Astrologer Warns About Turmeric in Water: सध्या सोशल मीडियावर हळदीची चांगली चर्चा रंगली आहे. पाणी आणि हळदीचा एक भन्नाट ट्रेंड जगभरात लोकप्रिय होत असून, अनेक लोक यावर रील्स, व्हिडीओ बनविताना दिसत आहेत. ‘टर्मरिक ग्लो ट्रेंड’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्हायरल रीलमध्ये लोक घरातल्याच सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून, मोबाईलचा टॉर्च आणि पाण्यात हळद टाकून झगमगती दृश्ये तयार करीत आहेत. पाहणाऱ्याला क्षणभरासाठी हा प्रकार जादू असल्यासारखा भासतो. पण, ज्योतिषशास्त्र आणि तांत्रिक दृष्टिकोनातून हा ट्रेंड गंभीर परिणाम घडवू शकतो, असा इशारा दिला जात आहे.
अनेक लोक रात्रीच्या अंधारात पाण्यात हळद घालून रील्स किंवा व्हिडीओ तयार करीत आहेत. काचेचा ग्लास, मोबाईलचा टॉर्च आणि त्यात चमकणारी हळद दिसायला तर हे सगळं भारी वाटतं; पण या ट्रेंडच्या मोहात अडकणं, तुमच्यावर वाईट परिणाम करू शकतं, असं ज्योतिषशास्त्राचं गंभीर आणि धक्कादायक मत आहे.
ज्येष्ठ ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांनी या ट्रेंडविषयी एक गंभीर इशारा दिला असून, त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्यास यांच्या म्हणण्यानुसार, “पाण्यात हळद टाकणं ही तांत्रिक क्रिया आहे. ती सहजासहजी कोणी करू नये. असं केल्यानं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते, तसेच भूत-प्रेतांचंही निमंत्रण मिळू शकतं.”
ते पुढे म्हणाले की, “ही क्रिया आपल्या कुंडलीतील चंद्र आणि गुरू ग्रहांना कमजोर करते, ज्याचा थेट परिणाम मानसिक स्थैर्य, निर्णयक्षमता व भाग्यावर होऊ शकतो. ही कृती पूर्णपणे अपायकारक असून, त्यामुळे घरातील सुखशांतीवरही वाईट परिणाम होऊ शकतो.” त्यामुळे त्यांनी लोकांना विनंती केली आहे, “फॅशन किंवा ट्रेंड म्हणून असे काही करू नये, जे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.”
या इशाऱ्याचा व्हिडीओ काही तासांतच पाच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, हजारो युजर्सनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी चिंतेने विचारले, “आता काय करू? मी तर आधीच रील बनवलीये.” तर काहींनी प्रश्न केला, “काही ज्योतिषी तर हळद पाण्यात घालून स्नान करायला सांगतात; मग यात चूक काय?”
ज्योतिषी काय म्हणाले, येथे पाहा व्हिडीओ
या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही लोक याला केवळ अंधश्रद्धा मानत असले तरी काहींनी हा इशारा गांभीर्याने घेतल्याचे दिसते.
(सूचना : वरील माहिती व्हायरल व्हिडीओ आणि सोशल मीडियावर आधारित आहे. या गोष्टींचा लोकसत्ता कोणताही वैज्ञानिक अथवा आध्यात्मिक दावा करीत नाही किंवा त्याला दुजोरा देत नाही.)