०१९ मध्ये र्निबध लादले.