मुंबई : सलग पाच सत्रांत सुरू राहिलेल्या तीव्र स्वरूपाच्या घसरणींनंतर बुधवारी भांडवली बाजारात तेजी परतली. जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांमुळे भांडवली बाजाराला अधिक बळ मिळाले आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस आणि एचडीएफसी बँक यांच्या समभाग खरेदीवर गुंतवणूकदारांनी जोर दिल्याने सेन्सेक्स-निफ्टीला घसरणपथ रोखून वाढ साधता आली. 

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५७४.३५ (१.०२ टक्के) वाढीसह ५७,०३७.५० पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ७५३.३६ अंशांची झेप घेत ५७,२१६.५१ च्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १७७.९० (१.०५ टक्के) अंशांची कमाई केली. दिवसअखेर हा निर्देशांक १७,१३६.५५ पातळीवर स्थिरावला.

सतत सुरू राहिलेल्या विक्रीने आकर्षक किमतीला उपलब्ध एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने मंगळवारच्या सत्रातील झालेल्या घसरणीचे नुकसान भरून निघू शकले. दुसरीकडे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा कायम असून, त्यांच्याकडून भांडवली बाजारातून निधीचे अविरत निर्गमन सुरू आहे. मात्र देशांर्तगत गुंतवणूकदारांकडूनदेखील घसरलेल्या किमतीला समभाग खरेदी सुरू असल्याने बाजारातील खरेदी-विक्रीचा तोल संतुलित राखण्यास मदत होत आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

आठ लाख कोटींची मत्ता लयाला!

गेल्या पाच सत्रांतील घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी आठ लाख कोटी रुपयांची मत्ता गमावली आहे. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये गेल्या पाच सत्रांत ५.०१ टक्क्यांची घसरण होत, त्याने २,९८४.०३ अंश गमावले आहेत. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात पाच सत्रात ८,०८,०६७.६ कोटींची घसरण होत ते २,६६,०२,७२८.४५ कोटींवर पोहोचले होते. मात्र बुधवारच्या सत्रातील तेजीमुळे बाजार भांडवलातील या घसरणीची काहीशी भरपाई होऊ शकली आहे.