नवी दिल्ली : गेल्या सप्ताहअखेरीस सरकारने देशांतर्गत उत्पादिते नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी ४० टक्क्यांची वाढ केल्याचा परिणाम म्हणून, वीज, खते आणि वाहनांच्या इंधनांसह, स्वयंपाकाच्या इंधन खर्चात लवकरच मोठय़ा दरवाढीची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागू शकते. विश्लेषकांनी सोमवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सीएनजीच्या किमतीत किलोमागे थेट ८ ते १२ रुपयांची आणि पाइपद्वारे घरोघरी स्वयंपाकगृहापर्यंत पोहोचणाऱ्या पीएनजीमध्ये प्रति युनिट किमान ६ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारने गेल्या आठवडय़ात जुन्या (एपीएम) वायू साठय़ांमधून उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या किमती सध्याच्या प्रति युनिट (एमएमबीटीयू) ६.१ डॉलरवरून ८.५७ डॉलरवर नेण्याचा निर्णय घेतला. केजी खोऱ्यामधील डी ६ सारख्या नवीन क्षेत्रातून उत्पादित वायूच्या किमती प्रति युनिट ९.९२ डॉलरवरून १२.४६ डॉलपर्यंत वाढवल्या आहेत.

देशात उत्पादित होणाऱ्या सर्व वायूंपैकी दोनतृतीयांश वायू हा एपीएम क्षेत्रातून येतो. हा वायू वाहनांसाठी इंधनरूपात वापरात येणाऱ्या सीएनजीमध्ये रूपांतरित केला जातो आणि स्वयंपाकासाठी पीएनजी म्हणून वापरात येतो.

कोटक इन्स्टिटय़ूशनल इक्विटीजच्या टिपणानुसार, एपीएम वायूच्या किमती एका वर्षांत जवळपास पाच पट वाढल्या आहेत – सप्टेंबर २०२१ मध्ये प्रति युनिट (एमएमबीटीयू) १.७९ अमेरिकी डॉलर असलेल्या किमती प्रति युनिट ८.५७ डॉलरवर गेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर वायूंच्या किमतीत वाढ झाल्याने ही दरवाढ करण्यात आली असल्याचे सरकारने म्हटले आहे.

कोटकच्या मते, शहर वायू वितरण कंपन्यांना नजीकच्या काळात त्यांच्या मिळकतीवर परिणाम होणार नाही हे पाहताना सीएनजी व पीएनजीच्या  किमती वाढवाव्या लागतील.