मुंबई : युक्रेनच्या संकटामुळे मोठी मूल्यघसरण झालेले माहिती-तंत्रज्ञान, औषध निर्माण,वित्तीय समभागांत गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याने, चार दिवसांच्या घसरणीचे सत्र सोडून मंगळवारी भांडवली बाजाराच्या मुख्य निर्देशांकांनी चमकदार वाढ नोंदविली. जागतिक स्तरावर भांडवली बाजारात मात्र युद्धछायेमुळे अस्थिरतेतून संमिश्र वातावरण होते.  मंगळवारच्या स्थानिक बाजारात अस्थिरतेपायी सुरू राहिलेल्या चढउतारांवर मात करत, निर्देशांकांनी व्यवहाराच्या शेवटच्या तासात बाजारात वाढलेल्या खरेदीच्या गतीमुळे सकारात्मक शेवट केला. परिणामी ‘सेन्सेक्स’ने ५८१.३४ अंश अर्थात १.१० टक्क्यांची भर घालून, ५३,४२४.०९ या पातळीवर बंद  झाला. बरोबरीने ‘निफ्टी’ने १५०.३० अंश अर्थात ०.९५ टक्के वाढ साधली. या निर्देशांकाने त्यामुळे सोमवारच्या पडझडीत गमावलेली १६ हजारांची पातळी पुन्हा कमावली आणि दिवसअखेर तो १६,०१३.४५ पातळीवर बंद झाला.