छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कापसाच्या पिकात गांजा व अफूची शेती करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. यासंदर्भाने पोलिसांनी गावपातळीवर बैठका घेऊन स्थानिक सरपंच, पोलीस पाटील व गावच्या प्रतिष्ठित नागरिकांना समज दिल्याची माहितीही समोर आली आहे.

पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एनडीपीएस) केलेल्या कारवाईत १ हजार १२९ किलो गांजा व ८३५ किलो ग्रॅम अफू जप्त करण्यात आली आहे. एकूण ७ कोटी ३० लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला असून, त्यामध्ये ७३.०३ ग्रॅम एमडी व ४६ गुंगीकारक अल्प्राझोलम गोळ्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व धाराशिव या चार जिल्ह्यांमध्ये १ जानेवारी ते ऑगस्टअखेरपर्यंत केलेल्या या कारवाईत ७६ गुन्हे नोंदवून १०२ जणांना अटक तर ६ जणांना नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक ३१ गुन्हे हे धाराशिव जिल्ह्यात तर दुसऱ्या क्रमांकावर बीड असून, या जिल्ह्यात १८ गुन्हे नोंद झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५ तर जालन्यात ११ गुन्हे दाखल आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये एकूण २१ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व ९१ पोलीस ठाणे समाविष्ट आहेत.

सरपंच, पोलीस पाटलांना शेतीबाबत समज

विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी परिक्षेत्रातील जिल्हानिहाय उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे अधिकारी, प्रभारींना गावभेटी देण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने सरपंच, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक घेऊन गावात शेतीमध्ये गांजाची लागवड करणार नाही, तसेच गांजाची शेती करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याबाबत समज देण्यात आली आहे. कापसाच्या शेतीच्या नावाखाली अवैध गांजाची शेती करणारे असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांचे समुपदेशन

परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये काही शेतकरी कोणाच्या सांगण्यावरून आणि पैशांच्या मोहापायी गांजाची शेती करत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या कारवाईत हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचे समुपदेशन करून गांजाची शेती अवैध असल्याचे त्यांना समजावण्यात आले, असे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

परळीत ५३ किलो गांजा जप्त

बीड : परळीतील इराणी गल्लीतील एका घरातून पोलिसांनी ५३ किलो १३४ ग्रॅम गांजासह १२ लाख २३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल बुधवारी जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. अंबाजोगाईचे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या पथकाने संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय ढोणे यांना भेटलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली. वसीम उर्फ शराबी अक्रम बेग आणि अक्रम रफिक बेग याच्या घरात छापा टाकत गांजासह ३१ मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, रिक्षा इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला तरी शराबी बेग आणि अक्रम बेग पळून जाण्यात यशस्वी झाले.