मागे एकदा मी गुंतवणुकीच्या घडय़ाळासंबंधी लिहिले होते. या घड्याळातील काटे सध्या तेजीचे वारे दाखवत आहेत. त्यामुळे खरेदीची वेळ तेजीच्या झोनमधली असू शकते. चाणाक्ष गुंतवणूकदार अशा वेळी आपल्या पोर्टफोलिओतील किमान ३०% शेअर्स विकून टाकतो आणि नफा पदरात पाडून घेतो. धोका पत्करणारे गुंतवणूकदार मात्र नंदी-फंदी (‘बुलिश’) असल्याने ते शेअर्स जास्त नफा कमावण्याच्या उद्दिष्टाने शेअर्स ठेवून देतील. जे नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांनी मात्र सध्याच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. तेजीत कमावलेले पसे गुंतविणार कुठे असा प्रश्न अनेकांना पडत असेल. माझ्या मते शेअर बाजारात कमावलेला नफा योग्य आर्थिकनियोजन करून अशा रीतीने गुंतवावा की आपल्या उतारवयात आपण पूर्ण स्वावलंबी असू. चलनवाढीचा वेग आणि दुष्परिणाम पाहता निवृतीपश्चात आपले मासिक उत्पन्न किती असायला हवे याचा अंदाज घ्या. योग्य वेळी योग्य ठिकाणी केलेली दीर्घकालीन गुंतवणूक कायम फायद्याचीच ठरते हे लक्षात ठेवा. ‘श्री शिल्लक’ हे विनायक कुलकर्णी यांचे पुस्तक नुकतेच वाचनात आले. कुठल्याही सामान्य माणसांनी वाचावे असे संग्रही ठेवण्याजोगे हे पुस्तक आहे. निवृत्ती पूर्व आणि निवृत्तीनंतर देखील गुंतवणूक किती महत्वाची असते हे पुस्तक वाचल्यावरच समजेल.

१९९१ मध्ये पॉलिमर पॅकेजिंग पासून सुरुवात केलेली टाइम टेक्नोप्लास्ट आज भारतातील एक अग्रगण्य औद्योगिक पॅकेजिंग कंपनी आहे. भारताखेरीज बहारीन, बेल्जियम, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, कोरिया, मलेशिया, पोलंड, सिंगापूर, शारजाह, तवान, थायलंड आणि व्हिएतनाम इ. देशांतून कंपनी कार्यरत आहे. कंपनीची पाच प्रमुख व्यावसायिक उत्पादने असून यात औद्योगिक पॅकेजिंग, लाइफस्टाइल, ऑटो कम्पोनंन्ट्स, हेल्थकेअर आणि पायाभूत सुविधा इ. उत्पादंनांचा समावेश होतो. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत अजूनही आशिया खंडातील देशांत पॅकेजिंगमध्ये प्लास्टिकचा वापर खूप कमी आहे. त्यामुळेच टाइम टेक्नोप्लास्ट सारख्या कंपनीला खूप वाव आहे. गेली तीन वर्ष कंपनीने नूतनीकरण, विस्तारीकरण आणि कंपन्या ताब्यात घेण्यासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च केले आहेत. परदेशातही कंपनीने आपले बस्तान व्यवस्थित बसविले आहे. दुर्दैवाने कंपनी तिच्या अनेक कारखान्यातून पूर्ण क्षमतेने उत्पादन घेत नसल्याने हवे तसे परिणाम अजून दिसलेले नाहीत. मात्र सध्या मंदीची मरगळ दूर होत असल्याचे संकेत मिळत असल्याने लवकरच कंपनी पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करेल अशी अपेक्षा आहे. यंदाच्या आर्थिकवर्षांच्या पहिल्या तिमाहीत २९४.३० कोटी रुपयांच्या उलाढालीवर १२.१७ कोटी रूपयांचा नफा कमावणाऱ्या टाइम टेक्नोप्लास्टकडून येत्या दोन वर्षांत भरीव कामगिरी अपेक्षित आहे. सध्या उच्चांकावर असलेला हा शेअर दोन वर्षांसाठी एक फायद्याची गुंतवणूक ठरू शकेल.