मुंबई : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध निवळण्याच्या आशेने बुधवारी आशियाई देशातील बाजारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परिणामी देशांतर्गत पातळीवर निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि एचडीएफसीच्या समभागात गुंतवणूकदारांनी जोमदार खरेदी केली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७४०.३८ अंशांनी (१.२८ टक्के) वधारून ५८,६८३.९९ या सहा आठवडय़ातील उच्चांकी पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १७२.९५ (१.०० टक्के) अंशांची कमाई केली आणि तो १७,४९८.२५ पातळीवर स्थिरावला. १० फेब्रुवारीनंतर निफ्टीने गाठलेली ही उच्चांकी पातळी आहे. सलग तीन सत्रांत सेन्सेक्समध्ये १,३२१ अंशांची वाढ झाली आहे. तर निफ्टीमध्ये ३४५ अंशांची वाढ होत तो १७,५०० या महत्त्वपूर्ण पातळीजवळ पोहोचला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक बाजारपेठेत अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. मात्र रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चेमुळे युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे, ज्यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. खनिज तेल आणि इतर जिन्नसांच्या किमतींमध्ये नरमाई आल्याने कंपन्यांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदले. बजाज फिनसव्‍‌र्हचा समभाग बुधवारच्या सत्रात सेन्सेक्समधील सर्वाधिक ३.८२ टक्क्यांची वाढ नोंदविणारा समभाग ठरला. त्यापाठोपाठ मिहद्र अ‍ॅण्ड मिहद्र, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, नेस्ले, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग आघाडीवर होते.