|| अजय वाळिंबे

हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लि. (बीएसई कोड – ५३२१२९)

जुलै / ऑगस्ट हे महिने गुंतवणूकदारांसाठी खरे तर महत्त्वाचे. कारण याच काळात कंपन्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करतात. आपण गुंतवणूक केलेल्या कंपन्यांची कामगिरी कशी आहे, तसेच नवीन गुंतवणूक करायची झाल्यास, खरेदी/ विक्रीचा निर्णय घेण्यासाठी हे आर्थिक निकाल खूप महत्त्वाचे ठरतात. सध्याची शेअर बाजारातील परिस्थिती पाहता कुठलाही अभ्यास न करता गुंतवणुकीचा/ निर्गुतवणुकीचा निर्णय महाग ठरू शकतो.

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे फार्मा, माहिती तंत्रज्ञान, एफएमसीजी इ. क्षेत्रांतील गुंतवणूक या काळात तारक तसेच दीर्घकाळात फायद्याची ठरू शकेल.

हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज ही भारतातील माहिती तंत्रज्ञान, बीपीओ आणि सेवा क्षेत्रातील एक आघाडीची जागतिक कंपनी आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने माहिती तंत्रज्ञान, बीपीओ आणि सेवा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी म्हणून जगभरात आपले नाव प्रस्थापित केले आहे. कंपनीने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून अनुभवी आयटी प्रॅक्टिशनर्स, प्रतिष्ठित अभियंते आणि ‘ऑटोमेटर’ यांच्या साहाय्याने तसेच बुद्धी, सर्वव्यापी डेटाची शक्ती आणि शक्तिशाली अल्गोरिदम आणि भरपूर कॉम्प्युटिंग यांचे संयोजन वापरून नवीन सुपरचाज्र्ड ग्रोथ स्ट्रॅटेजी विकसित केली आहे. यामध्ये ‘ऑटोमेट एव्हरी थिंग’, ‘क्लाउडफाइड एव्हरी थिंग’ जे डिजिटल युगात वेगवान-ट्रॅकिंग उद्योगांना मदत करते यांचा समावेश होतो. हेक्झावेअरची जगभरात ३३ कार्यालये असून सुमारे १४,६०० कर्मचारी कार्यरत आहेत.

गेला काही काळ जागतिक क्षेत्रात मंदीचे वातावरण असूनही कंपनीने जून २०१९ साठी संपलेल्या तिमाहीसाठी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवली आहे. गेल्या वर्षांच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत १५.१० टक्के वाढ साध्य करून तो १,३०८.३४ कोटी रुपये, तर नक्त नफ्यात १.४५ टक्के घट होऊन तो १५१.३५ कोटी रुपयांवर आला आहे. यंदा कंपनीने आपल्या कार्यकक्षा वाढविण्यासाठी मोबिक्विटी इन्क ही कंपनी ताब्यात घेतली, तसेच आखाती देशात दुबई येथे नवीन कार्यालय सुरू केले आहे. आगामी कालावधीत कंपनीची कामगिरी समाधानकारक राहील अशी आशा आहे. मध्यम कालावधीसाठी अल्प बीटा (०.५) हेक्झावेअरमध्ये गुंतवणूक केल्यास २५ टक्के परतावा मिळू शकेल.

सूचना :

  • प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
  • लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.