लेनिनचा पुतळा पाडला नसता तर देशात अशा प्रकाराला सुरुवातच झाली नसती. माझं राज्य आलं तर पुतळे तोडायचे ही कोणती पद्धत आहे?, खरं तर याबाबत राज्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत. लेनिनचा पुतळा पडल्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे पडले. आता हे लोण देशभर सुरू झाले आहे. देशात आराजकतेला यांनी सुरुवात केली आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपला फटकारले. तसेच याबाबत आपण लोकसभेतही बोलणार असल्याचे खैरे म्हणाले.

सावरकरांच्या पुतळ्यावर शाई फेकल्याने हा मोठा अवमान आहे. आज आम्ही शांत आहोत त्यामुळे या प्रवृत्तीला अधिक बळ मिळेल त्यामुळे त्यांना ठेचल पाहिजे. आणि ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही सावरकरप्रेमी जनतेची मागणी असल्याचे खैरे म्हणाले. तसेच पालिकेकडून सावरकर पुतळा भागात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेशही दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद शहरातील समर्थनगर भागात असलेल्या सावरकरांच्या पुतळ्याला अज्ञात व्यक्तींनी डांबर फासल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. घटना ही घटना समजल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शिवसैनिक आणि सावरकरप्रेमी नागरिकांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला. त्यानंतर तात्काळ सावरकरांच्या पुतळा स्वच्छ करुन त्याची रंगरांगोटी करण्यात आली. तसेच पुष्प आर्पण करीत आदरांजली वाहण्यात आली.