जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वेमार्गावर चर्चा करावी, रेल्वेप्रश्नी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करावी म्हटले तर खासदार महोदयांचा दूरध्वनी सतत बंद लागतो. इतर लोकप्रतिनिधींचा रेल्वेमार्गावर अभ्यास नाही आणि त्यांची बहुतेक इच्छाही नसावी. त्यामुळे त्यांची उदासीनताच जिल्ह्याचा मागासलेपणा वाढवत असल्याची खंत रेल्वे लोक आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रभाकर निपाणीकर यांनी व्यक्त केली.
रेल्वेमार्गाच्या जाळ्यात उस्मानाबाद जिल्ह्य़ाची कायम उपेक्षा झाली. लोकप्रतिनिधींच्या नाकत्रेपणामुळेही जिल्ह्याची ओळख मागास झाली, अशी खंत व्यक्त करून आगामी रेल्वे अर्थसंकल्पात उस्मानाबादमाग्रे कोल्हापूर-नागपूर व हैदराबाद-पुणे या रेल्वेगाडय़ा दररोज व नवीन सात रेल्वेगाडय़ांसाठी प्रयत्न करणार आहे, असे निपाणीकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. नियोजित दक्षिणोत्तर रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास उस्मानाबाद परिसराचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कोकणात रेल्वेचे जाळे वाढत आहे. परंतु त्या प्रमाणात राज्यकर्त्यांनी मराठवाडय़ातील रेल्वेमार्गासाठी प्रयत्न केले नाहीत.
उस्मानाबाद दक्षिणोत्तर रेल्वेमार्गावर आल्यास ४० टक्के रोजगार व विकासात भर पडणार आहे. शेतीमालाला चांगला भाव मिळण्यासाठी चांगल्या बाजारपेठेत शेतीमाल नेण्याची सुविधा यामुळे पूर्ण होणार आहे. नियोजित दक्षिणोत्तर रेल्वेमार्गातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. बीडहून जालना-चिखली रेल्वेमार्गाचे अनेकदा सर्वेक्षण झाले. तीन वर्षांपूर्वी चिखली-बुलढाणा-मलकापूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले होते. त्याचेही सर्वेक्षण पूर्ण झाले. मलकापूर ते बऱ्हाणपूरचे सर्वेक्षण होणे बाकी आहे. या नियोजित रेल्वेमार्गाचे अंतर ४५० किलोमीटर आहे. परंतु सद्यस्थितीत सोलापूर ते कुर्डुवाडी-दौंड-नगर-मनमाड-भुसावळ आणि बऱ्हाणपूपर्यंतचे ७०० किलोमीटर आहे. नियोजित दक्षिणोत्तर रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास या अंतरात घट होऊन तब्बल ३०० किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे.
या मार्गावर सोलापूर, मराठवाडय़ातील तुळजापूर, उस्मानाबाद, कळंब, केज, बीड, गेवराई, अंबड, जालना, विदर्भातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, बुलढाणा, मलकापूर व मुक्ताईनगर, मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर आदी परिसरातील नामवंत बाजारपेठा, तीर्थक्षेत्र, पर्यटन, धार्मिक स्थळे, साखर कारखाने, वेगवेगळ्या कंपन्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ आणि युवकांना रोजगार मिळणे सहज शक्य होणार आहे. त्यासाठी रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने सोलापूर क्षेत्र रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
उस्मानाबाद रेल्वेस्थानकात अनेक सोयी-सुविधांचा अभाव आहे. अनेक गाडय़ा उस्मानाबाद रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत. परिणामी लातूर किंवा कुर्डुवाडीहून परत उस्मानाबादला प्रवाशांना बस वा खासगी वाहनाने यावे लागते. लातूर-मुंबई रेल्वेगाडीत लातूरहून बसून येणारे प्रवासी उस्मानाबाद रेल्वेस्थानकात डब्यांची दारे उघडत नाहीत. त्यामुळे अनेकवेळ भांडणतंटे होतात, प्रवाशांना डब्यात जाता येत नाही. तसेच पिण्याच्या पाण्यासह इतर सर्वसामान्य सुविधांचा अभाव रेल्वे स्थानकात आहे. त्यामुळे याकडे रेल्वे विभागाचे लक्ष वेधून प्रवाशांची गरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे निपाणीकर यांनी सांगितले.