28 November 2020

News Flash

बुकबातमी : ‘२६/११’ आणि नंतरची जिद्द..

‘ताज’ची रक्तानं माखलेली लॉबी साफ-सुरक्षित करून खोल्यांकडे हे कमांडो-पथक गेलं

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण तेवटिया मूळचा बुलंदशहरचा. रीतसर प्रशिक्षणानंतर नौदलाच्या ‘मरीन कमांडो’ किंवा ‘माकरेस’ विभागात कमांडो म्हणून सेवा बजावत होता. काश्मीर, कारगिल इथंही काम केलेला हा ‘माकरेस’ विभाग मुंबईत सागरी तस्करी रोखण्याचं वगैरे काम अधिक करी, असा २००८ साली २४ वर्षांचा असलेल्या प्रवीणचा अनुभव. त्या दिवशी गावी जाण्याचं तिकीट काढण्यासाठी प्रवीण कुलाब्याच्या नेव्हीनगरातून चर्चगेटला गेला. परत येऊन टीव्हीवर क्रिकेटची मॅच पाहात बसला, थोडय़ा वेळानं आराम करण्यासाठी गेला, तेवढय़ात गेटवर गोंगाट होतोय, खूप फोन वाजताहेत असं ऐकून तो कानोसा घेऊ लागला, तेवढय़ात ओडी (ऑफिसर ऑफ द डे) कडून आज्ञा झालीच- ‘चला, ताजमहाल हॉटेलवर दहशतवादी हल्ला झालाय.’

‘ताज’ची रक्तानं माखलेली लॉबी साफ-सुरक्षित करून खोल्यांकडे हे कमांडो-पथक गेलं. दहशतवाद्यांचा नेमका अंदाज घेत एकटय़ा-दुकटय़ानं खोल्यांकडे जात असतानाच प्रवीणला आवाज आला.. आधी पहिला, मग तसाच दुसरा. दोन्ही आवाज एकसारखेच.

कशाचा हा आवाज? नेमकं ओळखलं प्रवीणनं. ‘एके-४७’मध्ये काडतुसं भरून ती रायफल पुन्हा सज्ज करतानाच हा आवाज येतो. फक्त ‘एके-४७’चाच आवाज असा असू शकतो. प्रवीण सावध आणि सज्ज. तितक्यात वर्षांव सुरू. पैकी चार गोळ्या प्रवीणच्या अंगावर.. प्रवीणचाही गोळीबार. तेवढय़ात लक्षात आलं- दहशतवादी दोघेच नाहीत, चार जण आहेत. मग प्रवीणनं पट्टय़ातला ग्रेनेड भिरकावला त्यांच्या दिशेनं. पण तो फुटला नाही. म्हणून पुन्हा गोळीबार. हे असं सुमारे २५ मिनिटं चाललं.

नंतर लक्षात आलं : चारपैकी एक गोळी मानेतून कानापर्यंत गेलेली आहे. रक्ताचं थारोळं झालंच होतं, पण बुलेटप्रूफ जॅकेटमुळे जीव तर वाचला होता. शिवाय, प्रवीणनं खोल्यांच्या मधल्या पॅसेजची ‘खिंड’च लढवली होती एकप्रकारे- त्यामुळे पुढल्या खोल्यांमधले – विशेषत: बॉलरूममधले- १५० निरपराध लोकांचे जीव वाचले होते!

..नंतरही प्रवीणचं कौतुक वगैरे होत होतंच, पण आता प्रवीण अंशत: कर्णबधिर झाला होता. उमेदीतच निवृत्ती. मग पुढे?

पाय तर होते ना शाबूत! प्रवीण धावू लागला. सराव करू लागला. मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ लागला आणि जिंकूही लागला. ‘आयर्नमॅन चॅलेंज’ ही स्पर्धा त्यानं दक्षिण आफ्रिका आणि मलेशियातही जिंकली.

आता प्रवीण ३६ वर्षांचा आहे. त्याची कहाणी आता रूपा पब्लिकेशन्सनं २०८ पानी पेपरबॅक पुस्तकरूपात प्रकाशित केली आहे. पुस्तकाचं नाव ‘२६/ ११ ब्रेव्हहार्ट’.. पण खरं तर, यात प्रवीणच्या गेल्या १२ वर्षांतल्या संघर्षांबद्दलही थोडं वाचता येईल. ‘२६/११’ची वर्णनं तर ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्येही दरवर्षी वाचायला मिळतात. पण त्याहीनंतरच्या जिद्दीविषयी या पुस्तकात अधिक पानं असती, तर हे पुस्तक अधिकच प्रेरक ठरलं असतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:00 am

Web Title: book batmi article 26 11 braveheart my encounter with terrorists that night abn 97
Next Stories
1 स्त्री‘वाद’ नकोच..?
2 भाजपच्या बिहार-विजयाचा अर्थ
3 बुकबातमी : गावातली मैत्रीण अरुणा..
Just Now!
X