आशीष ठाकूर

निफ्टी निर्देशांक १०,८०० पर्यंत घरंगळत आल्यावर तेजीची आशाच मावळल्यागत जमा झाली होती. पण अल्पावधीत निफ्टीने आपला तोल सांभाळत जो काही तेजीचा पदन्यास करत, बाजारावर जे तेजीचे चांदण शिंपित, सर्वाना सुख, समृद्धीत न्हाऊ घालत दिवाळीचे अभीष्टचिंतन केले ते केवळ लाजवाब! आता तेजीच्या फटाक्यांच्या आतषबाजीसाठी या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शनिवारच्या मुहूर्ताच्या विशेष व्यवहारानंतरचा बंद भाव:

सेन्सेक्स: ४३,६३७.९८

निफ्टी: १२,७८०.२५

जेव्हा निर्देशांक, म्हणजे सेन्सेक्स ३६,६५० आणि निफ्टी १०,८०० वर होता तेव्हापासून निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४३,००० आणि निफ्टीवर १२,६०० असे सूचित केलेले होते ते आता साध्य झालेले आहे.

आता कळीचा प्रश्न येणाऱ्या दिवसातील निफ्टी निर्देशांकाचा नवीन उच्चांक अथवा भरभक्कम आधार काय असेल?

येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ४०० अंशांचा असेल. निफ्टी निर्देशांकावर १२,४०० चा केंद्रबिंदू स्तर मानून आपण निफ्टी निर्देशांकाची वरची अथवा खालचे लक्ष्य काढूया. १२,४०० च्या स्तरावर ४०० अंश मिळवले असता १२,८०० आणि १२,८०० मध्ये ४०० अंश मिळवले असता १३,२००चे वरचे लक्ष्य असेल. आता निफ्टी निर्देशांकाच्या खालच्या लक्ष्यासाठी १२,४०० उणे ४०० अंश १२,००० आणि १२,००० उणे ४०० अंश ११,६०० हे निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य / भरभक्कम आधार असेल. आता अल्प मुदतीची गुंतवणूक धारणा असलेल्या गुंतवणूकदारांनी प्रत्येक वाढीव टप्प्यावर नफारूपी विक्री करून हेच मुद्दल डिसेंबर ते जानेवारीमधील संभाव्य मंदीत त्यांना फेरखरेदीसाठी उपयोगात आणता येईल.

जाहीर झालेले कंपन्यांचे वित्तीय निकाल आणि विश्लेषण..

‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेचा प्रत्यक्ष फायदा वाचकांसाठी व्हावा यासाठी ‘लोकसत्ता-अर्थवृतान्त’ने वाचकांच्या समभागांचा निकालपूर्व विश्लेषणाचा उपक्रम हाती घेतला.

आता ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ ही संकल्पना काळाच्या कसोटीवर उतरली का? या संकल्पनेची ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ या न्यायाने परखड चिकित्सा होणे गरजेचे आहे. या दृष्टीने आपण या स्तंभातील ५ ऑक्टोबरच्या लेखातील, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील, गुणवत्तेचा मापदंड जोपासणाऱ्या इन्फोसिस लिमिटेड समभागाचा दाखला घेऊया. तिमाही वित्तीय निकालाची नियोजित तारीख ही १४ ऑक्टोबर होती. १ ऑक्टोबरचा बंद भाव १,०१७ रुपये होता आणि निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ९५० रुपये होता. तिमाही वित्तीय निकाल जाहीर झाल्यानंतर, समभागाचा बाजारभाव महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तरावर टिकला, तर तिमाही निकाल चांगला, अन्यथा वाईट. लेखात म्हटल्याप्रमाणे जर निकाल उत्कृष्ट असेल तर ९५० रुपयांचा स्तर राखत १,१३० रुपयांचे वरचे लक्ष्य सूचित केले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. इन्फोसिसने निकालापश्चात ९५० रुपयांचा स्तर राखत १५ ऑक्टोबरला १,१८६ रुपयांचा उच्चांक नोंदवला. ज्या वाचकांकडे इन्फोसिस दीर्घ मुदतीच्या गुंतवणूक धारणेअंतर्गत आहेत त्यांनी ते राखून ठेवले व अत्यल्प मुदतीची धारणा असलेल्या  गुंतवणूकदारांना अल्पावधीत ११ टक्कय़ांचा परतावा मिळविला. आजही इन्फोसिस ९५० रुपयांचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखून आहे आणि १४ नोव्हेंबरचा बंद भाव हा १,१३३ रुपये आहे.

त्याच लेखातील (५ ऑक्टोबरच्या) दुसरा समभाग होता टीसीएस लिमिटेड. समभागाचा १ ऑक्टोबरचा बंद भाव २,५२२ रुपये होता, निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर २,४५० रुपये होता. लेखात म्हटल्याप्रमाणे, जर वित्तीय निकाल उत्कृष्ट असेल तर २,४५० रुपयांचा स्तर राखत वरचे लक्ष्य २,६५० रुपये दिले होते. हे प्रत्यक्ष निकालाअगोदरचे विश्लेषण होते. टीसीएसने निकालाबरोबरच, समभाग पुनर्खरेदीची (बायबॅक) घोषणा करत ही किंमत ३,००० रुपये निर्धारित केली. आता पाहा निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकावर, तीन हजार रुपयांचे समभाग पुनर्खरेदीच तेजीचे इंधन, अशावेळी खरे तर टीसीएस ३,००० रुपयांच्या पल्याड असायला हवा! पण टीसीएसचा १४ नोव्हेंबरचा बंद भाव हा बरोबर २,६७० रुपयांवर आहे.

इन्फोसिस आणि टीसीएस या दोन्ही समभागांचे मुहूर्ताच्या सौद्यांचे बंद बाजारभाव सूचित केलेल्या वरच्या लक्ष्यासमीप आहेत. विलक्षण आयोग आणि  घडले ते नवलच! (क्रमश:)

ashishthakur1966@gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक