भोजनात पालेभाज्यांसह गाजर आणि बीटचा समावेश

औरंगाबाद : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याचे चिन्ह दिसताच कारागृह प्रशासनाने त्यांच्या जेवणाच्या पदार्थामध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. आठवडय़ातून दोन वेळा पालेभाज्या, गाजर, बीट यांचा समावेश केला आहे. कैद्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढायली हवी म्हणून या उपाययोजना करण्यात आल्या असून हात साबणाने व सॅनिटायझरने धुतल्याशिवाय कारागृहात नव्या कैद्याला प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर कैद्याच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी काही जणांना तापमापकही देण्यात आले आहेत.

औरंगाबाद शहरातील हर्सूल कारागृहाची क्षमता एक हजार कैदी ठेवण्यापर्यंतची आहे. मात्र, तेथे सध्या १ हजार ८५० कैदी आहेत. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एकाला लागण झाली तर ती अनेकांना होऊ शकते म्हणून योग्य ती काळजी घेण्यासाठी अलीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक कारागृहात आले होते. त्यांनी तापमापकामधील नोंदी कशा मोजाव्यात याची माहिती काही निवडक कैद्यांना दिली आहे. एखाद्याला ताप आल्यास किंवा सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास त्याला वेगळ्या कक्षात ठेवता यावे, अशी सोयही करण्यात आली आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर लिंबूपाणी दिले जात आहे. याशिवाय आठवडय़ात दोन वेळा पालेभाज्या आणि गाजर, बीट यांचाही समावेश करण्यात आला आहे. रविवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. कारागृहात पुरेशा प्रमाणात साबण व पाण्याची सोय करण्यात आली असून कैद्यांना बराकीतून काढताना आणि परत आतमध्ये सोडताना त्यांनी हात धुवायला हवेत, अशा सूचना दिल्या आहेत.