नवी दिल्ली : आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजिज्चे सर्वेसर्वा व दानशूर व्यक्ती म्हणून लोकप्रिय असलेल्या शिव नाडर यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. ते आता कंपनीचे मानद अध्यक्ष तसेच धोरणात्मक सल्लागार असतील.

वयाची ७६ वर्षे पूर्ण करत असल्याने नाडर यांनी या पदाचा राजीनामा दिला असून या पदावर आता कंपनीचे विद्यमान अध्यक्ष व मुख्याधिकारी सी. विजयकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजयकुमार हे पुढील पाच वर्षांसाठी कंपनीचे मुख्याधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक असतील. तर पूर्वाश्रमीच्या आयबीएमच्या  वनिता नारायण यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

शिव नाडर हे वर्षभरापूर्वी कंपनीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर ती सूत्रे त्यांची कन्या रोशनी नाडर – मल्होत्रा यांच्याकडे देण्यात आली होती. भांडवली बाजारात सूचिबद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. १९७६ साली स्थापना झालेल्या एचसीएल समूहाने १९९४ मध्ये सामाजिक दायित्वासाठी शिव नाडर फाउंडेशन स्थापित केले.

वर्षभरात २२ हजार कर्मचारी भरतीचे नियोजन

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षांच्या तिमाहीत नवे ७,५२२ कर्मचारी जोडणाऱ्या एचसीएल टेक्नॉलॉजिज्ने संपूर्ण वर्षांकरिता नवीन २२,००० कर्मचारी सामावून घेत असल्याचे जाहीर केले आहे. जून २०२१ अखेर कंपनीतील एकूण मनुष्यबळ १,७६,४९९ आहे. पैकी १४,६०० कर्मचारी गेल्या वर्षांत दाखल झाले आहेत. कंपनीत चालू वित्त वर्षांत नव्याने २० हजार ते २२ हजार कर्मचारी दाखल होतील, असे कंपनीचे मुख्य मनुष्यबळ विकास अधिकारी व्ही. व्ही. अप्पाराव यांनी जाहीर केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ५० टक्के अधिक असेल.