आशीष ठाकूर

गेल्या लेखात उल्लेख केलेले निर्देशांकाचे म्हणजे सेन्सेक्सवरचे ३८,६०० आणि निफ्टीवरील ११,३५०चे वरचे लक्ष्य सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी साधले गेले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: ३८,४३४.७२ / निफ्टी : ११,३७१.६०

गुंतवणूकदारांची अस्वस्थता वाढत चालली आहे. आज अर्थव्यवस्थेच्या उदासीन वातावरणात तेजाळलेला भांडवली बाजार हा गुंतवणूकदारांना बुचकळ्यात टाकत आहे. किंबहुना हा आपल्यासाठी तेजीचा सापळा तर नाही ना?अशी भावना सामान्य गुंतवणूकदारांची आहे. निराशाजनक बातम्यांमध्ये.. गेल्या सहा महिन्यांत करोनाकाळात एक कोटीहून अधिक लोकांनी प्रत्यक्ष रोजगार गमावले,तर अप्रत्यक्ष रोजगार गमावल्याची तर गणतीच नाही. ज्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेच्या क्रयशक्तीवर होतो, बँकांच्या अनुत्पादित कर्जामध्ये वाढ होते. या व इतर अशा सर्व निराशाजनक बातम्यांची दाहकता कमी करण्यासाठी, त्यावरील लक्ष हटवण्यासाठी तेजाळलेला भांडवली बाजाराचा निर्देशांक तर नाही ना? या निराशाजनक गोष्टी घडत असताना बाजाराचे वर्तन हे असे उत्सवी-उत्साही. निराशाजनक बातम्यांचा निर्देशांकावरील तेजीवर काहीही परिणाम होत नाही. सर्व निराशाजनक बातम्यांची तीव्रता, घनता बाजारांनी कधीच पचवून, गृहीत धरून बाजाराचा निर्देशांक वर जात आहे. पण चिंता नसावी, सर्व काही आलबेल चालू आहे, असे दाखवत गुंतवणूकदारांना अक्षरश: भरीला पाडून समभागांची खरेदी करण्यास प्रवृत्त करायचे आणि एकदा का गुंतवणूकदारांची खरेदी झाल्यावर, एखाद्या गाफील क्षणी वरील सर्व ज्ञात निराशाजनक कारणांची जंत्री देत बाजार कोसळवायचा. १९९२ पासून आतापर्यंत बाजारांनी हीच पद्धत अवलंबली आहे, पण या प्रक्रियेत गुंतवणूकदार मात्र अक्षरश:रस्त्यावर आले व तोंडातून उद्गार आले..‘लबाडाघरचे आवतन जेवल्याखेरीज खरे नाही’.

हे टाळायचं असेल तर आपण तांत्रिक विश्लेषणातील ‘डो संकल्पनेचा’ आधार घेऊया.

तांत्रिक विश्लेषणातील ‘डो’ संकल्पनेप्रमाणे तेजीची अथवा मंदीची धारणा विकसित झाल्यावर ती किमान एक वर्ष चालते. या वर्षी २० जानेवारी २०२०ला सेन्सेक्सवर ४२,२७३ आणि निफ्टीवर १२,४३०चा उच्चांक नोंदवत मंदी सुरू झाली. अवघ्या दोन महिन्यांत ४० टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे येणाऱ्या जानेवारी २०२१ पर्यंत हे मंदीचे चक्र चालू राहण्याची  शक्यता आहे. येणाऱ्या सहा महिन्यांतील निर्देशांकाची वाटचाल व त्यांचे संभावित स्तर याचा आज आपण आढावा घेऊया.

सप्टेंबरच्या पूर्वार्धात अथवा अखेरीपर्यंत निर्देशांकांचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४०,३००आणि निफ्टीवर ११,८०० असे असेल. तेथून एक घसरण अपेक्षित असून जिचे खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३७,३५०आणि निफ्टीवर १०,८५० असे असेल.

तेजी-मंदीची अचूकता साधायची असल्यास सेन्सेक्सवर ४०,३०० ते ३७,३५० आणि निफ्टी निर्देशांकावर ११,८०० ते १०,८०० या सामान्य मार्गक्रमण पट्टय़ाला (बॅण्डला) अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या दिवशी सेन्सेक्स ३७,००० आणि निफ्टी १०,८०० च्या खाली टिकेल, तेव्हापासून मंदीचे आवर्तन सुरू होऊन निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३५,९०० आणि निफ्टीवर १०,५५० असे असेल. उपरोक्त स्तराखाली निर्देशांक सातत्याने टिकल्यास, निर्देशांक मंदीच्या गर्तेत सापडून सेन्सेक्स ३१,९८० ते २९,९५० आणि निफ्टी ९,४०० ते ८,८०० पर्यंत खाली घसरू शकते. या मंदीचा कालावधी हा जानेवारी २०२१पर्यंत असेल.

समभागांच्या संच बांधणीचा पुनर्वेध..

या स्तंभातून ६ एप्रिल २०२० साली सुचविलेल्या समभाग संच बांधणीतल्या समभागांनी आकर्षक परतावा दिल्याने अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांनी नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर.

१) अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्केट लिमिटेड (रु.२,०६७ ते २१ ऑगस्टचा बंद भाव रु. २,२५९) २) आयआरसीटीसी लिमिटेड (रु. १,०८३ वरून रु. १,३४१) ३) आयटीसी लिमिटेड (रु. १७८ वरून रु. १९६) ४) नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड (रु. १,२६७ वरून रु. २,०९७) ५) बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड (रु. ११४ वरून रु. १५८) ६)अजंठा फार्मा लिमिटेड (रु.१,३१२ वरून रु. १,६२२) ७) आयओएल केमिकल्स लिमिटेड (रु. १९३ वरून रु. ८१७) ८) अ‍ॅक्झो नोबेल इंडिया लिमिटेड (रु. २,०६६ वरून रु. २,१००) ९) वेदांता लिमिटेड (रु. ६३ वरून रु. १३०) १०) सिप्ला लिमिटेड (रु. ४४९ वरून रु. ७६०) ११) टाटा केमिकल्स लिमिटेड (रु. २१८ वरून रु. ३१५ ) १२) एफडीसी लिमिटेड (रु. २०० वरून रु. ३२७ ) १३) इंडिया सिमेंट लिमिटेड (रु. १०१ वरून रु. ११७) १४) सीडीएसएल लिमिटेड (रु. २१० वरून रु. ३७८) १५) निप्पॉन इंडिया ईटीएफ निफ्टी बीज (रु. ८६ वरून रु. १२१)

तेजीत नफारूपी विक्री करणे श्रेयस्कर हे कोण सांगू शकते? ज्यांनी दाहक मंदीत समभाग खरेदी करायची यादी दिलेली असते त्यांनीच. जेव्हा तेजीबद्दलच शंका उत्पन्न होते, मनाला पटत नाही, तेव्हा रोकडता हे त्यावरचे उत्तर असते (कॅश इज किंग). एकदा का बाजार कोसळला की सर्व काही स्वस्तात मिळते. ओन्ली टाइम मॅटर्स!